Tarun Bharat

मराठी ‘सद्भावने’विरोधात कर्नाटकची दडपशाही : डॉ. श्रीपाल सबनीस

Advertisements

प्रतिनिधी / कागल

जे सद्भावना रुजवण्यासाठी आले, महाराष्ट्राच्या मातीचे प्रेम घेऊन आले, अशा पाहुण्यांना मज्जाव करणे  व दिलेले निमंत्रण रद्द करण्याचे पाप कर्नाटक शासनाने केले. हे निषेधार्ह आहे. यासाठी आम्ही महाराष्ट्र-कर्नाटक सीमेलगत असलेल्या कागल शहरात हे प्रतिसंमेलन घेवून या संमेलनाचे उद्घाटन झाल्याचे जाहीर करतो, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्राचार्य डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. यावेळी कर्नाटक सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.

  सीमाभागातील इदलहोंड येथे 17 वे गुंफण सद्भभावना साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. यासाठी डॉ. श्रीपाल सबनीस हे संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषविणार होते. तशी कर्नाटक सरकारने परवानगीही दिली होती. मात्र संमेलन सुरु होण्याच्यावेळी संमेलन ठिकाणी जाण्यास कर्नाटक सरकारने त्यांना मज्जाव केला. यानंतर त्यांनी कागल येथील लक्ष्मी टेकडी मंदिरात येवून तेथे प्रतिसंमेलन घेत असल्याचे सांगून आपल्या भावना व्यक्त केल्या.

 न झालेल्या संमेलनाचा अध्यक्ष होण्याची वेळ कर्नाटक सरकारच्या नालायकपणामुळे माझ्यावर आली आहे. मात्र मी हार मानणारा नाही, असे  सांगून  डॉ. सबनीस पुढे म्हणाले, मराठी व कानडी लोकांतील सहवास अर्थपूर्ण व्हावा, त्यांच्यातील आत्मविश्वास वाढावा आणि मराठी जनतेची दुःखं आपल्याला कळावीत व आपली मराठी मातीशी असलेली बांधिलकी सिध्द करावी. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेची वादग्रस्तता संपावी, दोन प्रांताना जोडणारे हे संमेलन होते. मला विनंती केल्यानंतर मी आलो होतो. मात्र कालपासूनच नकारात्मक भूमिका कर्नाटक शासनाने घेतली होती. कर्नाटक संस्कृतीबद्दल कानडी लेखकांच्याबद्दल मला अभिमान आहे. हे लेखक राष्ट्रीय पातळीवर वंदनीय आहेत. या मातीला वंदन करावे व 20 लाख लोक जे सीमाभागात राहतात त्यांच्या भावना समजून घ्याव्यात यासाठी मी या संमेलनाचे अध्यक्षपद स्विकारले.

  डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, उध्दव ठाकरे सरकारने गेल्या दोन-तीन दिवसात हा सीमाप्रश्न सुटावा यासाठी कांही पाऊले उचलले आहेत. अशी माझी माहिती आहे. ते आवश्यक आहे. त्याबद्दल समाधान व्यक्त करणे माझे कर्तव्य आहे.    सुप्रिम कोर्टात हा सीमाप्रश्न लोंबकळत पडलेला आहे. हा विलंब संपावा यासाठी दोन्ही महाराष्ट्र-कर्नाटक सरकारने प्रयत्न करावेत. केंद्र सरकारने मध्यस्थी करुन जर कोर्टाच्या बाहेर हा प्रश्न मिटवला तर गेल्या अनेक  वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न सुटेल व सीमाभागातील 20 लाख लोकांचा श्वास मोकळा होईल. तो मराठीच्या स्पंदनाचा श्वास आहे, मराठी मातीच्या स्वप्नांचा श्वास आहे.  

