इमारत निधी परत जाण्याची शक्यता, जिल्हाधिकाऱयांनी लक्ष घालण्याची मागणी
प्रतिनिधी/ महाबळेश्वर
दोन गटातील राजकिय वादात पालिकेच्या प्रशासकिय इमारतीचे काम गेली आठ महीने बंद आहे. या इमारतीचे काम मार्च अखेर पूर्ण झाले नाही तर, या इमारतीसाठी शासनाने दिलेला निधी परत जाण्याचा धोका उभा राहीला आहे. पालिकेला प्रशासकिय इमारत नसल्याने प्रेसिडेंट बंगलो या मुख्याधिकारी यांच्या रहिवासासाठी वापरण्यात येत असलेल्या बंगल्यातून पालिकेचे काम सुरू आहे. या लहान इमारत कामकाजासाठी अपुरी पडत असून कर्मचारी व नागरीकांना मोठय़ा अडचणीचा सामाना करावा लागत आहे.
पालिकेच्या वैशिष्ठयपुर्ण कामासाठी 16-17 व 17-18 या दोन आर्थिक वर्षात पालिकेच्या फंडात दोन कोटी रूपये जमा झाले होते. या दोन कोटीतून पालिकेने वेण्णालेक परिसरातील टोल प्लाझा व रस्त्याचे रुंदीकरण व सुशोभिकरणाचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱयांकडे मंजुरीसाठी सादर केला. परंतु, पालिकेने सुचविलेले काम वैशिष्ठय़ पुर्णमध्ये बसत नसल्याने या कामाच्या मंजुरीसाठी पालिकेने प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्याची सुचना जिल्हाधिकाऱयांनी केली. परंतु राज्य शासनानेही या निधीतून वेण्णालेक येथील टोल प्लाझा व रस्ता रुंदीकरण व सुशोभिकरणास विरोध केला. शेवटी पालिकेने या दोन कोटी निधीतून पालिका इमारत नुतनीकरण करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये सर्व सुविधांनी युक्त साउंडप्रुफ मोठा हॉल, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांची दालने पालिकेतील प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र दालने यांचा समावेश असलेला इमारतीचा आराखडा तयार करण्यात आला. पालिकेतील सर्व नगरसेवकांना विश्वासात घेवून सर्व प्रशासकिय सोपस्कार पूर्ण करण्यात आले. नंतर या कामाच्या ई-निविदा काढण्यात आल्या. 21 दिवसांनंतर या कामासाठी पाच निविदा प्राप्त झाल्या. यापैकी ओसवाल कन्स्ट्रक्शन सातारा यांची कमी दराची निविदा मंजुर करण्यात आली. बारा नगरसेवकांनी पालिकेच्या प्रशासकिय इमारतीच्या नुतनीकरणाच्या कामास विरोध केला. या विरोधानंतर पुन्हा दोन्ही गटातील नगरसेवकांचे मनोमिलनाचे प्रयत्न सुरू झाले.
पालिकेने बांधकाम केलेल्या इमारतीचे स्ट्रक्चर ऑडिट करून घेतले. के. व्हि. पी कॉलेज सातारा व डिझायनर श्रीराम कुलकर्णी यांनी इमारत सुस्थितीत असल्याचा अहवाल पालिकेला दिला. दरम्यान इमारतीच्या छताचा स्लॅब व छताचे लोखंडी साहीत्य खराब झाल्याचे पालिकेच्या निदर्शनास आणले. त्यानुसार पालिकेने छताचे काम आकस्मित स्थितीत नव्याने करण्याचा निर्णय घेवून काम सुरू केले. मात्र बारा नगरसेवकांनी आक्रमक होण्याचा निर्णय घेतला व त्यांनी छताचे सुरू असलेले काम बंद पाडले. नगरसेवकांच्या विरोधामुळे इमारतीचे काम गेल्या आठ महीन्यां पासुन बंद पडले आहे.
बारा नगरसेवकांमध्ये भाजपा, राष्ट्रवादी व शिवसेना समर्थक नगरसेवकांचा समावेश आहे. या नगरसेवकांनी सातारा जिल्हाधिकारी, आ. मकरंद पाटील, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रारी केल्या. हे काम बंद असल्यामुळे बांधकाम ठेकेदार दिवंसेंदिवस अडचणीत सापडत आहेत. या कामाची मुदत मार्च 2021 असून या मुदतीत आता काम पूर्ण होवू शकत नाही. बांधकामाचे दरही आता बदलले असून पुर्वीच्याच दरात काम पूर्ण करणे ठेकेदारास शक्य होणार नाही. त्यामुळे जर इमारतीच्या कामात दरवाढ झाली तर, त्याचा फटका पुन्हा पालिकेलाच बसणार आहे.
प्रशासकिय इमारतीचे नुतनीकरणाचे काम हाती घेण्यात आल्याने पालिकेचे कामकाज आता मुख्याधिकाऱयांच्या रहिवासासाठी वापरण्यात येणाऱया प्रेसिडेंट बंगल्यातून होत आहे. हा बंगला पालिकेच्या कामकाजासाठी अपुरा तर आहेच परंतु नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष व मुख्याधिकाऱयांच्या दालनासाठी देखिल येथे जागा नाही. तसेच इथे पालिकेचे कामकाज सुरू असल्याने मुख्याधिकाऱयांच्या रहिवासाची देखील गैरसोय झाली आहे. पालिकेचे कर्मचारी खाली बसून काम करीत असल्याने सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही. इमारतीबाबत जिल्हाधिकाऱयांनी तातडीने निर्णय घेवून प्रश्न धसास लावावा, अशी मागणी नागरीकांतून होत आहे.