Tarun Bharat

मराठी भाषिकांत ऐक्य राखणे हीच हुतात्म्यांना आदरांजली

खानापुरात म. ए. समितीच्यावतीने हुतात्म्यांना अभिवादन : कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती

प्रतिनिधी / खानापूर

एखाद्या लढय़ासाठी हुतात्म्यांनी दिलेले बलिदान वाया जात नाही, हा इतिहास आहे. सीमाप्रश्नासाठी देखील अनेकांनी हौतात्म्य पत्करले. गेल्या 65 वर्षात सर्वप्रकारचे लढे देऊन देखील सीमाप्रश्न सुटला नाही. आता हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात गेला असून त्या ठिकाणी सीमाभागातील जनतेला न्याय मिळेल, यात तिळमात्र शंका नाही. पण जोपर्यंत सीमाप्रश्नाची सोडवणूक होत नाही तोपर्यंत मराठी भाषिकांनी आपले ऐक्य अबाधित राखणे हीच हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन खानापूर तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष माजी आमदार दिगंबर पाटील यांनी खानापूर स्टेशनरोडवरील कै. नागाप्पा होसूरकर हुतात्मा स्मारकासमोर हुतात्म्यांना अभिवादन करताना व्यक्त केले. प्रारंभी कै. नागाप्पा होसूरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी कुप्पटगिरी ग्रामस्थांच्यावतीने माजी प्रधान नारायण मल्लाप्पा पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण केले.

 यावेळी बोलताना म. ए. समितीचे कार्याध्यक्ष यशवंत बिरजे म्हणाले, मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारने अजूनही जुलूमशाही सुरूच ठेवली आहे. त्यातूनच मराठी भाषिकांची आंदोलने दडपण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकार करत आहेत. पण कर्नाटक सरकारने मराठी भाषिकांना कितीही दडपण्याचा प्रयत्न केला तरी मराठी जनता आपल्या निर्धारापासून हटणार नाही. उलट दडपशाहीमुळे मराठी भाषिकांच्या सीमाप्रश्नाविषयीच्या भावना अधिकच ज्वलंत होतील, यात शंका नाही. सीमाप्रश्नाची सोडवणूक होईपर्यंत मराठी भाषिकांनी सर्व मतभेद बाजूला सारुन एका झेंडय़ाखाली लढा देणे हीच हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली ठरू शकेल.

यावेळी बोलताना जि. पं. सदस्य जयराम देसाई म्हणाले, मराठी भाषिक जनतेने सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी गेली 65 वर्षे सातत्याने लढा दिला आहे. सीमाभागातील जनतेची महाराष्ट्रात जाण्याची मागणी अत्यंत न्यायाची आहे. सीमालढय़ात आजपर्यंत अनेकांनी हौतात्म्य पत्करले. हुतात्म्यांचे बलिदान वाया जात नाही, हा इतिहास आहे. जोपर्यंत सीमाप्रश्न सुटत नाही. तोपर्यंत कशाचीही पर्वा न करता सर्व मराठी भाषिकांनी म. ए. समितीच्या झेंडय़ाखाली एकसंध राहणे हीच खरी हुतात्म्यांना श्रद्धांजली ठरु शकेल.

यावेळी जि. पं. माजी सदस्य विलास बेळगावकर म्हणाले, सीमाप्रश्नासाठी नेमलेल्या शिष्टमंडळाने आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे सीमाप्रश्न साडवण्याचा आग्रह धरला पाहिजे. नरेंद्र मोदी यांनी गेल्या सात वर्षात देशातील अनेक कठीण प्रश्न मार्गी लावले. तसे त्यांनी सीमाप्रश्नातही लक्ष घालून मराठी भाषिकांना न्याय द्यावा, अशी विनंती केली.

यावेळी ता. पं. सदस्य बाळाराम शेलार, प्रकाश चव्हाण, भूविकास बँकेचे अध्यक्ष मुरलीधर पाटील, माजी प्रधान नारायण पाटील, ता. पं. माजी सदस्य महादेव घाडी, माजी नगरसेवक अनिल पाटील, नारायण कापोलकर, नारायण लाड यांनी देखील आपले विचार व्यक्त करून हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी दीपक देसाई, विवेक गिरी, रुक्माण्णा झुंजवाडकर, विठ्ठल गुरव, शिवाजी पाटील, वसंत नावलकर, पुंडलिक पाटील यासह म. ए. समितीचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Related Stories

बागलकोट जिल्हय़ात आणखी 26 जणांना कोरोना बाधा

Patil_p

मतदान केंद्र स्थापन करा अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार

Patil_p

खानापूरला एकाच दिवशी 82 दावे निकाली

Amit Kulkarni

कपिलेश्वर मंदिर प्रशासक नेमणुकीला न्यायालयाची स्थगिती

Amit Kulkarni

मनपाचा पहिला बायोगॅस प्रकल्प कार्यान्वित

Amit Kulkarni

निपाणी तालुक्यात यात्रा, बाजार बंदी

tarunbharat