Tarun Bharat

मल्लू

आपण कसे हुशार आहोत, पुरुषसिंह आहोत व इतर लोक कसे मूर्ख आहेत हा विचार गोंजारत जगणारी काही माणसे असतात. हय़ा वर्गवारी वा कॅटॅगरीत बरीच उपद्रवीही माणसं असतात आणि आपण कसे चतुर डोकॅलिटीचे आहोत हे एखाद्या ओळखीच्या माणसाला वेठीस धरून  ऐकविण्यात यांना परमसुखही वाटत असतं. अन् अशावेळी आपण दुसऱयाचा वेळ नाहक बरबाद  करीत असतो, हय़ाचं यांना भान पण नसतं. समोरचा चुळबुळ करू लागला तरी, ‘अरे, बैस रे लेका, काय एवढी घाई लागलीय तुला? का कुठं लढाईवर चाल्लाईस?’ असे म्हणत उठून सटकत असलेल्या समोरच्या व्यक्तीच्या खांद्यावर दाबत, त्याला जबरीनं खाली बसवत परत आपली  कॅसेट उर्फ टकळी सुरू करतात, ‘हं।़ काय म्हणत हूतो बरं मी? – आठवलं ! तर परवा काय झालं… सांगतो तरी ऐक… जगात काय हाय, मूर्खांचा भरणा अधिक, शहाणे थोडे…’

 मल्हारगौडा चौगुलेही असलंच शॅम्पल! तसा तो माझा लंगोटीयार, म्हणजे आम्ही लंगोटा बांधून तालमीतल्या हौद्यात कुस्त्या खेळत होतो, तेव्हापासुचा! सहा फुटाच्या जवळपास सॉलीड उंची लाभलेला मल्लू ( मल्हारगौडा असं नाव म्हणत बसल्यापेक्षा आम्ही त्याला ‘मल्लू’ असेच म्हणत असू!) तडाफडीनं, चलाखीनं कुस्ती खेळण्यात पटाईत होता. डब्बल हाडापेराचा मल्लू गव्हाळ वर्णाचा होता. मध्ये बाक आलेलं त्याचं नाक शेंडय़ाला थोडं नकटं झालं होतं. त्याचे डोळे मंगोलीयन लोकांगत बारीक पिचके होते, तरी समोरच्याला जोखण्याइतके ते चतुर मारवाडय़ावानी व बेंडल नक्कीच होते. डोईवर पैलवानी कराप, गळय़ात ऊरुसात मिळणारा काळा गोफ बांधलेला आणि शरीर व स्नायू ग्रीक  शिल्पागत घोटीव! जोर- बैठका मारीत तालमीत घुमणारा  व हौद्यातील लाल मातीत समोरच्या भिडुबरोबर कुस्ती खेळणारा पैलवान पुढं तालीम सुटल्यावर थोडं तरी दोंद सुटलेला ढोबळा असा असतोच! पण जिममध्ये जाऊन शरीरसंपदा कमावलेल्या एखाद्या बॉडी बिल्डरगत मल्लुचं पोट सपाट होतं! तालमीत चल्लाख मेंदूची, चपळाईनं कुस्त्या मारणारी 3/4 पोरं होती, त्यात मल्लुही एक होता. इतकी घोटीव शरीरयष्टी ठेवलेला मल्लू पूर्णत: शाकाहारी होता. तो जैन समाजातील असल्यामुळे हे आपापत:च घडलेलं होतं. त्याचे वडील वैद्यकी करीत व थोरला भाऊ गावातल्या एका पेढीवर दिवाणजी होता.

1950 सालच्या त्या कालखंडात सर्वसाधारण परिस्थितील मुलालाही तालीम करणे काही अवघड जात नसे! रुपयाला शेरभर निच्चळ (म्ह. पाणी वगैरे न मिसळलेले) दूध तेव्हा मिळे. त्याकाळी लिटर, किलो आदी मापांचा व्यवहारात प्रवेश झाला नक्हता. चार आण्याला ( म्ह. 25 न. पैशांना) ‘हय़ा।़ अश्या’ खारका मिळत; त्या फोडून त्यातील बी टाकून 4/6 दिवस तुपात ठेवून सोडल्या की मुरत, मऊ होत व मग तुपासह त्या खाण्यात एक वेगळीच लज्जत येई. आठवडय़ातून दोनेक वेळा थंडाई करूनही आम्ही प्यायचो. थंडाई  करायचा भला मोठा खलबत्ता तालमीत होता, त्याच्या तोंडात 2/3 शेर दूध सहज मावे, इतका! त्यात दूध, बडीशेप आदी घालून आम्ही दगडाच्याच लांबटगोल बत्याने दुधात टाकलेली बडीशेप व अक्रोड, जायफळ, खसखस आदी थंडाईचा मसाला. बत्याने चांगला खलून बारीक झाला की वस्त्रगाळ करून दूध घ्यायचे, उरलेल्या चोथ्यात आणखीन दूध घालून खलायचे व परत ते दूध वस्त्रगाळ करीत रहायचे, अशी थंडाईची प्रक्रिया असे! लिंगायत समाजाच्या विवाह समारंभात जेवणासह पूर्वी मठ्ठा देत. (म्ह. मसाला घातलेले चवदार ताक!) तो मठ्ठा प्याल्यावर जशी डोळयांवर झापड येई, तशी 1/2 पेलाभर थंडाई रीचविल्यावर येत असे.

