Tarun Bharat

महालक्ष्मी यात्रेसाठी हिंडलगा सज्ज

उद्यापासून प्रारंभ, देवीच्या दर्शनासाठी एलईडी स्क्रीनची सोय, 22 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे

वार्ताहर / हिंडलगा

तब्बल शंभर वर्षानंतर पहिल्यांदाच होत असलेल्या हिंडलगा येथील ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. ग्रामस्थही सज्ज झाले आहेत. मंगळवार दि. 16 पासून यात्रेला प्रत्यक्षात सुरुवात होणार असल्याने गर्दी टाळण्यासाठी बेळगाव-वेंगुर्ला महामार्ग व बॉक्साईट रस्त्यावरून होणारी वाहतूक अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. यासाठी योग्यरित्या नियोजन करून प्रवासी व भाविकांनी गैरसोय टाळण्यासाठी यात्रोत्सव संघ व प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली आहे.

हिंडलगा गावची हद्द बेळगाव शहराला लागूनच आहे. शिवाय बेळगाव-वेंगुर्ला महामार्ग आणि बॉक्साईट  रोड हिंडलग्यातूनच गेल्याने यात्रा काळात मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवासी आणि भाविकांची गैरसोय थांबविण्यासाठी मंगळवार दि. 16 आणि बुधवार दि. 17 रोजी बेळगावहून बेळगाव-वेंगुर्ला रोडवरून होणारी वाहतूक मिलिटरी विनायक मंदिरपासून गणेशपूर रामघाट रोडमार्गे वळविली जाणार आहे. तेथून बेनकनहळ्ळीमार्गे सुळगा येथून पुन्हा बेळगाव-वेंगुर्ला रस्त्यावरून वाहतूक सुरू राहणार आहे. तर शिनोळीहून बेळगावला येणाऱया प्रवाशांना सुळगा-बेनकनहळ्ळी ते बेळगाव असा प्रवास करावा लागणार आहे. तसेच बॉक्साईट रोडच्या बाजूलाच यात्रा भरणार असल्याने दोन दिवस सदर रस्ता देखील वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार असून, सह्याद्रीनगरपासून मिलिटरी विनायक मंदिरमार्गे वाहतूक वळविण्यात येणार आहे.

त्यामुळे प्रवाशांना थोडय़ा प्रमाणात वळसा घालून आपले ठिकाण गाठावे लागणार आहे.

मण्णूर, गोजगा, आंबेवाडीतील प्रवाशांसाठीही हिंडलगा रस्ता बंद

याशिवाय मण्णूर, गोजगा आणि आंबेवाडी गावातील प्रवाशांसाठीही हिंडलगा रस्ता बंद राहणार असल्याने पंपिंग स्टेशन रोडमार्गे दुचाकी वाहतूक करावी लागणार आहे. तर चारचाकी आणि बस वाहतूक अलतगा किंवा उचगावमार्गे होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन यात्रोत्सव संघाचे अध्यक्ष कृष्णा पावशे व सेक्रेटरी प्रकाश बेळगुंदकर यांनी केले आहे.

अशी होणार यात्रा

मंगळवार दि. 16 रोजी सकाळी 6.47 वा. शुभमुहूर्तावर अक्षतारोपण समारंभ झाल्यानंतर लक्ष्मी गल्लीतील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरापासून देवीच्या रथोत्सवाला सुरुवात होणार आहे. तेथून लक्ष्मी गल्ली, मरगाई गल्ली, बेळगाव-वेंगुर्ला रोडमार्गे आंबेवाडी क्रॉसपर्यंत जावून सूर्यास्तापूर्वी रथ थांबविण्यात येणार आहे. त्यानंतर पुन्हा बुधवार दि. 17 रोजी सकाळी 8 वाजता रथयात्रेला सुरुवात होऊन दुपारी 2 वा. पर्यंत गदगेवर विराजमान होईल. धनगरी ढोल आणि ढोलताशा पथकाच्या उपस्थितीत सवाद्य अशी रथयात्रा होणार असून, रथ ओढण्यासाठी दोन्ही बाजूंना भाविक राहणार आहेत. त्यांच्यावर यात्रोत्सव संघाचे निरीक्षण राहील, मिरवणुकीची सांगता होऊन देवी गदगेवर विराजमान झाल्यानंतर देवीला नैवेद्य दाखवून ओटी भरण्याचा कार्यक्रम गुरुवार व शुक्रवारी होणार आहे. त्यानंतर शनिवार दि. 20 रोजी सायंकाळी 5 वा. श्री महालक्ष्मी देवीचे वाजत गाजत मिरवणुकीने सीमेकडे प्रयाण झाल्यानंतर यात्रेची सांगता होणार आहे.

