Tarun Bharat

महागाईचा भडका, सर्वसामान्यांची होरपळ

Advertisements

गॅस दरात 15 दिवसांत 50 रुपयांची वाढ : कोरोना, शासकीय धोरणांमुळे आर्थिक घडीच विस्कटली

प्रतिनिधी / बेळगाव

कोरोना व लॉकडाऊनमुळे गेल्या दोन वर्षांत लाखो जणांना रोजगार गमावण्याची वेळ आली. अनेकांना वेतन कपातीचाही फटका बसला. अशावेळी सर्वसामान्य कुटुंबांची बचत तर दूरच उदरनिर्वाह करण्याची धडपड सुरू असताना शासनाच्या धोरणांचा परिणाम म्हणून महागाईचा भडका उडाल्याचे दिसत आहे. घरगुती गॅस सिलिंडरमध्ये बुधवारी 25 रुपयांची वाढ झाली. पेट्रोल, डिझेल, गॅस, गोडेतेल यांच्यामध्ये दरवाढीची जणू स्पर्धाच लागल्याचे दिसत आहे. महागाईच्या या आगीत सामान्य कुटुंबे होरपळली जात असून त्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.

गॅस दरवाढीने पोटात गोळा

बुधवारी घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती 25 रुपयांनी तर व्यावसायिक वापराच्या सिलिंडर दरात 50 रुपयांची वाढ झाली. गेल्या सात वर्षांत सिलिंडर दरात तब्बल 474 रुपयांची वाढ झाली आहे. तर गेल्या आठ महिन्यात सिलिंडर दर तब्बल 190 रुपयांनी वाढले आहेत. नव्या दरवाढीनंतर घरगुती गॅस सिलिंडरचा दर आता 892 रुपये इतका झाला आहे. याशिवाय घरपोच सेवेच्या नावाखाली अतिरिक्त 20 रुपयांची नियमबाह्य आकारणी केली जात आहे. याबाबत कोणीही आवाज उठवताना दिसत नाही. गेल्या दोन वर्षांपासून तर सिलिंडरचे अनुदानच बँक खात्यात जमा झालेले नाही. त्यामुळे अनुदान थेट बँक खात्यात जमा करण्याचे सांगून नागरिकांच्या डोळय़ात धूळफेक करण्यात आल्याचा आरोप होत आहे.

पेट्रोल, डिझेलने पकडला गाडीचा वेग  

गॅसबरोबरच पेट्रोल व डिझेलही सातत्याने वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. यंदा 1 जानेवारीपासून आतापर्यंत पेट्रोल प्रतिलिटर तब्बल 19 रुपये तर डिझेल 16 रुपयांनी महाग झाले आहे. गेल्या दोन वर्षांत तर इंधन दराने गाडीचा वेगच पकडल्याचे दिसत आहे. या वाढीमुळे साहाजिकच वाहतूक खर्च वाढत असल्याने भाडेवाढही झाली आहे. परिणामी वाढीव वाहतूक खर्चाचे कारण सांगत वस्तूंच्या किमतीही वाढत चालल्या आहेत. दुचाकी तसेच चारचाकी वाहनांचे दर तब्बल 25 टक्क्मयांनी वाढले आहेत. त्यापाठोपाठ इंधन दरवाढही सुरू असल्याने यातून सामान्य जनतेची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा संताप व्यक्त होत आहे.

गोडे तेल झाले तिखट 

घरगुती वापराच्या खाद्यतेलाने तर एक वर्षाच्या आतच दुप्पट दराची उसळी मारल्याचे दिसून येते. गेल्या दिवाळीमध्ये खाद्यतेल 90 ते 95 रुपये प्रतिकिलो या दराने विकले जात होते. तेच आता 160 ते 180 रुपये किलो याप्रमाणे विक्री होत आहे. गेल्यावषी परदेशातून आयात होणाऱया पामतेलावर केंद्र सरकारने निर्बंध घातल्यामुळे हे दर वाढले होते. सध्या निर्बंध शिथिल केल्यामुळे दर काहीसे उतरत आहेत. पण गतवषीच्या तुलनेत अजूनही हे दर दुप्पट असल्यामुळे सामान्य कुटुंबांसाठी जेवण अधिकच महाग होत चालले आहे.

डाळ शिजनेही झाले कठीण  गेल्या दोन वर्षात डाळींच्या दरातही दीडपट वाढ झाल्याचे दिसत आहे. सध्या तूरडाळ प्रतिकिलो 120 रुपये, मूगडाळ 115 रुपये, मसूर डाळ 102 रुपये, मटकी 90 रुपये, हिरवा वाटाणा 140 रुपये, मूग 110 रुपये याप्रमाणे विकले जात आहे. सीमाभागात बहुतांशी महाराष्ट्रातून डाळींची आवक होते. मात्र गेल्या काही वर्षात मराठवाडय़ात सिंचनाची सोय झाल्यामुळे तेथे उसासह अन्य व्यापारी पिकांचे उत्पादन वाढले आहे. परिणामी डाळींचे उत्पादन घटल्यामुळे त्याचा परिणाम म्हणून दरवाढ झाल्याचे व्यापारी वर्गातून सांगितले जात आहे.

Related Stories

शहरात उन्हाच्या चटक्यांसह पाणीटंचाईची झळ

Amit Kulkarni

‘खुली जागा’ फलक होताहेत रात्रीत गायब

Amit Kulkarni

हिंडलगा ग्रा. पं. सदस्यांकडून पीडीओ धारेवर

Amit Kulkarni

नववर्षाला पाणी समस्या सुरू

Patil_p

अर्णा, प्रितम, तनिष्का विजेते

Amit Kulkarni

असोगा बंधाऱयाच्या डागडुजीकडे लघुपाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

Tousif Mujawar
error: Content is protected !!