Tarun Bharat

मराठा-कुणबी विद्यार्थ्यांचे ‘जंतरमंतर’वर आंदोलन

Date : 18-02-2020

प्रतिनिधी / नवी दिल्ली

‘सारथी’च्या (छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था) ठप्प झालेल्या कारभारावर महाराष्ट्रातील मराठा-कुणबी युवक, युवतीत संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी दिल्लीत प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी येथील थेट जंतरमंतरवर आंदोलन करत राज्य सरकारसह केंद्र सरकारचेही लक्ष वेधले. दरम्यान, बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तीन दिवसांत विद्यावेतन देण्याचे आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थागित करण्याचा निर्णय घेतला.

  जानेवारीचे विद्यावेतन थकीत असताना अचानकपणे ‘सारथी’च्या काही अधिकाऱयांनी या विद्यार्थ्यांकडे ते दिल्लीत राहत असलेल्या घरमालकाबरोबर केलेल्या कराराची मागणी केल्याने विद्यार्थी संतप्त झाले. आधीच विद्यावेतन बंद झाल्याने कठीण आर्थिक आणि मानसिक परिस्थितीचा सामना करावा लागणाऱया 225 विद्यार्थी, विद्यार्थींनी नवी दिल्लीतील जंतरमंतर ठिय्या मांडत आपल्यावर होत असलेल्या अन्यायाचा जणू पाढा वाचला. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आंदोलनस्थळी भेट दिली.

फडणवीस सरकारच्या काळात मराठा-कुणबी समाजाची शिक्षण, उच्च शिक्षण क्षेत्रात प्रगती व्हावी यासाठी ‘सारथी’ संस्थेची स्थापना झाली. दहा महिन्यात ‘सारथी’ च्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगतीचा आलेख उंचावत नेताना केंद्रीय  लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत चांगली झेप घेतली. 225 विद्यार्थी, विद्यार्थिंनी सध्या सारथीच्या विद्यावेतनावर दिल्लीत या परीक्षेची तयारी करत आहेत. 3 डिसेंबरला सारथीचा कारभार ठप्प झाल्यानंतर या विद्यार्थ्यांसह इतर क्षेत्रातील परीक्षा देणाऱया व संशोधन करणाऱया 3251 विद्यार्थ्यांचे विद्यावेतन बंद झाले. जानेवारी महिन्यातील विद्यावेतन फेबुवारी महिना संपत आला तरी मिळाले नसल्याने विद्यार्थ्यांची आर्थिक आणि मानसिक कोंडी झाली आहे. दरम्यान, या प्रकरणी संभाजीराजे यांनी 7 जानेवारीला पुण्यात सारथी कार्यालयासमोर विद्यार्थ्यांसह आंदोलन केले होते. यानंतरही ‘सारथी’चा कारभार ठप्प आहे. दरम्यान, संस्थेवर हंगामी महाव्यवस्थापकपदी रायते यांची निवड झाली. याचवेळी मराठा महासंघाचे नेते राजेंद्र कोंढरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी सारथीचा कारभार पूर्ववत करून विद्यावेतन तातडीने सुरू करावे, यासाठी पाठपुरावा केला होता. रायतेंची निवड झाली तरी सरकारकडून वेगाने हालचाली होत नसल्याने आणि आर्थिक गणित बिघडत चालल्याने अखेर दिल्लीतील 225 विद्यार्थ्यांनी आंदोलनाचे अस्त्र उगारले. जंतरमंतरवर दिवसभर आंदोलन झाले.

आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

दरम्यान, बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आंदोलनकर्त्यां विद्यार्थ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधत तीन दिवसांत विद्यावेतन जमा करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

पुण्यात 7 जानेवारीला आंदोलन केल्यानंतर केवळ आश्वासन देण्यात आले. मात्र कार्यवाही झाली नाही. त्यामुळे दिल्लीतील लाभार्थी विद्यार्थ्यांना आंदोलन करावे लागले. आता या आंदोलनामुळे सारथीचा कारभार व्यवस्थित सुरू होऊन विद्यार्थ्यांचे विद्यावेतन मिळेल, अशी अपेक्षा आहे.

-खासदार संभाजीराजे छत्रपती

Related Stories

कोल्हापूरचे नवे जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Archana Banage

लाचेची बोली हजारापासून लाखांपर्यंत

Abhijeet Khandekar

गणेशोत्सवाचे निर्देश जाहीर, पण मोहरमचे काय

Archana Banage

Kolhapur : कबनूर उरुसात नोटा खपवण्याचा प्रयत्न; तिघांकडून 23 हजाराच्या बनावट नोटा जप्त

Abhijeet Khandekar

ती तर तबकडी नव्हे! हवामान खात्याचा बलून

Archana Banage

शेतकरी व कामगार कायद्याविरोधात हातकणंगले येथे आंदोलन

Archana Banage