Tarun Bharat

मन उलगडताना…

रात्री उशिरा फोन वाजला. ‘हॅलो मी सीमा. ओळखलं ना? हो..बोल ना. मॅडम खूप खूप आभार. कशासाठी? ऑनलाईन क्लासेस सुरू केले. दोन्ही बॅचेस फुल्ल झाल्या. माझा माझ्यावरच विश्वास बसत नाही. मी खूप खुश आहे. आनंदात आहे. खरंतर हे सारं भेटून सांगायचं होतं तुम्हाला परंतु लॉकडाऊनमुळे मनात असूनही भेटू शकत नाही. म्हणून फोनवरूनच आभार!’

अभिनंदन सीमा! अगं, तुझ्या प्रामाणिक कष्टांचं हे फळ आहे. खूप छान..अशीच प्रगती कर. हो मॅडम.. मी नक्की भेटायला येणार.. हो अवश्य ये असं म्हणून मी फोन ठेवला. साधारणपणे वर्ष सव्वा वर्षापूर्वी माझ्याकडे आलेली सीमा मला आठवू लागली. त्या दिवशी अगदी सकाळीच ती आली होती. उदास चेहरा, डळमळलेला आत्मविश्वास. थोडं घाबरतच.. नमस्कार..मी..मी सीमा. फोन न करताच आले. क्षमा करा. परंतु इलाजच नव्हता. ठीक आहे. या. बसा ना…

‘मॅडम, मला खूप त्रास होतो आहे. काय करावं सुचत नाही. नको वाटतं सारं.

बरं, कसला त्रास? खूप अस्वस्थ वाटतं हल्ली. एवढे विचार येतात मनात. काही काही सुचत नाही. सारखं चक्र सुरूच. हल्ली एकेकदा मला मी काय करते याचं भान रहात नाही, काहीवेळा आठवतही नाही. कधी कधी फ्रिज कशाला उघडला हेच आठवत नाही. किती वेंधळी झाली आहे हो मी, असं म्हणत ती एकदमच रडू लागली. 5-6 मिनिटानी शांत झाल्यावर म्हणाली, ‘मॅडम, मी खरंच अशी नव्हते हो. मी गायन शिकले आहे. संगीताला जशी लय असते ना, तशी माझ्या कामाला ही लय होती. अगदी नीट असायचे सारे.. टापटीप, सारं व्यवस्थित जागच्या जागी असायचं. हळहळू गाणे मागे पडत गेले.. तशी माझीही लय हरवली का काय माहीत?’

म्हणजे? उदासीनेच चेहऱयावर कसंबसं हसू आणत म्हणाली, ‘लग्न झालं आणि सारं मागेच पडत गेलं. घरच्यांना गायन वगैरे फार आवडत नसे. सतत पाहुण्यांची ये जा, मुलं, सासु सासऱयांची आजारपणं यात वेळही मिळेना. सगळं मागे पडत गेलं, हरवलंच. आता सगळय़ा जबाबदाऱयातून मोकळी झाले पण जराही स्वस्थता नाही. काहीतरी वेगळंच होतं. एकेकदा वाटतं डोकं फुटेल की काय विचारांनी.’

‘खबरं.. आता घरी कोणकोण असतं तुमच्या?’

‘मी आणि नवरा.. सासु सासरे दोन वर्षापूर्वीच गेले. आता मुलेही शिक्षणासाठी बाहेर पडली. मॅडम, हे सगळं मी मिस्टरना सांगितलं तर त्यानी लेक्चरच दिलं मला. वैतागत म्हणाले, कुठेच शांतता नाही. ऑफिसचे ताप वेगळे, घरी आलो की तुझी चिडचिड, वेगवेगळी गाऱहाणी आणि निघूनच गेले.. त्यांनीही समजून घेतलं नाही. काय चुकतंय तेच कळत नाही. पण हे सारं नको वाटतंय. वाटतं कुणालाच किंमत नाही आपली. मॅडम, मला यातून बाहेर पडायचंय. प्लीज, मदत करा..’ असं म्हणत ती पुन्हा हमसून हमसून रडू लागली. नंतर बराच वेळ चर्चा झाली.

सीमाची नेमकी समस्या कळली होती. संसाराच्या रामरगाडय़ात असलेली आवड मागे पडली, सोडून दिली गेली. अनेकदा हा विचार तिला त्रास देत असे. परंतु सगळय़ा जबाबदाऱया पार पाडताना वेळ निघून जात असे. आता मात्र सासु सासरे नाहीत. मुलंही शिक्षणाला बाहेर पडली आणि रिकामा वेळ अस्वस्थ करू लागला. मुलं मित्र मैत्रिणींमध्ये रमू लागली. त्यांचे विश्व बदलले. नवरा त्याच्या ऑफिसच्या कामात व्यग्र, आता माझी कुणालाच गरज उरली नाही, ही मनात पोकळी निर्माण करणारी भावना, रिकामा वेळ, बदललेला दिनक्रम, त्यातच रजोनिवृत्तीकडे होणारी वाटचाल या सर्व गोष्टी एकत्र झाल्या होत्या.

