मुंबई / ऑनलाईन टीम
जागतिक आरोग्य दिनाच्या दिवशी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना राजेश टोपे यांनी काल केंद्रीय आरोग्य मंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीसंदर्भात माहिती दिली. आतापर्यंत कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जेवढी केंद्रीय पथकं आली, त्यांनी दिलेल्या सुचनाचं महाराष्ट्रानं तंतोतंत पालन केल्याचं आरोग्यमंत्र्यांनी कालच्या बैठकीत माहिती दिली. यासोबतच तीन दिवसांमध्ये महाराष्ट्रात कोरोन लसीकरण बंद पडू शकतं, अशी भीती देखील राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
यावेळी राजेश टोपे म्हणाले, काल केंद्रीय आरोग्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली. केंद्राच्या जेवढ्या टीम आजपर्यंत आल्या, त्यांचे नियम आणि आयसीएमआरच्या गाईडलाईनचं तंतोतंत पालन महाराष्ट्रानं आजवर केलं आहे. अनेकांचा विरोध घेऊन कठोर निर्णय महाराष्ट्रानं घेतले आहेत. राज्यानं केंद्राच्या सर्व अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. प्रकाश जावडेकरांनी ट्वीट करुन सांगितलं की, सहा लाख लसीकरण करा, डोस केंद्राकडून पुरवले जातील. राज्यात सध्या दररोज साडेचार लाख लोकांचं लसीकरण केलं जातंय. मात्र, लस नाही म्हणून अनेक केंद्र बंद ठेवावी लागत आहेत. लसीकरणासाठी आलेल्या लोकांना घरी पाठवावं लागतंय. आमची आधीपासून हिच मागणी होती की, लसीचा पुरवठा आम्हाला लवकर करा . त्यामुळे आम्हाला अधिक वेगानं आणि उत्तमरित्या लसीकरण करणं शक्य होईल.
सध्याच्या घडीला महाराष्ट्र लसीकरणात आघाडीवर आहे. माझ्या मते, या महामारीला आळा घालण्यासाठी एकच मार्ग आहे, तो म्हणजे आपल्या सर्वांची प्रतिकारक शक्ती वाढवणं आवश्यक आहे, त्यासाठी लसीकरणाचा मार्ग हा सर्वात महत्त्वाचा मार्ग आहे. लसीकरण मोफत आहे, लसीकरण सुरक्षित आहे. तसेच लसीकरण तुमच्या घराच्या जवळ आहे. त्यामुळे शहरांमध्येही मोठ्या प्रमाणावर टीम केलेल्या आहेत. ग्रामीण भागांत टीम केलेल्या आहेत. ज्यामध्ये आशा वर्कर्स, अंगणवाडी कार्यकर्त्या आणि मदतनीस, तसेच ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक आणि तलाठी या साऱ्यांचा समावेश होतो. या चार लोकांची टीम करुन गावागावातून आणि वॉर्डा वॉर्डातून तुमचा सॅनिटरी इन्स्पेक्टर असेल यांनी 45 वर्षांवरील लोकांना घेऊन येऊन लसीकरण करुन घ्यावं हे बंधनकारक केलेलं आहे. परंतु, सध्या प्रश्न असा आहे की, लस मिळत नाहीये. कालच्या बैठकीत मी विनंती केली की, आम्हाला लसीचा पुरवठा करा. लस पुरवली तर आमचा एक महत्त्वाचा प्रश्न सुटेल.
महाराष्ट्रात १४ लाख लसींचे डोस शिल्लक असून हा साठा केवळ तीन दिवस पुरेल अशी भीती व्यक्त करताना राजेश टोपे यांनी दर आठवड्याला ४० लाख लसींचा पुरवठा करण्याची केंद्राकडे मागणी केली आहे. महाराष्ट्रात लसीचे १४ लाख डोस शिल्लक असून ही तीन दिवसांपुरता साठा आहे. पाच लाखांच्या तुलनेत हे डोस तीन दिवसांत संपेल आणि महाराष्ट्रातील लसीकरण बंद होऊ शकेल. म्हणूनच दर आठवड्याला किमान ४० लाख लस पुरवठा केला पाहिजे. आज आम्ही साडे चार ते पाच लाखांपर्यंत आहोत. पण दोन दिवसांत दिवसाला सहा लाखांपर्यंत जाण्याची हमी मी देतो, असं राजेश टोपे म्हणाले.
यावेळी त्यांनी लॉकडाऊन हा शब्द वापरू नका असं आवाहन केलं. केवळ शनिवारी व रविवारी लॉकडाउन आहे. बाकीच्या दिवशी फक्त निर्बंध आहेत असं देखील सांगितलं.


previous post