Tarun Bharat

महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले

16 रोजी निवडणुकीबाबत घोषणा : 23 ऑगस्टपर्यंत अर्ज भरणा : 3 सप्टेंबर रोजी मतदान तर 6 रोजी होणार मतमोजणी

प्रतिनिधी /बेळगाव

महापालिका वॉर्ड पुनर्रचना आणि आरक्षणाचा वाद धारवाड उच्च न्यायालयात प्रलंबित असतानाच राज्य निवडणूक आयोगाने बेळगाव महापालिकेची निवडणूक जाहीर केली आहे. राज्यातील हुबळी-धारवाड, गुलबर्गा आणि बेळगाव अशा तीन महापालिकांसाठी दि. 3 सप्टेंबर रोजी मतदान आणि 6 सप्टेंबर रोजी मतमोजणीची घोषणा करण्यात आली आहे.

बेळगाव महापालिका व्याप्तीतील 58 वॉर्डांकरिता ही निवडणूक होणार असून यापूर्वी जाहीर केलेल्या अंतिम वॉर्ड आरक्षणानुसार निवडणूक होणार आहे. दि. 16 रोजी निवडणुकीबाबत घोषणा होणार असून दि. 23 ऑगस्टपर्यंत अर्ज भरणा व दि. 3 सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. दि. 6 रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे. सदर निवडणुकीबाबत राज्य निवडणूक आयोगाने बुधवार दि. 11 रोजी अधिसूचना जारी केली आहे. बेळगावसह हुबळी-धारवाड आणि गुलबर्गा अशा तीन महापालिकांच्या निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोगाने अधिसूचना जारी केली आहे.

महापालिका निवडणुकांबाबत बेंगळूर उच्च न्यायालयाने मागील आठवडय़ात स्वयंप्रेरित सुनावणी केली होती. त्यावेळी तिन्ही महानगरपालिकांच्या आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मुद्दा उपस्थित केला होता. सदर निवडणुका वेळेवर घेण्याची सूचना केली होती. पण कोरोनामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डिसेंबर 21 पर्यंत राज्य शासनाने पुढे ढकलण्याची सूचना निवडणूक आयोगाला केली असल्याची माहिती उच्च न्यायालयात राज्य शासनाच्या वकिलांनी दिली होती. पण सदर निवडणुका घ्याव्यात, अशी सूचना न्यायालयाने केली होती. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने तिन्ही महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे.

निवडणुका घेण्याच्यादृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने यापूर्वी मतदारयादी तयार करण्याची सूचना महापालिका प्रशासनाला केली होती. त्यामुळे मे महिन्यात मतदारयाद्या प्रसिद्ध करण्याची सूचना बजावली होती. पण कोरोनामुळे मतदारयाद्या प्रसिद्ध करण्यास विलंब झाला होता. अनलॉकनंतर 8 दिवसांतच अंतिम मतदारयाद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. सध्या कोरोनामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकल्याची घोषणा राज्य शासन करीत आहे. दुसरीकडे राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणुका घेण्यासाठी घिसाडघाई करण्यात आली आहे.

 निवडणुका जाहीर झाल्याने संभ्रम

कोरोनाच्या तिसऱया लाटेची चाहुल लागली असतानाच महापालिका निवडणुका जाहीर झाल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. केरळ आणि महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालल्याने सीमाबंदी करून कोरोना चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. सीमाभागात विकेंड लॉकडाऊन आणि नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. अशातच महापालिका निवडणूक जाहीर झाली असल्याने कोरोनाच्या नियमावलीचे पालन निवडणुकीवेळी होणार का? असा मुद्दाही उपस्थित करण्यात येत आहे.

कार्यक्रम….

  • सोमवार दि. 23 ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत
  • मंगळवार दि. 24 रोजी उमेदवारी अर्जांची छाननी
  • गुरुवार दि. 26 पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मुदत
  • शुक्रवार दि. 3 सप्टेंबर रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान
  • सोमवार दि. 6 सप्टेंबर रोजी सकाळी 8 पासून मतमोजणी

न्यायालयाच्या सुनावणीकडे लक्ष : उद्या बेंगळूर तर 16 रोजी धारवाड उच्च न्यायालयात सुनावणी

महापालिका निवडणुकीची घोषणा झाल्याने न्यायालयातील याचिकेच्या सुनावणीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. दि. 13 रोजी बेंगळूर उच्च न्यायालयात आणि दि. 16 रोजी धारवाड उच्च न्यायालयात बेळगाव महापालिका वॉर्ड पुनर्रचना आणि आरक्षणाच्या प्रलंबित याचिकेची सुनावणी होणार आहे. त्यामुळे निवडणूक होणार की स्थगिती मिळणार, याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.

