Tarun Bharat

महापालिका निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

Advertisements

प्रतिनिधी/ बेळगाव

बेळगाव महापालिकेची निवडणूक 3 सप्टेंबर रोजी होणार आहे. त्याची सर्व ती तयारी पूर्ण झाली आहे. सोमवार दि. 16 ऑगस्टपासून आचारसंहिता लागू होणार आहे. मतदारयाद्या, मतदान केंद्र, निवडणूक अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही निवडणूक ईव्हीएम यंत्राद्वारे होणार आहे. यावेळी प्रथमच नोटाचा पर्याय मनपा निवडणुकीत निवडणूक आयोगाने ठेवला आहे. त्यामुळे कोणताही उमेदवार आपल्या पसंतीचा नसेल तर नोटा हा पर्याय ते अवलंबू शकतात, असे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी महापालिका कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

महापालिकेच्या व्याप्तीत 58 वॉर्ड आहेत. या निवडणुकीसाठी एकूण 4 लाख 28 हजार 364 मतदार आहेत. त्यामध्ये 2 लाख 13 हजार 526 पुरुष मतदार तर 2 लाख 14 हजार 838 महिला मतदार आहेत. या निवडणुकीसाठी एकूण 402 मतदान केंदे असल्याचे त्यांनी सांगितले. या निवडणुकीसाठी 9 निवडणूक अधिकाऱयांची नेमणूक करण्यात आली आहे. अर्ज स्वीकारण्यासाठी एकूण 12 ठिकाणी तरतूद करण्यात आली आहे. प्रत्येक कार्यालयामध्ये एक निवडणूक अधिकारी आणि एक साहाय्यक निवडणूक अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. वॉर्डनुसार अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यासाठी पत्रकही प्रसिद्ध करण्यात आले आहे, असे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले.

सोमवार दि. 23 ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदत राहणार आहे. मंगळवार दि. 24 रोजी अर्जांची छाननी होणार आहे. गुरुवार दि. 26 पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मुदत राहणार आहे. त्यानंतर शुक्रवार दि. 3 सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. बी. के. मॉडेल स्कूल येथे मतमोजणी होणार आहे. सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूल आणि सेंट पॉल्स स्कूल कॅम्प बेळगाव येथे मतमोजणीसंदर्भात प्रशिक्षण दिले जाणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी आणि मनपा अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर उपस्थित होत्या.

अर्ज भरण्यासाठी पाच जणांना प्रवेश

कोरोनामुळे राज्य निवडणूक आयोगाने केवळ पाच जणांनाच अर्ज भरताना प्रवेश देण्याचे जाहीर केले आहे. कोणत्याही प्रकारची रॅली किंवा शक्तिप्रदर्शन करता येणार नाही. तेव्हा याची प्रत्येकाने दखल घेऊन सहकार्य करावे आणि ही निवडणूक शांततेत पार पाडावी, असे त्यांनी कळविले आहे. अर्ज दाखल करण्यासाठी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत अर्ज भरावयाचा आहे.

निवडणूक लढविण्यासाठी मतदार यादीत नाव हवेच

महापालिकेची निवडणूक लढविण्यासाठी महापालिकेच्या अखत्यारीमधील मतदार याद्यांमध्ये निवडणूक लढविणाऱया उमेदवाराचे नाव असणे बंधनकारक आहे. मतदार यादीत नाव नसेल तर त्यांना निवडणूक लढविता येणार नाही.

अपक्ष निवडणूक लढविण्यासाठी सहा सूचक

पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढविण्यासाठी एका सुचकाची गरज भासणार आहे. अपक्ष निवडणूक लढविताना त्या वॉर्डातील सहा सुचकांची स्वाक्षरी लागणार आहे. निवडणूक लढविण्यासाठी सामान्य उमेदवाराला पाच हजार रुपये अनामत रक्कम द्यावी लागणार आहे, तर अनुसूचित जाती-जमातीसाठी आणि महिलांना अडीच हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. रोख किंवा चलन भरून  रक्कम जमा करावी लागणार आहे.

Related Stories

बेंगळूर-बेळगाव स्पेशल रेल्वे प्रवाशांना घेवून दाखल

Patil_p

कंग्राळी बुद्रुक येथे घराची भिंत कोसळून 6 लाखाचे नुकसान

Omkar B

शंकराचार्य रथोत्सवाचा आज मुख्य दिवस

Patil_p

नार्वेकर गल्ली जोतिबा मंदिरात लघुरुद्र सोहळा

Patil_p

आनंद अकादमी, बीएससी ब संघ विजयी

Amit Kulkarni

कचरावाहू वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा

Amit Kulkarni
error: Content is protected !!