Tarun Bharat

महामार्गात जमीन गेलेल्या शेतकऱयांना न्याय मिळवून देवू

खानापूर / प्रतिनिधी

बेळगाव-पणजी महामार्ग रुंदीकरणात जमीन संपादित झालेल्या गणेबैल-अंकले येथील शेतकऱयांना न्याय मिळवून देवू, असे आश्वासन राज्य सभासदस्य व कर्नाटक राज्य किसान मोर्चाचे अध्यक्ष इराण्णा कडाडी यांनी दिले आहे. यासंदर्भात रविवारी गणेबैल-अंकले येथील शेतकऱयांनी भाजपचे युवा नेते पंडित ओगले यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव येथे इराण्णा कडाडी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. व आपल्या व्यथा प्रत्यक्षपणे त्यांच्यासमोर मांडल्या.

निवेदनात असे म्हटले आहे की, बेळगाव-पणजी राष्ट्रीय महामार्गासाठी गणेबैल-अंकले येथील पिकाऊ जमीन तसेच काही प्रमाणात माळ जमीन संपादित केली आहे. पण अद्याप जमीन संपादित झालेल्या जवळपास 75 टक्के शेतकऱयांना नुकसानभरपाई मिळालेली नाही, सध्या गणेबैल-अंकले परिसरात जमिनीची किंमत पाच ते सहा लाख रुपये गुंठा असतानाही प्रत्यक्षात एक गुंठय़ाला 1200 ते 1500 रुपये इतकीच नुकसानभरपाई मंजूर झाल्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यातच यापूर्वी संपादित केलेल्या जमिनीशिवाय टोलनाका घालण्यासाठी नव्याने 60 मीटर जमीन पुन्हा संपादित केली आहे. पण त्यांना मिळणारी नुकसानभरपाई म्हणजे आम्हा शेतकऱयांची चेष्टाच म्हणावी लागेल. जोपर्यंत योग्य ती नुकसानभरपाई मिळत नाही तोपर्यंत आम्ही रस्ताकामाला विरोध केला आहे. तरीदेखील महामार्ग प्राधिकरण तसेच संबंधित कंत्राटदार बळजबरीने काम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आमच्या जमिनीला सध्याच्या बाजारभावाप्रमाणे तसेच नव्या भूसंपादन कायद्याप्रमाणेच नुकसानभरपाई मिळावी, एवढीच आमची अपेक्षा आहे. यासाठी आपण स्वत: लक्ष घालून आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे.

गणेबैल-अंकले येथील शेतकऱयांच्या व्यथा ऐकून खासदार इराण्णा कडाडी यांनी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱयांशी तसेच भूसंपादन अधिकाऱयांशी मोबाईलद्वारे संपर्क साधून त्यांच्याशी चर्चा केली. व यासंदर्भात मार्ग काढण्याची विनंती केली. शिवाय शेतकऱयांना नवीन कायद्याप्रमाणे योग्य ती नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे, अशी त्यांना विनंती केली. यानंतर खासदारांनी सर्व शेतकऱयांना योग्य ती नुकसानभरपाई मिळण्यासाठी कोणत्या मार्गाने जावे याचे मार्गदर्शन केले व आपण देखील स्वतः जातीनिशी यामध्ये लक्ष घालण्याची ग्वाही दिली.

यावेळी पंडित ओगले यांच्यासंमवेत मल्हारी गुरव, देवाप्पा गुरव, जोतिबा चौगुले, बळीराम कुंभार, विष्णू सुर्वे, धनाजी गुरव, नारायण गुरव, विठ्ठल होसूरकर, लक्ष्मण नेमाणी गुरव, लक्ष्मण यल्लाप्पा गुरव, नेमाणी गुरव, नितीन पाटील, किरण तुडवेकर यासह इतर उपस्थित होते.  

Related Stories

दुग्धाभिषेक सोहळा भव्यदिव्य करणार

Amit Kulkarni

वैयक्तिकपणे अर्ज दाखल करणे आवश्यक

Omkar B

कुसमळीत सहा लाखाची चोरी

Amit Kulkarni

सहकारातून प्रगती साधणे शक्य

Patil_p

कपिलेश्वर मंदिर प्रशासक नेमणुकीला न्यायालयाची स्थगिती

Amit Kulkarni

शहरात वाहतूक क्यवस्थेचे तीनतेरा

Patil_p