Tarun Bharat

महाविकास आघाडीचा झेंडा, भाजपला धक्का

प्रतिनिधी / कोल्हापूर

संपूर्ण जिह्याचे लक्ष लागलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि घटक पक्षांच्या महाविकास आघाडीने बाजी मारली. त्यांच्या भक्कम एकजुटीने भाजपला जोरदार धक्का बसला असून सत्ता गमवावी लागली. काँग्रेसचे अध्यक्ष पदाचे उमेदवार बजरंग पाटील व राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष पदाचे उमेदवार सतीश पाटील यांना 65 पैकी 41 सदस्यांनी हात उंचावून मतदान केल्यामुळे त्यांनी मैदान जिंकले. तर भाजप आघाडीचे अध्यक्ष पदाचे उमेदवार अरुण इंगवले व उपाध्यक्ष पदाचे उमेदवार राहूल आवाडे यांना केवळ 24 सदस्यांनी मतदान करून ‘आधार’ दिला. त्यामुळे तब्बल 17 सदस्यांचे मताधिक्य मिळाल्यामुळे जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला.

 जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू सभागृहामध्ये गुरुवारी अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीची विशेष सभा पार पडली. या निवडणूक प्रक्रियेमध्ये करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी पीठासन अधिकारी म्हणून काम पाहिले. तर सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांनी त्यांना सहकार्य केले.

सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. दुपारी 12 वाजता भाजप आघाडीचे उमेदवार अरुण इंगवले व उपाध्यक्ष पदाचे उमेदवार राहूल आवाडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रसाद खोबरे यांनी इंगवलेंच्या अर्जासाठी सूचक म्हणून सही केली. तर आवाडेंच्या अर्जासाठी शिवाजी मोरे सूचक झाले. काँग्रेसच्या बजरंग पाटील यांना पी.एन.पाटील यांचे चिरंजीव राहूल पाटील सूचक झाले. तर सतीश पाटील यांना युवराज पाटील सूचक झाले.  दरम्यान चौघांच्याही नामनिर्देशन पत्रावर कोणीही हरकत न घेतल्याने सर्व नामनिर्देशन पत्रे वैध ठरविण्यात आली. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी नावडकर यांनी उमेदवारी मागे घेण्यास दहा मिनिटांचा कालावधी दिला. या कालावधीत राष्ट्रवादीचे युवराज पाटील यांनी भाजप आघाडीच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज माघार घेऊन निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली. पण ती संबंधितांनी मान्य न केल्यामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी वर्णानुक्रमे दुरंगी लढत झाली. या निवडीत 67 सदस्यांपैकी 65 सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. काँग्रेसचे सदस्य उमेश आपटे यांनी भाजपच्या विजय भोजेंना मतदान करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश सादर करत हरकत घेतली त्यामुळे त्यांनी तटस्थ राहत मतदान केले नाही . तर राष्ट्रवादीचे सदस्य जीवन पाटील हे गैरहजर राहिले.

हात उचांवून घेण्यात आलेल्या मतदान प्रक्रीयेत महाविकास आघाडीच्या बजरंग पाटील आणि सतीश पाटील यांना 41 मते मिळाली. त्यांनी 17 मतांनी विजय मिळवत प्रतिस्पर्धी उमेदवार अरुण इंगवले आणि राहूल आवाडे यांचा पराभव केला. दोघांच्या विजयाची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी करून त्यांना शुभेच्छा दिल्या. या निवडीमुळे राज्याप्रमाणे कोल्हापूर जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीचा फॉर्म्युला यशस्वी झाला असून या निवडणुकीत भाजपचे पानिपत झाल्याचे स्पष्ट झाले. महाविकास आघाडीच्या सत्ता संपादनामुळे जिल्हा परिषदेतील भाजपची अर्थात माजी आमदार महादेवराव महाडिक यांची सत्ता संपुष्टात आली