1957 साली मी एस. एस. सी. (आताची 10 वी) झाल्यावर पुढील शिक्षणाची सोय गावात नसल्याने मी कोल्हापूरला गोखले कॉलेजमध्ये दोन वर्षे काढली व इन्टर आर्टस्ला (आताच्या 12 वीला) फेल झाल्यावर गावाकडे परत आलो… इथं तालमीतील कुणी ना कुणी भेटत… चिमाजी वस्ताद, समशेर वस्ताद, भाट वस्ताद, मारुती पैलवान (56 साली राज्यपुर्नरचना होण्यापूर्वी गुजरात, महाराष्ट्र व कर्नाटक मिळून ‘मुंबई राज्य’ होते, तेव्हा सांगली, मिरजेत झालेल्या राज्यव्यापी कुस्ती स्पर्धेत  वजनी गटात मारुती चव्हाणने पहिला नंबर पटकावून ढाल जिंकून आणली होती. कुस्ती सुटल्यावर म्युन्सिपालीटीतील लाईट खात्यात रिटायर्ड होऊपर्यंत नोकरी केली होती. इतका मोठा माणूस आपल्यात आहे, हे खुद्द तेथील सहकाऱयांनाही ज्ञात नव्हतं!) बादशहा पैलवान,  वाळकीचे के. पी. पाटील (हे पुढे इंग्लिश घेऊन एम. ए. झाले, शिक्षणाइतकी उंच झेप घेणारे आमच्या भागातील ते पहिलेच पैलवान!) बालवयाच्या अण्णासाहेब तारळेनाही त्यांचे वडील रोज पुढे घालून तालमीला घेऊन येत. (हे अण्णासाहेब आता स्वयंपाकाच्या एच. पी. गॅसचे डीलर आहेत.) त्या काळी तालमीत येणारे कधी- मधी भेटल्यावर जुन्या आठवणी निघत. कुस्तीत पटाईत असलेल्या पोलादी कांबीसारख्या शरीरयष्टीच्या मल्लूची आठवण ताजी होई… त्यानं मिलिटरी जॉईन केल्याचं समजलं. घरची यथातथा परिस्थिती त्यात विशेष शिक्षणही नसलेला मल्लू करणार तरी काय? त्याला साधा, सरळ मार्ग दिसला- मिलिटरीत भरती होणे!

असेच दिवस, महिने व वर्षे उलटत गेली… किती? रोजच्या धबडग्यात याचा हिशोब तरी कोण ठेवणार? मग असाच एके दिवशी मल्लू गावात दिसला आणि मग आम्ही एकमेकांना ‘अरे तू?’- ‘अरे तू?’ असे आश्चर्येद्गार पण काढले. त्याने माझी चौकशी केली, मी पण त्याची…

‘आता मी मिलीटरीतनं रिटायर्ड झालोय्. आनी सध्या एका पाव्हण्यांच्याच ट्रकवर  ड्रायव्हरकी करतोय!’ त्यानं आपल्या विषयी सांगितलं.

यानंतर एक – दोन वर्षे उलटल्यावर असाच अचानक तो भेटला तशी मी त्याची चौकशी केली,

‘मल्लू अलीकडं कुठं दिसेनास रे तू? कुठं असतोस तरी कुठं?’

‘नुकताच मी एक ट्रक ईकत घेतलाय. सेकंड हॅण्ड, त्यो लायनीवर बॉम्बे, बेंगलोर, घुमवितो.’

त्यानं  असं सांगितलं तरी त्याचा व माझा दोस्त असलेला साळुंखेनं तरी मला स्पष्टच सांगितलं.

‘खोटं बोलतोय त्यो! हय़ो थापाडय़ा काय ट्रक घेतोय? ट्रक घेणं काय सोपं हाय? उगंच भम्प मारतोय् सगळय़ांच्या म्होरं!’

