Tarun Bharat

महामार्गांच्या निर्मितीतून बेळगावचा विकास साधणार

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन : 238 कि. मी. लांबीच्या महामार्गांच्या कामांचा शुभारंभ

प्रतिनिधी /बेळगाव

भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

  • बेळगाव जिल्हय़ातील 12 रोडवर ओव्हरब्रिजना मंजुरी
  • पुणे-बेंगळूर यादरम्यान होणार ग्रीनफिल्ड हायवे
  • बेळगाव-खानापूर रस्त्याचे 60 टक्के काम पूर्ण

बेळगाव शहराला गतिमान एक्स्प्रेस हायवे जोडले जात आहेत. बेळगाव ते महाराष्ट्र सीमेपर्यंत सहापदरी महामार्ग त्याचबरोबर बेळगाव ते साखळी यादरम्यान दुपदरी महामार्ग जोडला जाणार आहे. महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांना बेळगाव महामार्गांनी जोडले जाणार असल्याने याचा फायदा उद्योग, व्यापार, दळणवळण या क्षेत्राला होणार आहे. त्यामुळे या महामार्गांच्या निर्मितीमुळे आपसुकच बेळगावचा विकास साधला जाईल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 238 कि. मी. लांबीच्या महामार्गांच्या कामांचा शुभारंभ सोमवारी जिल्हा क्रीडांगण येथे झाला. मंत्री गडकरी यांनी या शुभारंभ कार्यक्रमावेळी इतर विकासकामांनाही मंजुरी दिली. मुख्यमंत्री बसवराज बोम्माई व केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या उपस्थितीत हा कोनशिला समारंभ पार पडला.

बेळगाव ते संकेश्वर यादरम्यान सहापदरी बायपास केला जाणार आहे. संकेश्वर येथून महाराष्ट्र सीमेपर्यंत सहापदरी रस्ता होणार आहे. याचबरोबर बेळगाव-चोर्लामार्गे साखळी हा दुपदरी मार्ग केला जाणार असून यामुळे बेळगाव-गोवा या दरम्यान प्रवासाचा वेळ कमी होणार आहे. बेळगाव जिल्हय़ात रेल्वे ओव्हरब्रिजची अनेक ठिकाणी मागणी केली जात आहे. नागरिकांच्या सोयीसाठी ऐनापूर, मंगसुळी, पाश्चापूर, रायबाग, चिंचली यासह इतर मार्गांवर 12 रोडवर ओव्हरब्रिज केले जाणार असल्याची घोषणा गडकरी यांनी केली.

2024 पर्यंत अमेरिकेप्रमाणे होणार महामार्ग

सध्याच्या पुणे-बेंगळूर महामार्गावर वाहनांची संख्या वाढल्याने पुणे-बेंगळूर यादरम्यान सहापदरी एक्स्प्रेस महामार्ग तयार केला जाणार आहे. यामुळे हे अंतर 100 कि.मी.ने कमी होणार आहे. कोल्हापूर व बेळगाव ही शहरे जरी या महामार्गाला जोडली जात नसली तरी कनेक्टींग रोड जोडण्याचा प्रयत्न आहे. आजवर 50 लाख कोटी रुपयांचे काम केवळ रस्ते वाहतुकीसाठी करण्यात आले आहे. त्यामुळे 2024 पर्यंत देशातील सर्व महामार्ग हे अमेरिकेप्रमाणे केले जातील, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री गडकरी यांनी व्यक्त केला.

शिवाजी महाराजांनी बेळवडी मल्लम्मांना दिला बहिणीचा दर्जा

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याचा विस्तार दक्षिणेपर्यंत केला. यादरम्यान बेळगाव जिल्हय़ातील बेळवडी मल्लम्मा यांच्याशी त्यांचा संपर्क आला. एका योद्धय़ाप्रमाणे लढणाऱया या स्त्रीला छत्रपती शिवाजी महाराजांनी साडीचोळीचा अहेर देऊन सन्मान केला. तसेच आपली बहीण म्हणून मल्लम्मांना मानल्याची आठवण त्यांनी सांगितली.

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून व नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून देशभरात महामार्गांचे काम प्रगतिपथावर आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गाव शहराशी जोडले. याचाच पुढचा वसा गडकरी यांनी घेऊन आज देशभरातील मोठी महानगरे एक्स्प्रेस हायवेच्या माध्यमातून जोडली जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

मुख्यमंत्री बसवराज बोम्माई म्हणाले, महामार्गांच्या निर्मितीमुळे राज्यात नवी क्रांती घडत आहे. गडकरींनी महाराष्ट्रात मंत्री असताना 58 ओव्हरब्रिज बांधून देशाचे लक्ष वेधून घेतले होते. त्यांच्या विचारानेच राज्यातील महामार्गांचा विस्तार केला जात आहे. निपाणी ते कित्तूर महामार्गाच्या शेजारी जलशक्ती केंद्र उभे केले जाणार आहे. महाराष्ट्रातील शिर्डी, पंढरपूर यासह इतर तीर्थक्षेत्रांना कर्नाटकातील महामार्गांना जोडावे, अशी मागणी त्यांनी केली.

या कार्यक्रमाला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सी. सी. पाटील, धर्मादाय खात्याच्या मंत्री शशिकला जोल्ले, पालकमंत्री गोविंद कारजोळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती, बेळगावच्या खासदार मंगला अंगडी, चिकोडीचे खासदार आण्णासाहेब जोल्ले, राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, राज्यसभा माजी सदस्य प्रभाकर कोरे, आमदार अनिल बेनके, महेश कुमठळ्ळी, दुर्योधन ऐहोळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र-कर्नाटकातील वाद मिटविण्यात अपयश

महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांमध्ये मागील अनेक वर्षांपासून पाण्याचा वाद आहे. यापूर्वी केंद्रात जलसंपदा मंत्री असताना 20 आंतरराज्य पाण्याचे वाद होते. त्यापैकी 13 वाद बंद दाराआड मुख्यमंत्र्यांना समोरासमोर बसवून सोडविले आहेत. महाराष्ट्र-कर्नाटकातील जलवादामुळे लाखो रुपयांचे नुकसान होत असतानाही त्यावेळी हा वाद सोडविण्यात मला यश आले नाही. परंतु लवकरच हा वाद सोडविला जाईल, अशी माहिती गडकरी यांनी दिली.

या कामांचा झाला शुभारंभ…

  • बेळगाव-संकेश्वर (सहापदरी)- 1 हजार 479.3 कोटी
  • संकेश्वर-महाराष्ट्र सीमेपर्यंत (सहापदरी)- 1 हजार 388.7 कोटी
  • बेळगाव-चोर्ला-साखळी, गोवा (दुपदरी)-246.78 कोटी
  • विजापूर-मुरगुंडी-780 कोटी
  • सिद्धापूर-विजापूर-90.13 कोटी

Related Stories

‘त्या’ हेस्कॉम अधिकाऱयांची बदली करा

Amit Kulkarni

आई-वडील-शिक्षकांमुळे मिळाले यश

Patil_p

सायकलवरून 32 वर्षे सेवा केलेला पोस्ट अधिकारी

Patil_p

नैर्त्रुत्य रेल्वेत 7 महिला सबइन्स्पेक्टर दाखल

Patil_p

कडोली भागातील विद्यार्थ्यांचे अपुऱया बससेवेमुळे हाल

Amit Kulkarni

विनामास्क फिरणाऱयावर, थुंकणाऱयांवर कारवाई

Patil_p