प्रतिनिधी / महाबळेश्वर
महाबळेश्वर शहर व परिसरात गेल्या दोन दिवसांपासून धुवाधार पाऊस कोसळत असून गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 19 इंच इतकी पावसाची नोंद झाली आहे. आजअखेर तब्बल 110 इंच पावसाची नोंद झाली असून गुरुवारी दिवसभरात दहा इंचाहून अधिक पाऊस पडला असल्याचा अंदाज आहे. मुसळधार पावसाने सर्वच रस्ते जलमय झाले होते.
महाबळेश्वर – पांचगणी मुख्य रस्त्यावर वेण्णालेक नजिक पाणीच पाणी झाले. रस्त्यावर आलेल्या पाण्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वेण्णा लेक ते लिंगमला परिसरात सर्वत्रच पाणीच पाणी झाल्याचे चित्र होते. शेतीसह अनेकांच्या घरात या परिसरातील हॉटेल ढाब्यांमध्ये पाणी गेले होते. काही ठिकाणी संरक्षक भिंती लाईटचे खांब कोसल्याच्या घटना देखील घडल्या.
महाबळेश्र्वर प्रतापगड रस्त्यावरील धबधबे ओसंडून वाहत असून घटरस्त्यावर संपूर्ण पाणीच पाणी होते. हा संपूर्ण रस्ताच धोकादायक झाला आहे. या घाटरस्त्यवर दरडी कोसळण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक वर्षात इतक्या मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला नसल्याचे जाणकारांनी सांगितले महाबळेश्र्वर मुख्य बाजारपेठेत सर्वत्र संचारबंदी सारखी परिस्थिती होती आश्याही वातावरणात अनेक हौशी पर्यटन भिजण्याचा आनंद घेत होते. महाबळेश्वर तालुक्यातील चतुर बेट व उचाट पुल पाण्याखाली गेल्याने 28 गावांचा संपर्क तुटला आहे. महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा चौधरी पाटील या वेण्णा लेक सह प्रतापगड रस्त्यावर जाऊन पाहणी केली.


previous post