कार्वे / वार्ताहर
जुलै महिन्यात पुरामुळे कोसळलेल्या विद्युत वाहिन्यांचा स्पर्श होऊन धुमडेवाडी येथे तीन जनावरांचा जागीच मृत्यु झाला. त्यामुळे महावितरणची बेफिकिरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. मृत जनावरांमध्ये सुभाष रामचंद्र पाटील यांची दुभती म्हैस व राजू जक्कापा पाटील यांची एक गाभण गाय व एक म्हैस यांचा समावेश आहे.
आज (दि. १९) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास सुभाष पाटील हे जनावरांना चरायला घेऊन गेले होते. त्यावेळी अचानक जनावरे विद्युत तारेंच्या दिशेने गेली यामध्ये एका मागे एक अशी तीन जनावरे यांना करंट लागला व ती तिथेच मरण पावली तर एक लहान म्हैस प्रसंगावधानाने बचावली.या घटनेची माहिती मिळताच चंदगड अभियंता व्ही. एस. लोधी यांनी घटनास्थळी भेट दिली.
याआधी गावातील काही लोकांनी विद्युत कर्मचाऱ्यांना याआधी सूचना दिली होती. पण याकडे महावितरणने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.
परिणामी या तीन मुक्या जनावरांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेने धुमडेवाडी गावात व पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. तर या घटनेला विद्युत मंडळच जबाबदार असल्याने या जनावरांच्या कुटुंबियांना महावितरण’कडून तात्काळ नुकसान भरपाई मिळावी.अन्यथा विद्युत मंडळावर मोर्चा काढण्याचा ईशारा धुमडेवाडी ग्रामस्थांनी दिला आहे.

