Tarun Bharat

मसूरमध्ये डॉक्टरच्या बंगल्यावर सशस्त्र दरोडा

प्रतिनिधी/ मसूर

कराड तालुक्यातील मसूर येथे बुधवारी पहाटे निवृत्त पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या घरावर सहा ते सात दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला. दरोडेखोरांनी घरातील वृद्ध दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला करत पाच लाखांच्या सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोकड लुटली. तोंड बांधून आलेल्या दरोडेखोरांनी डॉक्टरांच्या घरातही तोडफोड करत त्यांच्या चारचाकी गाडीचे नुकसान केले. सुमारे अर्धा तास दरोडेखोरांनी दहशत माजवून तेथून पलायन केले. 

 डॉ. संपत इराप्पा वारे व सौ. अनिता संपत वारे हे दाम्पत्य दरोडेखोरांच्या मारहाणीत गंभीर जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर कराडला खासगी रूग्णालयात उपचार सुरू असून वारे कुटुंबासह संतोषीमाता नगर परिसरात या घटनेने घबराट निर्माण झाली आहे. दरम्यान, आणखी दोन घरांवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याप्रकरणी पूजा नितीराज वारे (वय 27) यांनी उंब्रज पोलिसात फिर्याद दिली आहे.

पहाटे पावणेतीनला दरोडेखोर बंगल्यात

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. संपत वारे हे पशुवैद्यकीय व्यवसाय करतात. त्यांची दोन मुले, सून आणि पत्नीसह ते संतोषीमातानगर येथील घरात वास्तव्य करतात. 1 मार्च रोजी रात्री वारे कुटुंबीय जेवण करून टी. व्ही. पाहात बसले होते. त्यांच्या शेजारी पुष्पा जगदाळे या राहतात. त्यांची दोन्ही मुले पुण्याला असतात. 1 तारखेला रात्री पुष्पा जगदाळे या वारे यांच्या घरी रात्री झोपायला आल्या होत्या. रात्री बारा वाजेपर्यंत टी. व्ही पाहिल्यावर डॉक्टर वारे यांचा मुलगा नितीराज, त्याची पत्नी पूजा व मुलगी श्रीशा हे वरच्या मजल्यावरील बेडरूममध्ये गेले. तर वारे यांचा थोरला मुलगा पुष्पशील पहिल्या मजल्यावरील समोरच्या बेडरूममध्ये झोपला होता. डॉक्टर वारे व त्यांच्या पत्नी या तळमजल्यावरील बेडरूममध्ये झोपी गेल्या. शेजारील पुष्पा जगदाळे या हॉलमध्ये झोपलेल्या होत्या. रात्री पावणे तीन वाजण्याच्या सुमारास अनोळखी चार ते पाच दरोडेखोरांनी वारे यांच्या घराच्या मुख्य दरवाजाची कडी उचकटून आत प्रवेश केला.

दांडक्याने मारहाण, दागिने हिसकावले

हातात दांडके घेतलेल्या सहा ते सात दरोडेखोरांनी डॉ. वारे झोपलेल्या बेडरूमचा दरवाजा ठोठावून त्यांना जागे केले. दरवाजा उघडताच दरोडेखोरांनी डॉक्टरांना मारहाण करत दहशत माजवायला सुरूवात केली. त्यांनी वारे यांच्या तोंडावर व हातावर दांडक्याने मारून जखमी केले. अचानक झालेल्या हल्ल्याने डॉक्टरांसह पत्नी अनिता घाबरल्या. त्यांनी दरेडेखोरांना आम्हाला मारू नका, अशी विनवणी केली. मात्र दरोडेखोर ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. त्यांनी अनिता यांच्या डाव्या हातावर, तोंडावर निर्दयीपणे दांडक्याने फटके मारले. त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मिनी गंठण, कानातील रिंगा, बेडरूममधील लाकडी कपाटातील गंठण व कानातील झुबे हिसकावून घेतले. 

दागिने दे…अन्यथा मारून टाकीन

डॉक्टर व त्यांच्या पत्नी यांना आवाज करायचा नाही, अशी धमकी देत दरोडेखोर त्यांच्या खोलीतून बाहेर पडत हॉलमध्ये आले. हॉलमध्ये झोपलेल्या पुष्पा जगदाळे यांना दांडक्याने हलवत जागे केले. ‘ए म्हातारे तुझ्या गळ्यातील व कानातील दागिने काढून दे नाहीतर तुला मारून टाकीन’ अशी धमकी दरोडेखोरांनी दिली. झोपेतून जागे झालेल्या पुष्पा यांना काही तरी विपरित घडत असल्याची जाणीव झाली असावी. त्यांनी भीतीने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे तीन तोळ्याची मोहन माळ व हातातील सोन्याची अंगठी काढून दरोडेखोरांना दिली. पुष्पा यांनी उशीजवळ ठेवलेल्या कापडी पिशवीतली नऊ हजारांची रुपये रोकडही दरोडेखोरांनी काढून घेतली. जाग्या झालेल्या पुष्पा जगदाळे यांच्यावर पाळत ठेवत काही दरोडेखोर तेथेच थांबले तर बाकीचे वरच्या मजल्यावर गेले. 

