प्रतिनिधी / बेळगाव
पथदिपांची देखभाल व्यवस्थित केली जात नसल्याने शहर व उपनगरांतील निम्मे पथदीप बंद आहेत. याबाबत महापालिकेच्या अधिकाऱयांकडे तक्रार केली असता स्मार्ट सिटीच्या कामामुळे पथदीप बंद असल्याचे सांगून जबाबदारी झटकण्यात येत आहे. स्मार्ट सिटीच्या अधिकाऱयांकडे तक्रार केली असता पथदीप दुरुस्तीचे काम महापालिकेचे असल्याचे सांगण्यात येत आहे. महापालिका आणि स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱयांमध्ये समन्वय नसल्याने शहरात अंधार पसरला आहे.
शहर स्मार्ट बनविण्यासाठी कोटय़वधीचा चुराडा केला जात आहे. पण नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या सुविधा पुरविण्याकडे जिल्हा प्रशासन आणि महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. शहर आणि उपनगरांतील निम्मे पथदीप सध्या बंद आहेत. सध्या शहरात विविध रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येत असल्याने रस्त्यांची खोदाई करण्यात आली आहे. काही ठिकाणी चरी खोदण्यात आल्या आहेत. साहित्यदेखील ठेवण्यात आले आहे. यामुळे याचा अडथळा वाहनधारकांना पार करावा लागतो. पण पथदीप व हायमास्ट बंद असल्याने रस्त्यांवरील अडचणी लहान वाहनधारकांना दिसून येत नाहीत. त्यामुळे अपघाताला सामोरे जावे लागत आहे. शहरातील पथदीप दुरुस्त करण्यात यावेत, अशी मागणी महापालिकेकडे वारंवार करूनही याकडे कानाडोळा केला जात आहे. परिणामी पथदिपांच्या दुरुस्तीचे काम रखडले आहे. शहरात बहुतांश पथदीप बंद असून अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.
तक्रारीचे निवारण करण्याबाबत दूरध्वनीद्वारे कळविले असता दखल घेण्यात येत नाही. याबाबत महापालिकेच्या अभियंत्यांकडे तक्रार केली असता स्मार्ट सिटीचे काम सुरू असल्याने ठिकठिकाणी केबल तोडण्यात आल्या आहेत. त्यांची दुरुस्ती करण्याची जबाबदारी स्मार्ट सिटीच्या कंत्राटदाराची आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी कंपनीला याबाबत आतापर्यंत वीसहून अधिक पत्रे लिहिली आहेत. पण त्यांची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे स्मार्ट सिटी कंपनीच्या कार्यकारी व्यवस्थापकांकडे तक्रार केली असल्याचे सांगण्यात आले. पण स्मार्ट सिटी कंपनीच्या कार्यकारी व्यवस्थापकांनीदेखील ही बाब गांभीर्याने घेतली नाही. परिणामी शहर व उपनगरांतील संपूर्ण पथदीप बंद असल्याने अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. ठिकठिकाणी रस्त्यांच्या विकासाकरिता खड्डे खोदण्यात आल्याने वाहनधारकांना धोकादायक बनले आहेत. अशातच पथदिपांच्या दुरुस्तीकडे मनपाचे कंत्राटदार व महापालिकेचे अभियंते आणि स्मार्ट सिटी कंपनीचे अधिकारी व कंत्राटदारांनीही दुर्लक्ष केले आहे. एकंदर पथदीप दुरुस्तीच्या नावाखाली मलई लाटण्याचा प्रकार मनपा अधिकारी आणि कंत्राटदारांनी चालविला असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.
त्यामुळे पथदिपांबाबत महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या. पण त्यांनीदेखील स्मार्ट सिटीमुळे पथदीप बंद असल्याचे सांगून जबाबदारी झटकण्याचा प्रकार केला आहे. त्यामुळे पथदिपांच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात यावे, अशी मागणी होत आहे.