ते म्हणाले, माझी समजूत होती की हिटलर मेला मात्र ती साफ खोटी ठरली. आणि येडियुराप्पांच्या निमित्ताने भाजप सरकारने या संमेलनावर बंधन घातले. संमेलनस्थळी येण्यापासून मज्जाव केला. हा हिटलरशाहीचाच एक भाग आहे.  दुटप्पी व नालायकपणाची भूमिका कोणती असेल तर ती म्हणजे दोन संमेलने होती. कुद्रेमानी संमेलन सुरु आहे. मात्र आपल्या संमेलनाला विरोध केला. आपल्याला तेथे जाण्याला मज्जाव केला. संविधान विरोधी भूमिका कर्नाटक शासनाने घेतली. मराठीचा द्वेष करुन कानडी संस्कृती उभी राहत नसते किंवा कानडीचा द्वेष करुन मराठी संस्कृती जीवंत होत नसते. म्हणून द्वेषावर आधारलेले धर्मकारण, समाजकारण मला मान्य नाही. मराठी- कानडीचा संबंध अर्थपूर्ण व्हावा. या दोघांतील विश्वास वाढावा व या मातीला वंदन करण्यासाठी आलो.

ते म्हणाले, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लोकांच्यावर गोळ्या झाडण्याची नालायकपणाची भाषा करणारा भीमा शंकर पाटील हा नालायक माणूस आहे. त्याच्या पलीकडे कर्नाटक सरकारने त्याला अटक करायला हवी होती.  मात्र जे सद्भावना रुजवण्यासाठी आले, महाराष्ट्राच्या मातीचे प्रेम घेवून आले. ज्ञानेश्वर, तुकारामाची मराठी त्याचे संचित घेवून आले अशा पाहुण्यांना मज्जाव करणे व दिलेले निमंत्रण रद्द करण्याचे पाप हे कर्नाटक शासनाने केले. हे निषेधार्ह आहे. 

एकूण देशात सर्व पेटलेल्या धर्मा-धर्माच्या, जाती-जातीच्या-राष्ट्रा-राष्ट्राच्या सीमा या सद्भभावनेने सिंचन करुन जगाचा निकाशा चिंब भिजावा, ही भूमिका बसवेश्वर चेनगे यांची होती आणि आहे. या भूमिकेला साजेल असे पर्व संमेलनातून सुरु केले होते. या पर्वाची आजची कडी निखळलेली आहे. ती कर्नाटक सरकारच्या मुर्खपणामुळे. कर्नाटक सरकारने शांतता भंग करण्याचे पाप त्यांच्याच भूमित केले. याचा मी निषेध करतो. यापुढे तरी कानडी व मराठी लोकांनी सामंजस्याची भूमिका घेवून या सीमावासियांच्या वेदनेला फुंकर घालावी वेदना मुक्त करावे, अशी भूमिकाही त्यांनी यावेळी मांडली.

  याप्रसंगी ग्रामीण साहित्यिक बबन पोतदार, गुंफण अकादमीचे अध्यक्ष डॉ. बसवेश्वर चेणगे, निवृत्त पोलीस उपअधिक्षक शिवाजीराव फाटक, साहित्यप्रेमी प्रदीप शिंगवी, मुकूंदराव महामुनी, आत्माराम हारे आदी उपस्थित होते. यावेळी कवी चंद्रकांत जोगदंड यांना गुंफण सद्भभावना पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

Related Stories

महावितरणचा अतिरिक्त कार्यकारी अभियंता लाच घेताना जेरबंद

Abhijeet Shinde

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ सरकारी कर्मचारी रस्त्यावर

Abhijeet Shinde

गोकुळ शिरगाव एमआयडीसीत गव्याचे दर्शन

Abhijeet Shinde

शाहूवाडी तालुक्यातील येळाणे येथे दंडात्मक कारवाई

Abhijeet Shinde

आदमापूर येथील बाळुमामा मंदीर ११ फेब्रुवारी रोजी बंद राहणार

Abhijeet Shinde

आष्टा नगरीच्या उपनगराध्यक्षपदी तेजश्री बोंडे यांची बिनविरोध निवड

Abhijeet Shinde
error: Content is protected !!