Tarun Bharat

महात्मा गांधी नगरविकास कामाच्या निविदा रद्द करण्याची मागणी

पाच कोटी पॅकेजच्या निविदा काढण्यात आल्याने कंत्राटदार असोसिएशनचा आक्षेप

प्रतिनिधी/ बेळगाव

महात्मा गांधी शहर विकास योजनेंतर्गत 125 कोटीची विकासकामे राबविण्याकरिता महापालिकेने पाच कोटी पॅकेजच्या निविदा काढल्या आहेत. मात्र याला बेळगाव महापालिका कंत्राटदार असोसिएशनने आक्षेप घेतला असून, केवळ बडय़ा कंत्राटदारांनाच निविदा प्रक्रियेत भाग घेता येतो. लहान कंत्राटदारांना सहभागी होत येत नाही. त्यामुळे सदर निविदा प्रक्रिया रद्द करावी, अशा मागणीचे निवेदन महापालिका आयुक्तांना शुक्रवारी दिले.

शहर विकासासाठी मंजूर करण्यात आलेल्या 125 कोटी अनुदानांतर्गत शहरातील विविध विकासकामांचा समावेश करण्यात आला आहे. गटारीचे बांधकाम, रस्त्याचे डांबरीकरण व काँक्रिटीकरण, ड्रेनेज वाहिन्या घालणे, पथदीप बसविणे अशा विविध कामांसाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. सदर निधीअंतर्गत एक कोटीच्या विकासकामांचा कृती आराखडा करून शासनाकडून प्रशासकीय मंजुरी घेण्यात आली आहे. मात्र निविदा प्रक्रिया राबविताना पाच कोटी पॅकेजच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. दि. 11 डिसेंबर रोजी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. त्यामुळे सदर निविदा प्रक्रिया रद्द करण्याची मागणी महापालिका कंत्राटदार असोसिएशनने केली आहे.

लहान पॅकेज करून निविदा काढण्याची मागणी

पाच कोटीच्या पॅकेजमध्ये लहान-मोठय़ा सर्व कामांचा समावेश आहे. तसेच एका परिसरातील कामांचा समावेश न करता विविध ठिकाणाच्या विकासकामांचा समावेश पॅकेजमध्ये करण्यात आला आहे. पाच कोटीच्या निविदा प्रक्रियेत केवळ मोठय़ा कंत्राटदारांना लाभ होणार आहे. यामध्ये लहान कंत्राटदारांना सहभाग घेता येत नाही. तसेच लहान लहान कामांचे एकत्रिकरण करून निविदा काढण्यात आल्या आहेत. सदर कामे वेळेत होऊ शकत नाहीत. जर लहान पॅकेज करून निविदा काढल्यास निविदा प्रक्रियेत स्पर्धा निर्माण होऊ शकते. तसेच कंत्राटदारांची संख्या वाढल्याने कामे वेळेत होऊ शकतात.

स्थानिक कंत्राटदारांना संधी द्या

पाच कोटीच्या पॅकेजच्या निविदांचे काम पूर्ण होण्यास दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागत आहे. तसेच सदर प्रक्रियेत स्थानिक कंत्राटदारांना संधी मिळत नाही. स्थानिक कंत्राटदारांना संधी देण्यात आल्यास कामांचा दर्जा वाढेल, तसेच कामे वेळेत होतील. त्यामुळे निविदा प्रक्रिया लहान पॅकेजमध्ये राबविण्यात याव्यात. लहान पॅकेजमुळे स्थानिक कंत्राटदारांना वाव मिळू शकतो व नवीन मशिनरी घेऊन कामे पूर्ण करण्यास संधी मिळू शकते. कामे पूर्ण झाल्यानंतर स्थानिक कंत्राटदारांकडून विकासकामांची देखभाल व्यवस्थित होऊ शकते.

मागील 40 वर्षांपासून लहान कंत्राटदार कामे करून उदरनिर्वाह करतात. पण शासनाकडून वेळेत बिले होत नसल्यामुळे नुकसान सोसावे लागले आहे. सध्या लहान कंत्राटदारांना शह देण्यासाठी मोठे पॅकेज करून बडय़ा कंत्राटदारांना कामे देण्यात येत आहेत. त्यामुळे सदर निविदा प्रक्रिया रद्द करण्यात यावी व लहान पॅकेजच्या निविदा राबविण्यात याव्यात, अशी मागणी कंत्राटदार संघटनेने केली आहे. सदर निविदेची प्रत जिल्हाधिकाऱयांसह महापालिका आयुक्तांना देण्यात आली आहे.

याबाबत नगरविकास खात्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी दिले आहे.

Related Stories

खानापुरात विविध संघटनांतर्फे शिवजयंती साजरी

Amit Kulkarni

बुधवारी जिल्हय़ात 122 जणांना कोरोना

Amit Kulkarni

खानापूर महामार्गावरील निम्म्याहून अधिक हायमास्ट बंद

Amit Kulkarni

कर्नाटकात प्रथमच डी लायसन्स फुटबॉल प्रशिक्षणाला बेळगावात प्रारंभ

Amit Kulkarni

पोलीस अधिकाऱयांची तत्परता, वेळेत पोहोचला रक्तदाता

Omkar B

योजना पूर्ण केल्यास तुम्हाला आशीर्वाद मिळेल!

Amit Kulkarni