ऑनलाईन टीम
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुष्पचक्र अर्पण करून मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना अभिवादन केलं. यावेळी बोलताना मराठवाड्यात संतपीठ स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मार्गदर्शनाने हे संतपीठ सुरू केलं जाणार असून लवकरात लवकर ते मोठं विद्यापीठ व्हावं, अशी अपेक्षा देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. या संतपीठामध्ये महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील संतांची शिकवण दिली जाईल, असं ते म्हणाले.
“मराठवाडा ही संतांची भूमी आहे. या नव्या संतपीठातून संतांची शिकवणूक दिली जाईल. संतांची शिकवण म्हणजे काय? आम्ही कुणावर अन्याय-अत्याचार करत नाही. पण जर कुणी अत्याचार केला, तर त्याचा प्रतिकार कसा करायचा, ही आम्हाला संतांची शिकवण आहे. म्हणून एक संतपीठ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मार्गदर्शनाने आपण इथे सुरू करत आहोत. हे आज संतपीठ होतंय, ते विद्यापीठ झालं पाहिजे. जगभरातले अभ्यासक इथे अभ्यास करण्यासाठी यायला पाहिजेत”, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यासाठी अनेक महत्वपूर्ण घोषणा जाहीर केल्या. यामध्ये हिंगोली येथे दिव्यांग पुनर्वसन केंद्रासाठी ६ कोटीचा निधी, औरंगाबाद -अहमदनगर रेल्वे मार्गाला चालना, औरंगाबाद – शिर्डी हवाई सेवेची चाचपणी, औरंगाबादमधील १६८० कोटींच्या पाणी पुरवठा प्रकल्पाचे काम वेगानं पूर्ण करण्याचे निर्देश यासह अनेक मोठ्य़ा घोषणा त्यांनी या कार्यक्रमा दरम्यान केल्या.


previous post
next post