महापालिका निवडणुकीची घोषणा राज्य शासनाने केली असली तरी सदर माहिती उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. बेळगाव महापालिका वॉर्ड पुनर्रचना कायद्याच्या चौकटीत झाली नाही. भौगोलिक सखलता व नागरी सुविधा राबविण्याच्या दृष्टिकोनातून चुकीच्या पद्धतीने वॉर्ड पुनर्रचना झाली आहे. त्यामुळे धारवाड उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सदर वॉर्ड पुनर्रचना व आरक्षण चुकीच्या पद्धतीने झाले असल्याचे मान्य करून नव्याने पुनर्रचना व वॉर्ड आरक्षण जाहीर करण्यात येईल, असे प्रतिज्ञापत्र नगरविकास खात्याने व सरकारच्यावतीने दाखल केले होते. पण राज्य शासनाने ही प्रक्रिया राबविली नाही. याच दरम्यान बेंगळूर उच्च न्यायालयाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात, असा आदेश बजावला होता. त्यामुळे धारवाड उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राकडे दुर्लक्ष करून राज्य शासनाने पुनर्रचना करण्याकडे कानाडोळा केला होता.

केवळ नव्याने आरक्षण जाहीर करून आक्षेप नोंदवून घेतला होता व ते आरक्षण कायम करून निवडणुका घेण्याची तयारी केली होती. 2018 मध्ये केलेल्या वॉर्ड पुनर्रचनेनुसार मतदारयाद्या तयार केल्या आहेत. त्याआधारे राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुका घेण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे.

मात्र बेंगळूर उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा फेरविचार व्हावा, अशी याचिका माजी नगरसेवकांच्यावतीने धारवाड उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेची सुनावणी प्रलंबित आहे. सदर सुनावणी 16 ऑगस्ट रोजी होणार आहे. पण बेंगळूर उच्च न्यायालयाने स्वयंप्रेरित सुनावणी करून महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तातडीने घ्याव्यात, असा आदेश बजावला होता. पण कोरोनाचा प्रसार वाढल्याने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डिसेंबर 2021 पर्यंत लांबणीवर टाकण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्यामुळे निवडणुका घेऊ नयेत, अशी विनंती राज्य निवडणूक आयोगाला केली असल्याचे म्हणणे राज्य शासनाच्यावतीने बेंगळूर उच्च न्यायालयात मांडण्यात आले होते. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या निर्णयाबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याची सूचना न्यायालयाने केली होती. तसेच निवडणुकीची तयारी करण्याची सूचना राज्य निवडणूक आयोगाला केली होती.

सदर सुनावणी शुक्रवार दि. 13 रोजी होणार आहे. पण त्यापूर्वीच राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुका घेण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेची माहिती धारवाड उच्च न्यायालयात सादर करून बेळगाव महापालिका निवडणूक प्रक्रियेला स्थगिती मिळविण्यासाठी अर्ज करणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. तसेच बेंगळूर उच्च न्यायालयाची सुनावणी दि. 13 रोजी होणार आहे. त्यामुळे निवडणुकीबाबत संभ्रम आहे. त्याचप्रमाणे बेळगाव महापालिका वॉर्ड पुनर्रचनेविरोधात सर्वोच्च न्यायालयातदेखील याचिका दाखल करण्यात आली असून, सुनावणी प्रलंबित आहे. निवडणूक अधिसूचनेची माहिती सर्वोच्च न्यायालयालाही देण्यात येणार असल्याचे समजते.

Related Stories

विकेंड कर्फ्यूत अनावश्यक फिरणे टाळा

Amit Kulkarni

अनंतपूर येथील 5 जणांना कोरोना

Patil_p

तलाव ओव्हरफ्लो झाल्याने बाळकृष्ण नगरमधील घरात पाणी

Patil_p

अरिहंत हॉस्पिटलमध्ये 10 मुलांवर मोफत शस्त्रक्रिया

Amit Kulkarni

येळ्ळूर रस्त्यावरील ‘तो’ कचरा तातडीने हटवा

Amit Kulkarni

पत्रकार-पोलिसांमध्ये वादावादी

Amit Kulkarni