सहा वर्षात 25 हजार रूग्णांवर मोफत शस्त्रक्रिया
जान्हवी पाटील/ रत्नागिरी
शासनाच्या शेकडो आरोग्यदायी योजना आहेत, मात्र त्याची अंमलबजावणी प्रत्यक्षात होत नाही. रूग्ण व नातेवाईकांना या योजना माहिती नसतात. अशातच काही योजना एखाद्याला नवसंजीवनी देवून जातात. यातील एक योजना म्हणजे ‘महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना’. या योजनेची अंमलबजावणी मात्र रत्नागिरी जिल्हय़ात खूप चांगल्या प्रकारे सुरू असून गेल्या 6 वर्षात 25 हजार विविध गंभीर आजारांच्या रूग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत तर यासाठी शासनाकडून 33 कोटी 34 लाख 52 हजार इतका निधी खर्च करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी दिली.
एखाद्या मोठय़ा आजारावर खासगी रूग्णालयात उपचार घ्यावयाचे झाल्यास लाखो रूपये फी मोजावी लागते. सर्वसामान्य रूग्णांना हा खर्च परवडणारा नसतो. त्यामुळे ते जिल्हा रूग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल होतात, मात्र रूग्णालयात आधुनिक उपचार पध्दती सुविधा उपलब्ध असली तरी या सुविधा चालवण्यासाठी तज्ञ वैद्यकीय अधिकारी नाहीत. जे आहेत त्यांच्याकडून काही प्रमाणात शस्त्रक्रिया केल्या जातात. त्यामुळे सर्वसामान्य रूग्णांनाही सगळय़ा प्रकारचे उपचार कमी फी अथवा मोफत मिळावेत, या उद्देशाने 2013-2014 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना सुरू झाली. यात काही खासगी सर्वसोयींयुक्त हॉस्पीटलचा समावेश करण्यात आला. यामध्ये रत्नागिरी सिव्हील हॉस्पीटलसह लाईफ केअर हॉस्पीटल, परकार हॉस्पीटल, दीनदयाळ उपाध्ये हॉस्पीटल, लोटलीकर हॉस्पीटल, डेरवण वालावलकर हॉस्पीटलचा या योजनेत समावेश आहे. त्यामुळे या योजनेंतर्गत या 6 हॉस्पीटलमध्ये मोफत उपचार केले जातात आणि याचा खर्च शासनाकडून खासगी हॉस्पीटलला क्लेम केला जातो. गेल्या 4 वर्षात सर्वाधिक उपचार व शस्त्रक्रिया डेरवण वालावलकर हॉस्पीटलमध्ये झाल्या आहेत. येथे तब्बल 15 हजार रूग्णांवर विविध शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
जिल्हा रूग्णालयात तज्ञांअभावी सगळेच उपचार व शस्त्रक्रिया होतातच असे नाही. तरीही जेवढे शक्य आहे तितक्या शस्त्रक्रिया सिव्हीलकडून करण्यात आल्या आहेत. यामध्ये 1 हजार 887 रूग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. या योजनेमुळे अनेकांना नवसंजीवनी मिळाली आहे.
महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेंतर्गत जिल्हय़ातील 6 हॉस्पीटलमध्ये गेल्या 6 वर्षात पार पडलेल्या शस्त्रक्रिया पुढीलप्रमाणे:
हॉस्पीटलचे नाव रूग्ण संख्या खर्च
सिव्हील हॉस्पीटल 1887 1,45,45, 580
लाईफ केअर 1296 1,95,83,325
परकार हॉस्पीटल 4405 7,51,30,644
दीनदयाळ उपाध्ये 1581 2,61,66,310
लोटलीकर हॉस्पीटल 1142 4,92,62,798
डेरवण वालावलकर हॉस्पीटल 15032 14,87,63,658
एकूण 23238 33,34,52,315