भोजेंच्या मतदानावर घेतला आक्षेप

भाजपचे पक्षप्रतोद विजय भोजे यांच्या जात दाखल्या वैधतेवरून न्यायालयीन वाद सुरु आहे. हा वाद थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. यामध्ये न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार भोजे सदस्य म्हणून पात्र असले तरी त्यांना मतदानाचा अधिकार नसल्याबाबतचा न्यायालयीन आदेश काँग्रेसचे सदस्य उमेश आपटे यांनी पीठसन अधिकारी नावडकर यांच्याकडे दिला. भोजे मतदानासाठी पात्र नसल्याचा आक्षेप आपटे यांनी घेतला. पण नावडकर यांनी भोजे यांना म्हणणे मांडण्यास सांगितले. यावेळी आदेशामध्ये मतदानाचा अधिकार नसल्याबाबतचा कोणताही उल्लेख नसल्याचे भोजे यांनी स्पष्ट केले. त्यांच्या म्हणण्यावर आपटे यांनी पुन्हा आक्षेप घेतला. अखेर भोजे यांनी आपण मतदान करत नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर या वादावर पडदा पडला.

 फेटेवाल्यांची संख्या जास्त असताना घाबरता कशाला ?

 अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीसाठी महाविकास आघाडीचे सर्व सदस्य फेटे बांधून सभागृहात आले होते. त्यामुळे महाविकास आघाडीचे संख्याबळ सभागृहात ठळकपणे दिसून येत होते. तरीही काँग्रेसचे सदस्य उमेश आपटे यांनी विजय भोजे यांच्या मतदानाच्या अधिकारावर आक्षेप घेतला. यावेळी भोजे यांनी महाविकास आघाडीकडे फेटेवाल्यांची संख्या जास्त असताना भोजेच्या एका मतासाठी घाबरण्याची गरज काय ? असा सवाल आपटे यांना उपस्थित केला. तसेच महादेव कोळी समाजाचा एक सदस्य या सभागृहात असताना त्याच्या सदस्यत्वाबद्दल कोणी आक्षेप घेऊ नये अशी विनंती केली.

रेखा हत्तरकी यांनी हात उंचावला, पण सही नाही

भाजप आघाडीचे उपाध्यक्ष पदाचे उमेदवार राहूल आवाडे यांना मतदान करण्यासाठी ताराराणी आघाडीच्या रेखा हत्तरकी यांनी हात उंचावला. त्यानंतर मतदान केलेल्या सदस्यांची सही आणि नाव लिहणे आवश्यक असते. पण हत्तरकी यांनी सही केली नसल्यामुळे मतदानाची सहीनुसार मोजणी करताना एक मत कमी पडले. यावेळी कोणी सही केली नाही, याबाबत पडताळणी केल्यानंतर हत्तरकी यांचे नाव स्पष्ट झाले. त्यामुळे संबंधित कर्मचारी हत्तरकी यांची सही घेण्यास गेल्यानंतर त्यांनी नकार दिला. यावेळी प्रशासनाने हत्तरकी यांच्यावर सही करण्यासाठी दबाव आणू नये असे म्हणणे महाविकास आघाडीचे उपाध्यक्ष पदाचे उमेदवार सतीश पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱयांसमोर मांडले. याला आवाडे यांनी आक्षेप घेत हात उंचावला असताना विरोधकांनी सही न करण्यासाठी हत्तरकी यांच्यावर दबाव आणू नये असे स्पष्ट केले. यावेळी नावाडकर यांनी चित्रीकरण पाहून हत्तरकी यांनी हात उंचावल्याचे स्पष्ट केल्यानंतर अखेर त्यांनी सही केली.

