Tarun Bharat

महाराष्ट्र, केरळमधील वाढता संसर्ग चिंताजनक

पंतप्रधानांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा – तिसरी लाट थोपविण्यासाठी मार्गदर्शक सूचना

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी महाराष्ट्र, कर्नाटक, केरळसह काही राज्यातील मुख्यमंत्र्यासोबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी काही राज्यांमधील वाढत्या कोरोना संसर्गाबद्दल चिंता व्यक्त केली. महाराष्ट्र आणि केरळमधील रुग्णांचा वाढता आकडा चिंताजनक आहे. तिसऱया लाटेला थोपवण्यासाठी आपण सतर्क राहिले पाहिजे असे सांगत आपल्याला पुन्हा एकदा टेस्ट, ट्रक आणि टीका या गोष्टींवर लक्ष केंद्रीत करावे लागेल, असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांच्या या बैठकीत तामिळनाडू, ओडिशा, आंध्रप्रदेश या राज्यांचे मुख्यमंत्रीही सहभागी होते.

देशभरात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने डोके वर काढले आहे. आतापर्यंत कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने 111 देशांमध्ये प्रवेश केला आहे. कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट हा सर्वाधिक धोकादायक असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या राज्यांना अधिक सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच राज्यांमध्ये कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे आचरण कशापद्धतीने केले जात आहे, याची माहितीही मुख्यमंत्र्यांकडून घेतली.

पंतप्रधान मोदींनी गेल्या आठवडय़ात सर्व राज्यांमधील कोरोनास्थितीचा आढावा घेतला होता. त्या अनुषंगाने सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांशी पंतप्रधानांनी थेट संवाद साधला. यावेळी त्यांनी अधिक बाधित सापडत असलेल्या भागात नियम कडक करण्याची सूचना केली. अनेक राज्य आरटीपीसीआर टेस्टिंगची क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करतायत, ही चांगली बाब असल्याचेही पंतप्रधान म्हणाले. मात्र, महाराष्ट्र आणि केरळमधील संसर्गाची स्थिती म्हणावी तितकी सुधारलेली दिसत नाही, असेही ते पुढे म्हणाले.

युरोपातील देशांमध्ये गेल्या तीन आठवडय़ात रुग्णसंख्या पुन्हा एकदा झपाटय़ाने वाढू लागली आहे. तशी स्थिती आपल्याकडे येणार नाही याची काळजी सगळय़ांनी घेणे गरजेचे आहे, असे मोदी म्हणाले. तसेच ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांवर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक असल्याचेही पंतप्रधानांनी नमूद केले.

Related Stories

केंम्ब्रिज भाषणावर राहुल गांधींचे स्पष्टीकरण

Patil_p

रामनगरी अयोध्येत भाविकांचा महापूर

Patil_p

लखीमपूर-खेरी प्रकरणी स्वतंत्र चौकशीची आवश्यकता

Patil_p

मुलायम यादवांच्या सुनेकडून राम मंदिर उभारणीसाठी देणगी

Patil_p

दिल्लीतील कोरोना : सध्या 459 रूग्णांवर उपचार सुरू

Tousif Mujawar

पर्यावरण रक्षणासाठी ‘संघा’चा पुढाकार

Patil_p