Tarun Bharat

महापालिका जलअभियंतापदाची खुर्ची रिकामीच

प्रतिनिधी / कोल्हापूर

महापालिकेच्या शहर पाणी पुरवठा विभागापुढील विघ्न संपता संपेना अशी स्थिती आहे. जलअभियंता भास्कर कुंभार यांनी पद सोडून महाराष्ट्र जलप्राधिकरणाची वाट धरल्यानंतर त्यांच्या जागी आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे टीपीतील अनुभवी अधिकारी नारायण भोसले यांची नियुक्ती केली. गुरूवारी सायंकाळी आदेशही काढले. मात्र आदेश प्राप्त होताच नारायण भोसले यांनी पदभार न स्वीकारता थेट स्वेच्छा निवृत्तीसाठी अर्ज महापालिका प्रशासनाकडे दिला. त्यामुळे जलअभियंतापद रिक्त राहिले आहे. दरम्यान, भोसले यांच्या निर्णयामुळे महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.

गेल्या गुरूवारी जलअभियंता भास्कर कुंभार यांनी आयुक्तांना ईमेलव्दारे अर्ज पाठवून पदमुक्त करण्याची विनंती केली होती. त्यानंतर ते थेट महाराष्ट्र जलप्राधिकरणाच्या सेवेत रूजू झाले. आयुक्तांनी कुंभार यांना कारणेदाखवा नोटीस बजावली. रिक्त झालेल्या जलअभियंतापदावर कुणाची वर्णी लागणार याबद्दल उत्सुकता होता. आयुक्त डॉ. बलकवडे यांनी गुरूवारी पूर्वी उपशहर नगररचनाकार म्हणून काम पाहिलेले आणि सध्या प्रधानमंत्री आवास योजनेचे प्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या नारायण भोसले यांच्याकडे जलअभियंता पदाची सूत्रे सोपविण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर उपजलअभियंतापदी उपशहर अभियंता हर्षजित घाटगे यांची नियुक्ती केली. आयुक्तांचे आदेश झाल्यानंतर नारायण भोसले यांनी पदाची सूत्रे न स्वीकारता थेट स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज आयुक्तांकडे पाठविला. दरम्यान, शुक्रवारी आयुक्तांच्या आदेशानुसार हर्षजित घाटगे यांनी उपजलअभियंतापदाची सूत्रे स्वीकारली.

भोसले यांच्या अर्जाने खळबळ

नारायण भोसले यांनी स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज केल्याने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. यापूर्वी टीपी विभागात काम करत असताना भोसले यांनी स्वेच्छा निवृत्तीसाठी अर्ज केला होता. आता पुन्हा त्यांनी अर्ज केल्याने त्यावर आयुक्त कोणता निर्णय घेतात याकडे महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱयांचे लक्ष लागले आहे.

जलअभियंता पदाची खुर्ची रिकामी

शहर पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख असणाऱया जलअभियंत्याला पाणी पुरवठा, पाणी वितरण, डेनेज यासह थेटपाईप लाईन, अमृत, एसटीपी आदी प्रकल्पाची कामे आदी जबाबदाऱया पार पाडाव्या लागतात. त्यामुळे कामाचा वाढता ताण आणि काही विशिष्ट नगरसेवकांकडून अवमानास्पद वागणूक मिळत असल्याने भास्कर कुंभार यांनी जलअभियंतापदातून मुक्त होण्याचा निर्णय घेतला. आता नारायण भोसले यांनीही पद स्वीकारणे नाकारल्याने जलअभियंतापदी कुणाची नियुक्ती करायची? असा नवा प्रश्न आयुक्त डॉ. बलकवडे यांच्यापुढे निर्माण झाला आहे. त्यातून नवीन अधिकारी, नवीन नाव कोणते ते लवकरच स्पष्ट होणार आहे.

आयुक्तांचा आदेश आणि सद्यःस्थिती

आयुक्त डॉ. कादंबरी बलवकडे यांनी गुरूवारी सायंकाळी काढलेल्या आदेशानुसार नारायण भोसले यांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या सहाय्यक अभियंता पदाबरोबरच जलअभियंतापदी नियुक्ती केली. त्यांच्याकडे अमृत व थेटपाईन लाईन योजना वगळून पाणी पुरवठा व डेनेज विभागाची जबाबदारी देण्यात आली. उपशहर अभियंता हर्षजित घाटगे यांच्याकडे उपजलअभियंतापद सोपविताना अमृत आणि थेट पाईप लाईन योजनांची जबाबदारी देण्यात आली. घाटगे रूजू झाले मात्र भोसलेंनी स्वेच्छा निवृत्तीसाठी अर्ज केल्याने जलअभियंतापद रिक्तच राहिले आहे.

Related Stories

kolhapur; निवडणूका रद्द करून कबनूर नगरपरिषद स्थापन करावी : नगरपरिषद कृती समिती

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : कापशीतील अपहरण झालेल्या ‘त्या’ चिमुकल्याचा मृतदेह सापडला

Archana Banage

कोवाडच्या अभय पतसंस्थेतील 20 लाखांच्या चोरीचा छडा

Archana Banage

राजू शेट्टी पूरग्रस्त दौऱ्यावर

Archana Banage

जिल्हा परिषद आरक्षण सोडतीवर न्यायालयीन वादाचे सावट

Kalyani Amanagi

थकीत एफआरपी संदर्भात राज्यांना नोटीस

Archana Banage
error: Content is protected !!