ऑनलाईन टीम / मुंबई :
देशात आढळलेला कोरोना डेल्टा प्लस व्हायरसचा अख्ख्या जगालाच धोका आहे. तर धोकादायक ‘डेल्टा प्लस’ व्हेरियंटने आता महाराष्ट्रात देखील शिरकाव केला आहे. राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचे एकूण 21 रुग्ण सापडले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.


राजेश टोपे म्हणाले, 15 मे पासून जवळजवळ 7 हजाराच्या वर सॅम्पल घेण्यात आले असून यांचे जिनोमिक सिक्वेनसिंग करण्यात आले. ज्यामध्ये डेल्टा प्लस व्हेरियंटचे 21 रुग्ण सापडले आहेत. त्यातील 9 रुग्ण रत्नागिरीमधील, जळगाव 7, मुंबई 2 आणि पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे येथील प्रत्येकी 1 रुग्ण आहे. या विषाणूच्या तपासणीसाठी राज्यभरातून सुमारे 7500 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले.
या केसेस संदर्भात पुढील कार्यवाही अशी करण्यात येत आहे की या इंडेक्स केसेसची संपूर्ण माहिती घेतली जात आहे. म्हणजे त्यांनी केलेला प्रवास, लसीकरण झाले होते का, त्यांना कोरोनाची पुन्हा लागण झाली का याबाबत माहिती घेऊन त्यांच्या निकट सहवासितांची तपासणी केली जात आहे. त्याचबरोबर सारी आणि आयएलआयचे सर्वेक्षण केले जात आहे. डेल्टा आणि डेल्टा प्लसचे जे म्युटेशन झाले आहे त्याबाबत सविस्तर माहिती जमा केली जात आहे.
दरम्यान, डेल्टा व्हेरियंट सगळ्यात आधी भारतात ऑक्टोबर महिन्यात सापडला होता. भारतात दुसऱ्या लाटेचा कहर डेल्टा व्हेरियंटमुळेच झाल्याचा अंदाज आहे. सध्या इंग्लंडमध्ये डेल्टा व्हेरियंटचे रुग्ण वाढतायत. फायझर आणि ॲस्ट्राझेन्काच्या लसी डेल्टा व्हेरियंटपासून संरक्षण देतात, असा दावा करण्यात आला आहे.