मल्लू सोसाटय़ाच्या वाऱयागत कधी-मधी उपटायचा व आपल्या उपरोधिक बोलण्याने माझा कचरा वा फलुदा करीत रहायचा… त्याच्यापुढे आपण अगदीच नगण्य, टीनपाट आहोत, असे मग वाटत राहायचे…

एकदा असेच झाले…आल्या-आल्या अत्यंत नाटकी पोझ घेऊन मला डोकीपासून पायापर्यंत  न्याहाळत व नाटकीच आवाज काढीत तो म्हणाला,

‘काय कराय् लागलाईस रे तू हे? काय मिळतंय काय तुला हय़ा धंद्यात? किती मिळवितोस?’

आपल्या मिळगतीचा वा प्राप्तीचा कुणी खरा आकडा कधी सांगत नाहीत! पुरुष प्राप्ती जास्त सांगतो, तर स्त्रिया आपले वय कमी सांगतात! मी माझी खरी प्राप्ती त्याला सांगताच वेगळाच नाटकी आवाज काढीत तो म्हणाला,

‘हॅट्! ही काय मिळगत झाली? तू एखादी जुनी सेकंड हॅण्ड गाडी घिऊन टय़ाक्षी धंदा का करीत न्हाईस?’

‘हे बघ, बघितलास न्हवं त्या टय़ाक्षा कशा ओळीनं उभा ऱहायल्यात?’ मी  काम करीत असलेल्या शेडमधून थोडय़ा दूर अंतरावर टॅक्षी स्टॅण्ड होतं, तेथे भाडय़ाची प्रतीक्षा करीत उभ्या असलेल्या टॅक्षी गाडय़ांकडे अंगुलीनिर्देश करीत मी त्याला म्हंटलं,

‘बघ, एक तरी गाडी हललीया काय तिथनं? जो- तो टॅक्स घ्यायला लागलाय! दोन  ऍम्बेसडर न्हाय्तर इंडिकात मावतील एवढी लोकं एका ट्रक्समदी मावत्यात आनी दोन्हींचं भाडंबी जवळ जवळ तेवढंच ! एक ट्रक्स काढली की आपली तीन चार लोकं आणखीन त्यात मावतयात म्हणून सगळी ट्रक्सच काढाय् लागल्यात, त्यामुळं  इतर गाडय़ांचा धंदा बेंबलला! नि मी त्याला विचारलं, ‘तू काय  करतोस हल्ली? तुझी ट्रक हुती न्हवं?’

‘ती ईकलो! आता दुसऱयांच्या ट्रकवर डायवर हाय! बॉम्बे- बेंगलोर लाईनवर ट्रक फिरवितो. बेंगलोरची एक ट्रीप मारून आलो की सीटांचं तीन हजार नि बॉम्बे कडनं आलो की दोन हजार एवढी वरकड कमाई हुतीया, शिवाय मालक पगार पाच हजार देतोय् शिवाय माजं मिलीट्रीतनं दीड हजार पेन्शन येतंय, बस्स की, आनी काय पायजे?’ तो म्हणाला, ‘सीटा’ म्हणजे ट्रकमध्ये माणसे बसवितात त्या!!

‘किती वरसं हुतास मिलीटरीत?’ मी विचारलं.