मास्कशिवाय दर्शन नाही

श्री महालक्ष्मी यात्रेवर कोरोना महामारीचे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे भाविकांनी आपले व इतरांचेही संरक्षण करण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. यासाठी परगावातून हिंडलग्यात येणाऱया प्रवाशांनी मास्क धारण करूनच गावात प्रवेश करावा. तसेच देवीच्या दर्शनासाठी येताना मास्कचा वापर बंधनकारक राहणार आहे. मास्क नसल्यास दर्शनासाठी आत सोडले जाणार नाही. शिवाय दर्शनासाठी गदगेसमोर महिलांसाठी एक व पुरुषांसाठी एक वेगळी रांग बनविण्यात आली असून, प्रत्येकाला 6 फुटांचे अंतर ठेवावे लागणार आहे. तर यात्रोत्सव संघाकडून सॅनिटायझरची सोय करण्यात आली असून गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी 22 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तर भाविकांना देवीच्या दर्शनासाठी एलईडी स्क्रीनची देखील सोय करण्यात आली आहे.

या ठिकाणी राहणार पार्किंगची सोय

यात्रेला बेळगाव शहरासह इतर राज्यांतूनही लाखोंच्या संख्येने भाविकांची उपस्थिती राहणार आहे. त्यामुळे हिंडलगा परिसरात वाहतूक कोंडी होऊन नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही गैरसोय दूर करण्याच्या उद्देशाने यात्रोत्सव संघातर्फे विजयनगर दुसरा स्टॉप, रेणुका मंदिराजवळील खुली जागा, श्रीनाथनगर, मराठी शाळेच्या बाजूला असलेली पावशे यांची जागा, बेळगाव-वेंगुर्ला रोडवरील दक्षिण बाजूची मोकळी जागा, फॉरेस्ट नाका, बॉक्साईट रोडवरील हुतात्मा स्मारकाशेजारी रेशीम खात्याची जागा व कृषी पत्तीन सोसायटीच्या बाजूला असलेल्या खुल्या जागेत पार्किंगची सोय करण्यात आली आहे. भाविकांनी याची नोंद घेऊन वाहने गावात न आणता पार्किंगच्या ठिकाणी ठेवून सहकार्य करावे, असे आवाहन यात्रोत्सव संघातर्फे करण्यात आले आहे. तसेच यात्रोत्सव संघाच्या पदाधिकाऱयांकडे ओळखपत्रे देण्यात आली आहेत. कोणतीही समस्या निर्माण झाल्यास त्यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

Related Stories

श्रीपेवाडीत 550 जणांना कोरोना प्रतिबंधक लस

Omkar B

इतरत्र फिरणाऱया होम क्वारंटाईन नागरिकांवर कारवाईचा आदेश

Patil_p

हिंदी पेपरने बारावी परीक्षेची सांगता

Amit Kulkarni

जिल्ह्यात 325 नवीन अंगणवाडी केंद्रे

Amit Kulkarni

शहरांतर्गत बस तिकीट दरात कपात

Omkar B

शिक्षकांच्या वर्क फ्रॉम होमबाबत संभ्रमावस्था

Patil_p