Tarun Bharat

महाराष्ट्र केसरीच्या आखाड्यात मानापमान नाट्याचा धुरळा!

फिरोज मुलाणी / औंध :

4 एप्रिल पासून सातारच्या छ. शाहू स्टेडियमवर महाराष्ट्र केसरी कुस्तीचा आखाडा रंगणार आहे. मात्र त्यापूर्वीच जिल्ह्यातील कुस्ती संघटनेमध्ये आयोजनातील सहभागावरुन मानापमान नाट्याचा धुरळा उडायला लागला आहे. जिल्ह्यातील कुस्ती संघटनेने वैयक्तिक हेवेदावे बाजूला ठेवून मानाची स्पर्धा होऊ द्यावी अशी हाक कुस्तीशौकिनांनी दिली आहे.

Advertisements

साठ वर्षाच्या प्रदिर्घ कालावधीनंतर सातारच्या मातीत राज्याच्या कुस्ती क्षेत्रातील सर्वोच्च किताबाची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होणार आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या कार्यकारणी बैठकीत निर्णय होऊन स्पर्धेच्या तयारीला वेग आला आहे. स्पर्धा तोंडावर आल्याने जिल्ह्यातील कुस्ती शौकिनांच्यात आनंदाचे वातावरण आहे. मात्र इकडे जिल्हा कुस्ती संघटने मध्ये मानापमान नाट्य उभे राहिले आहे. या नाट्याचा दररोज नवनवीन अंक समोर येत असल्याने स्पर्धेपूर्वीच आखाड्यात धुरळा उडायला लागला आहे. सातारच्या कुस्ती क्षेत्राला गटबाजी नवीन नाही. जिल्हा तालिम संघाने आतापर्यंत जे पेरले तेच आखाड्यात उगवत असल्याचे चित्र सध्या मैदानात दिसत आहे. तालिम संघाचे अध्यक्ष साहेबराव पवार यांच्या तालमीत घडलेले त्यांचेंच पट्टे आखाड्यात त्यांच्यासमोर उभे ठाकले आहेत. साहेबराव भाऊ वस्ताद आहेत त्यामुळे ते सहजासहजी या लढतीतून माघार घेतील असे चित्र सध्या तरी नाही.

गेल्या चार वर्षापूर्वी देखील कुस्तीगीर परिषदेने सातारला स्पर्धा घेण्यासाठी चाचपणी केली होती. मात्र त्यावेळी देखील गटबाजी उफाळून आल्यामुळे शेवटच्या क्षणी स्पर्धा भुगावला झाली होती. यंदा स्पर्धा सातारला होणार असली तरी दोन्ही गट पुन्हा समोरासमोर भिडले आहेत त्यामुळे ऐनवेळी स्पर्धा रद्द तर होणार नाही ना ? अशी भिती कुस्तीशौकिनांना वाटत आहे. अनेक वर्षानंतर सातारा जिल्ह्यातील लोकांना राज्यस्तरीय कुस्तीस्पर्धेचा आनंद लुटायला मिळणार आहे. त्यामुळे जिल्हा कुस्ती संघटनांनी वैयक्तिक हेवेदावे आणि गटटबाजी बाजूला ठेवून स्पर्धा यशस्वी करून राज्यात जिल्ह्याची मान उंचवावी अशी प्रतिक्रिया अनेक कुस्तीशौकिनांनी तरुण भारत जवळ व्यक्त केली.

जिल्हा तालिम संघ महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेला संलग्न असला तरी परिषद आणि तालिम संघात गेल्या दोन वर्षात वाढलेली मतभेदाची दरी लपून राहिलेली नाही. गेल्या चार महिन्यापूर्वी तालिम संघाला डावलण्याचे धाडस दाखवून निकाळजे ट्रान्स आणि एनबी ग्रुपला राज्यस्तरीय निवड चाचणी स्पर्धेचे यजमानपद परिषदेने दिले होते. जिल्हा कुस्तीगीर संघाने ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी झोकून देऊन काम करीत परिषदेचा विश्वास संपादन केला होता. त्यामुळेच परिषदेने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी पुन्हा सातारची निवड केली आहे. राज्यस्तरीय स्पर्धा तालीम संघाला बाजूला ठेवून सातारला घेतल्यानंतर परिषदेला जाब विचारण्याचे धाडस जिल्हा तालिम संघाने केले नसल्याने आज ही वेळ संघावर आल्याची चर्चा कुस्तीक्षेत्रात सुरू आहे.

दोन दिवसापूर्वी जिल्हा तालिम संघाचे अध्यक्ष साहेबराव पवार, सचिव सुधीर पवार, दीपकबापू पवार यांचेसह माणिक पवार,चंद्रकांत सूळ, जीवन कापले महाराष्ट्र केसरी बापू लोखंडे, संदीप मांडवे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या आयोजनात सहभागी करून घेण्याची मागणी केली. तालिम संघ परिषदेला संलग्न आहे आणि यापूर्वी आम्ही मागणी केल्यामुळे यजमानपदाचा आमचा अधिकार असल्याचा दावा केला. एवढ्यावरच न थांबता काल थेट कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खा. शरद पवार यांचेकडे गार्हाणे मांडले. दुसरीकडे जिल्हा कुस्तीगीर संघाने देखील पत्रकार परिषद घेऊन बाजू मांडली.जिल्हा तालिम संघाच्या नाकर्तेपणामुळे चार वेळा स्पर्धा आयोजनाची संधी गमवावी लागल्याचा आरोप साहेबराव जाधव, बलभीम भोसले दिलीप पवार, नवनाथ ढमाळ महाराष्ट्र केसरी धनाजी फडतरे, गोरख सरक, धनाजीकाका पाटील, हिंदकेसरी संतोष वेताळ, अमोल फडतरे यांनी केला. बारामतीला अध्यक्ष खा. शरद यांची भेट घेऊन परिषदेने स्पर्धा सातारला दिल्याबद्दल अभिनंदन करून स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा कुस्तीगीर संघ परिषदेला सहकार्य करणार असल्याचे सांगितले.

आम्हाला कुस्ती स्पर्धेत सामावून घेण्याबाबत परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना खा. पवार यांनी सुचना केल्याचा दावा दोन्ही गटांनी केला आहे.
दोन्ही बाजूचे म्हणणे परिषदेचे वस्ताद खा. शरद पवार यांनी ऐकून घेतले आहे. त्यामुळे परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांना वस्ताद पवार नेमका काय कानमंत्र देतात याचे चित्र आता स्पर्धेतील आखाड्यातच स्पष्ट होईल.

Related Stories

देशात लवकरच मिश्र लसीकरण?

datta jadhav

”CM नाही PM बदला”

Abhijeet Shinde

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी संवाद साधणार

Abhijeet Shinde

विलासकाकांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शनासाठी लोटला जनसागर

Patil_p

अधिसभा, व्यवस्थापन परिषदेच्या मंजूर ठरावांची फाईल धूळ खात

Sumit Tambekar

कानपूरमध्ये मोदींच्या दौऱ्याआधी दोन गटात दगडफेक; दहापेक्षा जास्त जखमी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!