Tarun Bharat

‘मन की बात’ मध्ये नद्यांच्या संरक्षणावर भर

पंतप्रधान मोदी यांनी इतरही महत्वाच्या विषयांचा केला उल्लेख

@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण आणि नद्यांच्या संवर्धनावर भर दिला आहे. त्याचप्रमाणे आर्थिक भ्रष्टाचाराविरुद्ध संघर्ष, खादीचा प्रसार, स्वच्छता अभियान, औषधी वनस्पतींची लागवड आणि कोरोनासंबंधी दक्षता अशा अनेक मुद्दय़ांवर त्यांनी स्वतःचे विचार व्यक्त केले आणि महत्वपूर्ण सूचनाही केल्या.

भारतात अणि विश्वात आज अनेक विशिष्ट कारणांसाठी दिन साजरे केले जातात. तसाच वैश्विक नदी दिन साजरा केला जातो. याची माहिती फार कमी लोकांना आहे. तथापि, इतर महत्वाच्या दिनांसारखा हा महत्वाचा दिन आहे. भारतीय संस्कृतीत पाणी आणि त्याची शुद्धता यांना अपरंपार मान मिळतो. जवळपास प्रत्येक राज्यात आणि प्रत्येक समाजांमध्ये पाण्याचे महत्व सांगणारे सण आहेत. यामुळे अपोआप पाण्याचे संरक्षण आणि पावित्र्य राखले जाते. गुजरातमध्ये ‘जल-जिलानी एकादशी’ तर बिहारमध्ये छट पूजा केली जाते. नव्या पिढीने या सणांचे प्रयोजन समजून घ्यावे आणि नद्या, तसेच इतर जलस्रोतांचे संरक्षण व संवर्धन करण्याच्या कामी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

स्वच्छता अभियान

पंतप्रधान मोदींनी सत्तेवर आल्यानंतर त्वरित राष्ट्रव्यापी स्वच्छता अभियानाचा प्रारंभ केला होता. याचा आढावा त्यांनी घेतला. शारीरिक आणि सार्वजनिक स्वच्छतेप्रमाणेच आर्थिक स्वच्छता अभियानावरही भर द्या, अशी सूचना आपल्याला एका युवकाने मन की बात कार्यक्रमाआधी केला होता याचा आवर्जून उल्लेख त्यांनी केला. स्वच्छता अभियानासोबतच त्यांनी खादीच्या प्रसाराचाही मुद्दा मांडला.

औषधी वनस्पतींची लागवड

कोरोना उद्रेकाने आपल्याला अनेक धडे दिले. त्यात पारंपरिक औषध पद्धतीचे महत्व ओळखणे हा प्रमुख धडा होता. ओडिशातील एका शेतकऱयाने दीड एकर जागेत औषधी वनस्पतींची लागवड केली आहे तर रांचीतील शेतकऱयानेही असाच प्रयोग केला आहे. औषधी वनस्पतींची लागवड आता आपल्याला व्यापक प्रमाणात हाती घ्यावी लागणार आहे. आयुष मंत्रालयाने यात पुढाकार घेतला आहे. आयुर्वेदात उपयोगात आणल्या जाणाऱया वनस्पती अनेक रोगांवर मात करण्यात यशस्वी ठरतात, हे स्पष्ट झाले आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

दिव्यांगांचे उत्साहवर्धन

काही दिवसांपूर्वी काही भारतीय दिव्यांग व्यक्तींनी सियाचिन या जगातील सर्वात  उंच युद्धभूमीला भेट दिली. दिव्यांगही असे अवघड उपक्रम यशस्वीरित्या पार करू शकतात. भारताच्या दिव्यांग क्रीडासंघाने त्यांच्यासाठीच्या पॅराऑलिंपिक स्पर्धेत स्पृहणीय यश मिळविले. दिव्यांगांना प्रोत्साहन दिले तर ते आपल्यासाठी आदर्श बनू शकतात, हे यावरून सिद्ध होते. उत्तर प्रदेशात तेथील शिक्षकांनी अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. हे शिक्षक घरोघरी जाऊन दिव्यांग विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश मिळेल अशी व्यवस्था करतात, याचाही उल्लेख त्यांनी केला.

कोरोना दक्षता

कोरोना लसीकरणात भारताने विक्रम केला आहे. आतापर्यंत 80 कोटीहून अधिक लोकांना कोरोना लसीची एक मात्रा तरी देण्यात आली आहे. प्रत्येकाने स्वतःचे लसीकरण केले पाहिजे. आपल्या आसपास वावरणाऱयांना आणि आपल्याबरोबर काम करणाऱयांना लस घेण्यास उद्युक्त केले पाहिजे. सध्याच्या सणासुदीच्या काळात आपण प्रत्येकाने कोणतीही मुभा न घेता कोरोना नियमांचे पालन काटेकोरपणे करण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादन केली.

Related Stories

भारताच्या लसीला नेपाळचे प्राधान्य

Omkar B

उत्तराखंडातील बागेश्वर जिल्ह्यात भूकंपाचे धक्के

Tousif Mujawar

स्वत:च्या चुकीचा इव्हेंट कसा करायचा हे केंद्राकडून शिकावं – संजय राऊत

Archana Banage

देशात सक्रिय रुग्णसंख्येत वाढ

Patil_p

5 लाख चाचण्या, 50 हजार पॉझिटिव्ह

Patil_p

उपराष्ट्रपती निवडणुकीचे आज मतदान-निकाल

Patil_p