पोलिसांना फोन करायचा नाही

 पहिल्या मजल्यावर डॉक्टर वारे यांच्या मुलाच्या बेडरूमचा दरवाजा दरोडेखोरांनी ठोठावला. दरवाजाचा आवाज येताच नितीराज व पूजा जागे झाले. त्यांनी लाईट सुरू करून दरवाजा उघडताच दरोडेखोर हातात दांडके घेऊन बेडरूममध्ये शिरले. आवाज करायचा नाही, अशी धमकी दिली. दरोडेखोरांनी पूजा यांनाही जीवंत न सोडण्याची धमकी देत गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने काढून द्यायला भाग पाडले. दरोडेखोरांच्या दहशतीमुळे पूजा यांनी गळ्यातील सोन्याचे मिनी गंठण व कानातील टॉप्स त्यांना काढून दिले. त्यानंतर दरोडेखोरांनी बेडरूममधील लाकडी कपाटाचा दरवाजा उघडून कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त फेकून दिले. त्यातील लॉकरमधील सोन्याचे गंठण, एक नेकलेस लहान मुलीच्या सोन्याच्या दोन साखळ्या, दोन बदाम व चांदीचे पैंजण घेऊन दरोडेखोर पुन्हा खालच्या मजल्यावर निघाले. जाताना त्यांनी नितीराज व पूजा यांना धमकावत कुणाला फोन करायचा नाही असे बजावले. 

कारची चावी घेऊन दरोडेखोर पसार

दरोडेखोर खालच्या मजल्यावर येत असतानाच धाडस करत नीतीराज व पूजा हे दोघेही त्यांच्या पाठोपाठ खाली येऊ लागले. मात्र जखमी अवस्थेत खालच्या मजल्यावर असलेल्या डॉ. वारे व त्यांची पत्नी अनिता यांनी त्या दोघांनाही खाली येऊ नका असे हळूच खुणावले. मात्र जखमी आई वडिलांना पाहून नितीराज व पुजा यांनी दरोडेखोरांच्या पाठीमागे येत ते पुढे काय करतात, याचा अंदाज घ्यायला सुरूवात केली. दरोडेखोरांनी खाली आल्यावर डॉ. वारे यांना बाहेर लावलेल्या चारचाकी गाडीची चावी मागत पुन्हा मारहाण केली. गाडीची चावी घेतल्यावर दरोडोखोर बाहेर पडले त्यांनी चारचाकी गाडीची काच फोडून पलायन केले. 

सूनबाईंसह वारे कुटुंबीयांनी दाखवले प्रसंगावधान

घरावर अचानक दरोडा पडल्यानंतर वारे कुटुंबीय धास्तावले होते. दरोडेखोरांची सातत्याने होणारी मारहाण पाहून वारे कुटुंबीयांनी संयम आणि प्रसंगावधान दोन्ही दाखवले. दरोडेखोर पसार होताच पूजा वारे यांनी लगेचच गुगलवरून उंब्रज पोलिसांचा नंबर मिळवत पोलीस ठाण्यात दरोडा पडल्याची खबर दिली. 

पोलिसांकडून जिल्हाभर नाकाबंदी

पूजा वारे यांनी फोन करताच रात्रगस्तीला असलेले उंब्रज पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक अजय गोरड, मसूर दूरक्षेत्राचे उपनिरीक्षक महेश पाटील वेगाने संतोषीमातानगर येथे सायरन वाजवत दाखल झाले. पोलिसांनी घटनेची माहिती घेत प्रथम जखमींना उपचारासाठी हलवले. पोलिसांनी कराड शहर, तालुका, महामार्ग पोलीस, रहिमतपूर पोलीस, पुसेसावळी भागात संपर्क करत नाकाबंदी व वाहन तपासणी सुरू केली. दरम्यान  एसपी अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक  अजित बोराडे, डीवायएसपी डॉ. रणजीत पाटील यांनी पहाटेच घटनास्थळी माहिती घेतली.  

दरोडेखोरांचे संभाषण मराठीत

डॉ. वारे यांच्या घरावर दरोडा टाकण्यासाठी आलेले दरोडेखोर हे 20 ते 30 या वयोगटातील होते. दरोडेखोरांनी अंगात जॅकेट, हात मोजे, तोंडाला मास्क लावलेले होते. दरोडेखोरांपैकी एक जण मराठीत बोलत होता व बाकीचे सगळे त्याचे ऐकत होते. दरोडेखोरांनी वारे यांच्याकडील मोबाईल घेतले होते. त्यानंतर जाताना मोबाईल व गाडीची चावी गाडीच्या खाली टाकून निघून गेले.

Related Stories

दूध अनुदानासाठी भाजपाचा आंदोलनाचा इशारा

Patil_p

कासचे पाणी दोन दिवस बंद राहणार

Archana Banage

कुसूरमध्ये शेतात आढळले तीन बछडे

Patil_p

महाराष्ट्रात 3,513 कोरोनाबाधित बरे

Tousif Mujawar

नेत्यांकडून मतांची गणिते, `हातच्या’ मतदारांकडे!

Abhijeet Khandekar

जिल्हा कारागृहातील ‘त्या’ कैद्यावर आणखी एक गुन्हा दाखल

datta jadhav