Tarun Bharat

मनाला जिंकणारा इहलोकातच जनार्दनाशी एकरूप होतो

अध्याय तेविसावा

भगवंत म्हणाले, उद्धवा माणसाचे मन हे नेहमी त्याच्या देहाच्या अहंकाराला गोंजारत असते. त्यामुळे देहातील जीवात्मा विलक्षण सुखावतो आणि स्वतःला मनाच्या स्वाधीन करतो. त्याला स्वतःचे असे अस्तित्व उरत नाही परंतु माणसाच्या आयुष्याचे सार्थक देहापासून जीवात्मा वेगळा करून तो ईश्वरी अस्तित्वात विलीन करण्यात असते. अर्थात जीवात्मा पूर्णपणे मनाच्या आहारी गेला असल्याने, त्याला मुक्त करण्यासाठी मनालाच काही शिकवण द्यायची गरज असते आणि ते काम सदगुरु अत्यंत कौशल्याने करतात. सद्गुरु मनाला परमार्थ मार्गावर आणून सोडतात. मन एकदा एखाद्या गोष्टीच्या मागे लागले की, काही झाले तरी त्या गोष्टीची पाठ सोडत नाही. सद्गुरूंच्या कृपेने ते जर आपणहून परमार्थाकडे लागले, तर चमत्कार घडवते आणि चारही मुक्तींना आपल्या पायाची दासी करून ठेवते आणि परब्रह्मच बांधून हातात देते. मन हेच मनाचे प्रकाशक आहे, मन हेच मनाचे साधक आहे, मन हेच मनाला बाधक आहे आणि मन हेच मनाला घातक आहे. म्हणूनच म्हणतात की, मनोभावे सद्गुरूंना शरण जावं व त्यांच्या शिकवणुकीनुसार वागावं म्हणजे आत्मकल्याण होतं. सद्गुरूंना शरण गेलेलं मन सद्गुरूंच्या वचनावर विश्वास ठेवून निरभिमानपणाने गुरुभजन करते. पूर्णपणे सदुरुकृपा झाल्यावर हे मनच मनाला खूण दाखवून देते आणि आपल्या सुखाने सुखी होऊन मनच मनावर प्रसन्न होते. मन मनावर प्रसन्न झाले असता वृत्ती निरभिमान होते आणि शेवटी सद्गुरूच्या आत्मज्ञानात मन हेच आत्मस्वरूपाने पूर्णपणे लीन होते. साधक निरभिमानी होताच मी तू पण नष्ट करून स्वतः पूर्णब्रह्म होतो. मग त्याच्या आत्मदृष्टीला सर्व सृष्टीत मीच काय तो एक भरलेला आहे असे दिसू लागते. स्वतःचे अस्तित्व आत्मज्ञानात लीन झाल्यामुळे देह वेगळा आणि जीवात्मा वेगळा अशी खात्री होते. त्यामुळे देहाबद्दलचा आपलेपणा संपुष्टात येतो. जी गोष्ट आपली नाही त्याबद्दल मनात परकेपणाची भावना निर्माण होते. त्यामुळे परदुःख शीतल या न्यायाने देहाच्या सुखदुःखाचे महत्त्वच नाहीसे होते. अशा अवस्थेत कसले सुख आणि कसले दुःख? कसला बंध आणि कसला मोक्ष? पंडित कोण आणि मूर्ख कोण? सर्वत्र एकटे एक ब्रह्मच. तेथे देव कोण आणि भक्त कोण? शांत कोण आणि अशांत कोण? द्वैत-अद्वैत लयास जाते आणि एक परब्रह्मच सदोदित स्वानंदरूपाने राहते. तेथे क्रिया आणि कर्म नाहीशी होतात. धर्म आणि अधर्म लज्जेनेच नष्ट होतात. तेथे कनि÷, उत्तम, मध्यम तरी कसले? परिपूर्ण ब्रह्मच सर्वत्र भरून राहते. तेथे कसले शास्त्र आणि कसला वेद? कसली बुद्धी आणि कसला बोध? भेदच निखालस नाहीसा होतो आणि आनंदस्वरूप परब्रह्मच भरून राहते. याप्रमाणे मनोविजयाने या स्थितीला भाव पोचतो. हे स्वतः भगवंतांनीच सांगितल्यामुळे ह्याविषयी संशय नाही. विशेष म्हणजे ब्रह्मदेवादिकांनाही अगम्य असलेला मनोजय, सद्गुरु कृपेनं प्राप्त होतो. मनोजयासारखी अशक्मयप्राय गोष्ट जो सद्गुरूंच्या पूर्ण कृपेनं प्राप्त करून घेतो, तो आत्मज्ञानाने देवाधिदेवच झाला असे समजावे. ह्याप्रमाणे जो आपल्या मनाला जिंकून इहलोकातच जनार्दनाशी एकरूप होतो, तो त्रिभुवनात अत्यंत धन्य होतो. त्याच्या योगाने पृथ्वी पावन होते. जनार्दनाशी एकरूप झाल्यामुळे त्याचे पूर्वज तारले जातात व कुळाचा उद्धार होतो. ज्याने मनाला जिंकले, त्यानेच परब्रह्माला आपलेसे करून घेतले असे समजायला हरकत नाही. मनोजयाने जे अत्यंत समर्थ झालेले असतात, तेथेच सर्वस्वी शांती ही विकलेली असते. माणसाला सुखदुःखांच्या जाणिवा मनामुळे होत असतात जे मनावर विजय मिळवतात त्यांना आत्मबोधाच्या योगाने सुखदुःखांचे भोवरे न लागताच निघून जातात. मनोजय हा त्रिभुवनात धन्य होय.

ज्याने आपल्या मनाला जिंकले, त्याचे शब्दांनी मी किती वर्णन करू? त्याने मला आपला दास बनविले किंवा एकाएकी विकतच घेतले असे समज.

आनंदस्वरूप अशा मला आनंद होतो. मला नित्यतृप्ताला त्याच्यामुळेच तृप्ती होते.

क्रमशः

Related Stories

चैतन्य महाप्रभु आणि संत तुकाराम

Omkar B

नैतिक पराभव

Omkar B

परीक्षेच्या वादावर पडदा

Patil_p

ऊस रसाची (सायरप) बाजारपेठ

Patil_p

उशिरा का होईना मुख्यमंत्र्यांनी योग्य निर्णय घेतला…

Patil_p

कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील निराशजनक अर्थसंकल्प

Patil_p