‘वीस वरसं हुतो बघ! तिथं येणाऱया रिप्रुटास्नी मी सगळं खेळ शिकवायचा. कुस्ती, लेझीम, मल्लखांब, दांडपट्टा, लाठी असा ऑलराउंड हुतो म्हनंनास! मिलीटरीत दारू, मटण, चिकन चिक्कार आस्तंय, पन मी कशालाबी शिवलं न्हाई बघ! आमचा आपला फळावर जोर, केळी, सफरचंद, मोसंबी, चिक्कू हे असलं सारं! आम्हा खेळाडुस्नी हय़े।़ अस्सं, प्वाटभर खाऊन आनी उरायचं, ते सारं मी घराकडं नेई! तवा मी माजी पऱयामीली तिकडं न्हेलीती! प्यारासूट ट्रेनिंगसाठी मदी नोटीस फिरली, तिथं लै त्रास हुतोय, म्हणून आमच्यातलं कोणबी जायला तयार न्हाई! पण मी एकटाच ‘जातो’ असं म्हणणारा! सा।़ म्हैन्याचं त्ये टेनिंग लै कडक रे बाबा! रिप्रुटास्नी धड उठाय्- बसाय येत न्हाई, असा पिट्टा पाडत्यात! पन मला देवाशप्पथ सांगतो, आजिबात त्रास झाला न्हाई? का? तर हय़ो पठ्ठय़ा तालमीतल्या हौद्यातल्या मातीत कुस्ती खेळून रंगल्याला माणूस! पाकिस्तान, चीन, बांगलादेश,… तिन्हींच्या बरोबर झाल्याल्या वॉरमदी  मी  भाग घेटला!’ नि त्यानं आपलं मुंडकं माझ्यापुढं केलं, नि उलटय़ा पिसाच्या कोंबडय़ागत डोकीवर ताठ उभे असलेले इंचभर उंचीचे केस बाजूस करीत आत टप्पारावर असलेला खुरप्याच्या पात्यागत व्रण दाखविला न् तो म्हणाला, ‘ही बघ, त्या वॉरची खूण! वीस वर्सानं तिथंन रिटायर्ड झालो! दोन पोरी हैत एक पोरगा- पोरगा बेंगलोरला सायबर व्हॅलीत नोकरी करतोय, थोरल्या पोरीला श्रीमंतांचं स्थळ आलं हुतं, पन मी न्हाई दिलं तिथं! श्रीमंतांची पोरं हाल्ली काय करीत आस्त्यात म्हंतोस? दारु ढोसून भाहीर येसवाबायांची हातरुणं उबवीत पडल्याली आस्त्यात नि घरात त्येंच्या बायका झुरणी खावून पालीवानी पांढऱया शिप्पीट पडल्याल्या आसत्यात! त्यापेक्षा एखाद्या गरिबा घरच्या नोकरीवाल्या राबल्याल्या पोराला दिली पोरगी! ती आपल्या सौंसारात सुखीसमाधानी तरी ऱहाईल, व्हय् का न्हाई? का, काय माझं चुकलं?’

‘न्हाई, काई चुकलं न्हाई, बरोब्बर हाय तुज!’ मी सहजानवारी बोलून गेलो.

माझ्या एवढय़ा बोलण्याने जुन्या ‘फोनु’ ला चावी द्यावी, तसे झालं. जुन्या ग्रामोफोन वरील रेकॉर्ड चावी संपत आल्यावर परत चावीचं हॅण्डेल फिरविलं की तीतून पूर्वीसारखे  शब्द पूर्वीच्याच जोमाने उठू लागत, तसे झाले. मल्लू नव्या उत्साहानं सुखी माणसाचा सदरा घातल्यावानी बोलत राहिला… त्यानं वेठीस धरलेला मी श्रोता झक्कत त्याची रेकॉर्ड ऐकत राहण्याची शिक्षा भोगत राहिलो… तोवर दोघे- तिघे खेडूत  बाजारपेठेतून बाजार करून यस्टी स्टॅण्टच्या दिशेने चाललेले त्याला दिसले… त्यातील एकाच्या अंगावर कोड फुटलेले दिसत होते… ते पाहून मल्लुने त्याला हाक मारली.

‘ये पावन्या,थांब खा जरा!’

टापोटाप चाललेल्या गाडीला ब्रेक लागावा, तसे झाले. ते तिघेही प्रश्नार्थक चेहरे करीत थांबले, तसा मल्लू त्या कोड भरलेल्या खेडुतापुढे उभा रहात म्हणाला,

‘तुझ्या आंगावर हय़ा कोड फुटलेल्यावर माज्याकडं औषीद हाय, यस्टीलाच चाल्वीया न्हवं, चल- माजंबी तिकडंच काम हाय, चालता- चालता सांगतो…’ आणि मल्लू तो माणूस काही ‘न्हाई व्हय’ बोलायच्या आत त्याच्या खांद्यावर हात टाकून त्याच्याबरोबर बोलत, औषध सांगत चालू लागला…

त्याचा दिवंगत बाबा वैद्य होता, लोकांना औषधं द्यायचा, त्याचं ऐकून हय़ालाही त्यात थोडी गती प्राप्त झाली असेलही, पण हा रोग समूळ नाहीसा होण्याचं औषध अजून तरी जगात कुठं निघालं नाही, हे मल्लुला कोण सांगणार?

पण मी मात्र मल्लुच्या तडाख्यातनं सुटलो म्हणून सुखाचा एक नि:श्वास टाकला! त्यानंतर तो कुठे दिसला की ऋणकोनं धनकोला चुकवावं, तसा मी बाजूच्या गल्लीत घुसतो! कारण, त्याची रेकॉर्ड ऐकून स्वत:ला कचरा करून घेण्यात काही फारसं सुख आहे, असं मला वाटत नाही!!

Related Stories

थोडंसं खोलात….4

Patil_p

भरती प्रक्रिया

Patil_p

मालमत्ता खरेदीची पंचसूत्री

Patil_p

बांधकाम क्षेत्र संकटातून बाहेर येईल

Patil_p

झगमगती दुबई

Patil_p

गृहसजावटीचा बदलता अंदाज

Patil_p