ऑनलाईन टीम / मुंबई :
बहुप्रतिक्षित कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या देशव्यापी मोहिमेला आजपासून सुरुवात होत आहे. सीरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने संयुक्तरित्या निर्माण केलेली ‘कोव्हिशील्ड’ आणि भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ या दोन लस पहिल्या टप्प्यात कोरोनायोद्ध्यांना दिल्या जाणार आहेत. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते राज्यव्यापी लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे.


राज्यातील लसीकरण मोहिमेचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज सकाळी 11.30 वा. मुंबई महापालिकेच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील कोविड केअर सेंटरमध्ये होणार आहे. तर देशव्यापी लसीकरण मोहिमेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सकाळी 10.30 वा. होणार आहे. पंतप्रधान मोदी विलेपार्लेतील डॉ. आर. एन. कुपर रुग्णालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लसीकरण मोहिमेचं उद्घाटन करणार आहेत.
- मुंबईतील लसीकरण मोहीम
मुंबईत एकूण 9 केंद्रांवर 40 बूथवर लसीकरण होणार आहे. सुरवातीला दररोज सरासरी 4 हजार जणांचे लसीकरण करण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिकेला पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटकडून कोविड 19 आजारावरील ‘कोविशील्ड’ या लसीचे सुमारे 1 लाख 39 हजार 500 डोस उपलब्ध झाले आहेत. महानगरपालिकेकडे 1 लाख 30 हजार लसींची लसीकरणासाठी नोंदणी झाली आहे. या मोहिमेसाठी 7 हजार कर्मचाऱयांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
- पुण्यात तयारी पूर्ण
पुणे महापालिकेच्या मंगळवार पेठेतील कमला नेहरू रुग्णालयात आज सकाळी 11 वाजता कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ होणार आहे. शहरातील एकूण आठ लसीकरण केंद्रावर प्रत्येकी 100 नोंदणीकृत लाभार्थ्यांना लस देण्यात येणार आहे, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. यासोबतच नोंदणी नसलेल्या लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
- पुण्यातील केंद्रे :
- कमला नेहरू रूग्णालय, मंगळवार पेठ
- ससूनन रुग्णालय, पुणे स्टेशन
- स्व. राजीव गांधी रुग्णालय, येरवडा
- कै. जयाबाई नानासाहेब सुतार प्रसूतीगृह, कोथरूड
- दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, एरंडवणे
- नोबेल हॉस्पिटल, हडपसर
- रुबी हॉल क्लिनिक, ताडीवाला रस्ता
- भारती हॉस्पिटल, धनकवडी