परंतु यातून बाहेर पडायचेच असा निर्धार सीमाने केला आणि समुपदेशन सत्रं सुरू झाली. स्वगत पडताळणी, माईंडफुलनेसची तंत्रे हे सारे टप्प्याटप्याने तिच्याकडून करून घेत समुपदेशन सुरू राहिले. त्याबरोबरच आखून दिलेल्या चार्टनुसार रोज न चुकता अर्धातास तरी नियमित रियाज करणे. रोज किमान एक गाणे ऐकणे या गोष्टीही सुरू होत्या. हरवलेला सूर गवसावा असेच काहीसे झाले. तिला हळूहळू विचार, भावना, शरीरात जाणवणाऱया संवेदना याकडे साक्षीभावाने पाहणे जमू लागले. आत्मविश्वास वाढू लागला. दोन तीन महिन्यानंतर तिने आता गाण्याचे क्लास घ्यावेत असेही सुचविले. त्याप्रमाणे तिनेही एक विद्यार्थी, दोन विद्यार्थी असे करत सुरुवात केली. आठ जणांची एक बॅच सुरू झाली. परंतु, लाकडाऊनमधे पुन्हा क्लासेस बंद झाले. सीमाने कल्पकतेने ऑनलाईन क्लासेस सुरू केले. सीमाची हा विचार पाहता कुरकुर थांबून गाडी योग्य दिशेने धावायला लागल्याची पोचपावती मिळाली होती. खरंतर विविध शिबिरांमध्ये अशा अनेक स्त्रियांसोबत संवाद होत असतो. ताण, नैराश्य, चिंता, भय, राग, मत्सर अशा अनेक भावना मनात साठवत वरून ‘ऑल इज वेल’ असा मुखवटा धारण करत वर्षानुवर्षे आयुष्य रेटत असतात. परंतु याची तीव्रता वाढत गेली की सारेच अवघड होऊन बसते. विशेषतः स्त्रियांबाबत बोलायचे तर जसे शारीरिक आरोग्याच्या बाबतीत प्रथम नवरा, मुले, घरचे सारे आणि अगदीच नाईलाज झाला तर आपण स्वतः असा क्रम घरोघरी पहायला मिळतो तीच कथा किंबहुना त्याहूनही कांकणभर अधिकच दुर्लक्ष मानसिक आरोग्याबाबत पहायला मिळते. स्त्रियांच्या मानसिक समस्यांचा विचार करताना अनेक गोष्टी समोर येतात. काहीवेळा कमी समायोजनक्षमतेमुळे समस्या उग्र रूप धारण करतात, अनेकदा आपल्या मनात काय चाललंय याकडे आपण लक्ष देत नाही, काहीवेळा अपेक्षा आणि वास्तव यामधे दरी असते. काहीवेळा कुटुंबातले दुय्यम स्थानही भावनिक समस्या निर्माण करण्यास खतपाणी घालते. स्त्री स्वातंत्र्य, समता वगैरे कितीही गप्पा मारल्या तरी बहुतांश स्त्रियांना एका विशिष्ट चौकटीत राहून स्वतःचा विचार करावा लागतो हे वास्तव आहे. कामात शेअरिंग नसणे, गृहीत धरले जाणे या गोष्टी इतक्मया सहज घडत जातात की उदासीचे ढग दाटत जातात. भावनिक आरोग्याकडे लक्ष नसेल तर हळूहळू मानसिक आरोग्य धोक्मयात येऊ लागते.

सीमासारख्या अनेक केसेस पहायला मिळतात. ज्यांच्याकडे एकेकाळी आपल्या क्षेत्रात निपुणता होती परंतु नंतर मात्र सगळे इतके मागे पडत गेले की ती आपली आवड होती हे भानच हरवून जाते.

 एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी की, आपल्यातील गुण, क्षमता ओळखून आपणच त्याच्या विकासासाठी सजग असायला हवे. आपली मूल्ये ठरवायला हवीत. संसाराच्या रामरगाडय़ात अनेक कारणांमुळे छंदाना, आवडींना मूठमाती दिली जाते परंतु कुठेतरी मनामध्ये ते शल्य असतेच. त्यातच जोडीला काळजी, चिंतेची भर पडून तणावाने जीवनाची लय बिघडून जाते.

मानसिकदृष्टय़ा तंदुरुस्त असण्यासाठी सजग असणे गरजेचे आहे. आपल्यातील दोष शोधून ते सुधारण्यासाठी आपण जागरुक आहोत का? आपण स्वतःशी स्वस्थ आहोत का? इतरांना आपल्या सान्निध्यात स्वस्थ वाटते का? भावनांची हाताळणी व्यवस्थित करता येते का हे पहायला हवे. भावनांची तीव्रता, वारंवारता, कालावधी हे सारे निकष आपले आपण तपासून पहायला हवेत. गेल्या लेखात म्हटल्याप्रमाणे नैसर्गिक श्वसनासोबत होणारी छाती पोटाची हालचाल जाणणे, विचार, भावनांची नोंद, साक्षी ध्यान यासोबतच सजग कृतीचाही अवलंब करायला हवा. ताणतणाव व्यवस्थापनासाठी भावनिक मोजपट्टी तयार करून त्यानुसार आपल्या मनात काय चालले आहे हे जाणून घेता येऊ शकते. त्यामुळे आपण नेमके कुठे आहोत याबाबतही जाणीव निर्माण होते. अर्थात याविषयी जाणून घेऊया पुढच्या लेखात…

Related Stories

लसीचेही राजकारण

Patil_p

चिंता वाढविणाऱया घटना

Amit Kulkarni

नेता, एक कोण-फेक कोण? ठरता ठरेना!

Patil_p

जी. एम. वांग्यांचे सामाजिक-आर्थिक परिणाम

Patil_p

दुर्वासाच्या पाठी सुदर्शन

Patil_p

मंत्रिकपातीचे सूतोवाच

Patil_p