सासऱयाविरोधात जावयाचे मतदान

    शिवसेना सदस्य अंबरिष घाटगे हे गेली अडीच वर्षे भाजप आघाडीतून  शिक्षण सभापती होते. तसेच सध्याच्या सत्ता स्थापनेच्या घडामोडीतही ते भाजपसोबत राहिले होते. परिणामी गुरुवारी अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणूकीच्या विशेष सभेसाठी ते भाजप आघाडीच्या सदस्यांसोबत सभागृहात आले. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेमध्येही भाजपच्या उमेदवारांना मतदान करतील असे चित्र होते. तसेच अध्यक्ष पदाचे उमेदवार अरुण इंगवले हे घाटगे यांचे सासरे आहेत. त्यामुळे ते इंगवले यांनाच मतदान करणार अशी महाविकास आघाडीच्या नेत्यांची धारणा होती. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीसोबत राहण्याबाबत केलेली सक्त सुचना आणि भाजप आघाडीची मॅजिक फिगर जुळत नसल्यामुळे अखेर घाटगे यांनी सासरे इंगवले यांच्या विरोधात मतदान केले. पण या घटनेतून घाटगे यांनी पक्षादेश पाळल्याचे स्पष्ट केले.

राष्ट्रवादीचे जीवन पाटील गैरहजर

राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य जीवन पाटील हे अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीच्या विशेष सभेला गैरहजर राहिले. त्यामुळे महाविकास आघाडीला 1 मताची वजाबाकी करावी लागली. त्यांच्या अनुपस्थितीची सभागृहात चर्चा सुरु होती.

मतदान प्रक्रियेचे चित्रीकरण

अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया पारदर्शी रहावी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे चित्रीकरण करण्यात आले. दरम्यान निवड प्रक्रियेमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्हा परिषद परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी काम करणार

मंत्री हसन मुश्रीफ, सतेज पाटील आमदार पी.एन.पाटील, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर यांच्यासह शिवसेनेच्या माजी आमदारांनी माझी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदावर निवड केल्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. अध्यक्ष म्हणून काम करताना मी जिह्यातील सर्वसामान्य जनतेचा विकास साधण्यासाठी प्रयत्न करणार आहे. गेली 41 वर्षे काँग्रेस पक्षामध्ये एकनिष्ठेने केलेल्या कामाचे हे फळ आहे.

बजरंग पाटील नूतन जि.. अध्यक्ष

शेतकऱयांच्या विकासासाठी कटिबद्ध

आमचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी माझी उपाध्यक्ष पदासाठी केलेल्या निवडीबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. उपाध्यक्ष तथा कृषी समितीचा अध्यक्ष म्हणून काम करताना जिह्यातील शेतकऱयांच्या विकासासाठी,त्यांना नवनवीन योजनांचा लाभ देण्यासाठी कटिबद्ध राहू. राष्ट्रवादी आणि मंत्री मुश्रीफ यांच्यासोबत एकनिष्ठ राहिल्याचे फळ मिळाले आहे.

सतीश पाटील नूतन जि.. उपाध्यक्ष,

जि..अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीतील पक्षीय बलाबल

महाविकास आघाडी

काँग्रेस                     14

राष्ट्रवादी                   10

शिवसेना                   10

स्वाभिमानी शेतकरी संघटना    02

शाहू विकास आघाडी         02

अपक्ष                     01

चंदगड युवक क्रांती आघाडी    01

ताराराणी आघाडी            01

एकूण                     41

भाजप आघाडी

भाजप                    14

जनसुराज्य                 06

आवाडे गट                02

चंदगड युवक क्रांती आघाडी   01

ताराराणी आघाडी           02

एकूण                    24

Related Stories

निलेश-नितेश हे संपलेलं गणित : विनायक राऊत

Archana Banage

विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शिक्षकांचा देशव्यापी निषेध दिन

Archana Banage

‘पीएम किसान’चे 1 कोटी 61 लाख होणार वसूल

Archana Banage

कागल येथे अपघातात एकजण जागीच ठार

Archana Banage

दार उघड.., उद्धवा..दार उघड..!

Archana Banage

कोल्हापूर : पेठ वडगावात ५ कोरोना रुग्णांची भर, एकूण रुग्णसंख्या १६६ वर

Archana Banage