Tarun Bharat

महाराष्ट्राच्या चित्ररथाला सर्वाधिक लोकप्रिय निवड श्रेणीचा पुरस्कार

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावरील परेडमध्ये सहभागी झालेल्या चित्ररथांपैकी उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला यंदाचा सर्वोत्तम चित्ररथ तर महाराष्ट्राच्या चित्ररथाला सर्वाधिक लोकप्रिय निवड श्रेणीचा पुरस्कार मिळाला. लष्करी तुकडय़ांमध्ये सीआयएसएफच्या चित्ररथाला सर्वोत्तम सेंट्रल आर्म पोलीस फोर्समधील चित्ररथ म्हणून सन्मानित करण्यात आले. संरक्षण मंत्रालयाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली.

यंदा राजपथावरील संचलनात 12 राज्यांचे आणि 9 मंत्रालयांचे असे 21 चित्ररथ सहभागी झाले होते. नौदलाच्या चित्ररथाला सर्व सेवा दलांमधील सर्वोत्तम चित्ररथाचा मान मिळाला. तर याच गटामधील सर्वाधिक लोकप्रिय चित्ररथ म्हणून हवाई दलाच्या चित्ररथाला गौरवण्यात आलं. मंत्रालयांच्या चित्ररथांपैकी शिक्षण मंत्रालय आणि नागरी उड्डयन मंत्रालयाच्या चित्ररथांना पुरस्कार विभागून देण्यात आला आहे.

प्रथम क्रमांकाच्या उत्तर प्रदेशच्या चित्ररथामध्ये वाराणसी काशी विश्वनाथ धामचा देखावा साकारण्यात आला होता. तर सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या महाराष्ट्रातील जैवविविधतेवर आधारित चित्ररथाने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं होतं. या देखण्या चित्ररथाच्या अग्रभागी कास पठाराला स्थान देण्यात आलं होतं. या चित्ररथावर सातारा जिल्ह्यातील कास पठारावरील फुले व प्राण्यांच्या प्रजातीचा समावेश करण्यात आला. कास पठाराचा चित्ररथात समावेश झाल्याने साताऱयासाठी ही बाब भूषणावह ठरली.

error: Content is protected !!