प्रतिनिधी / मिरज
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांचा शुक्रवारचा निरीक्षण दौरा केवळ उपचार ठरला. महाव्यवस्थापकांनी `बुलेट ट्रेन’पेक्षाही वेगाने पाहणी दौरा केल्याने महत्त्वाच्या विषयांवर चर्चाच झाली नाही. तासभराच्या दौऱ्यातून स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रवासी संघटनांचे निवेदन स्वीकारण्यासाठी `जीएम’ साहेबांनी केवळ 15 मिनिटे दिली. महत्त्वाच्या विषयावर निर्णयाची अपेक्षा असताना राजेशाही थाटातच दौरा केल्याने महाव्यवस्थापकांचा दौरा `बुलेट ट्रेनपेक्षा फास्ट’ झाला असे म्हणण्याची वेळ आली.
या दौऱ्यामुळे मिरज जंक्शनवरील सर्व प्लॅटफॉर्म आणि स्थानक परिसर चकाचक केला होता. एरवी कचरा कोंडाळ्यात असलेल्या जंक्शनवर आज मात्र सर्वत्र स्वच्छता करुन औषध फवारणीही झाली होती. सकाळी साडेदहा वाजता जीएम स्पेशल ट्रेनने महाव्यवस्थापक संजीव मित्तल मिरजेत दाखल झाले. त्यांच्या सोबत पुणे विभागीय रेल प्रबंधक रेणू शर्मा होत्या. विविध विभागांची पाहणी करुन आढावा घेतला. स्टेशन प्रबंधक पन्नीर सेल्वम यांनी माहिती दिली.
लोका सांगे ब्रम्हज्ञान या दरम्यान, रेल्वे पोलिसांनी मात्र कोरोनाचे नियम सांगत स्थानिक लोकप्रतिनिधी, रेल्वे संघटनांचे पदाधिकारी आणि पत्रकारांना जंक्शनच्या प्रवेशद्वाराजवळ अडविले. प्रत्यक्षात रेल्वेच्या अधिकारी आणि रेल्वे पोलिसांनीच सोशल डिस्टन्सचे नियम धाब्यावर बसविल्याचे दिसले. फलाट एकला जत्रेचे स्वरुप आले होते. महाव्यवस्थापकसाहेबांसोबत शंभरहून जास्त अधिकारी होते. कोरोनाचे नियम सांगणाऱ्या रेल्वे विभागाने सोशल डिस्टन्सचा भंग केल्याने लोका सांगे….अशी स्थिती होती. |
महालक्ष्मी एक्सप्रेस लवकरच सुरू होणार कोरोनामुळे बंद केलेली कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस सुरु करावी, विद्युतीकरण आणि दुहेरीकरण वर्षात पूर्ण करावे, व्यापारी, नोकरदारांसाठी इंटरसिटी रेल्वे सुरू करावी, कृष्णाघाट रोडवरील ओव्हर ब्रिज तातडीने करावे, पंढरपूर रेल्वे लाईनच्या बेळंकी येथे भुयारी रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा, समतानगर (मराठे मिलजवळ) अंडरग्राऊंड पासऐवजी ओव्हर ब्रिज करावा आदी मागण्यांचे निवेदन खासदार संजय पाटील, आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी दिले. महाव्यवस्थाकांनी तसेच रेल्वे दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाचे कामही एक वर्षात पूर्ण होईल, अशी ग्वाही दिली. भाजप नेते सुरेश आवटी, माजी महापौर संगीता खोत, मोहन वनखंडे, गजेंद्र कुल्लोळी, रेल्वे कृती समितीचे सुकुमार पाटील, ज्ञानेश्वर पोतदार, अल्लाबक्ष काझी, संतोष माने, जहीर मुजावर, रिक्षा संघटनेचे महेश चौगुले, अजमुद्दीन खतीब, बंडू तोडकर उपस्थित होते. |
पॅसेंजर गाड्यांबाबत मौन तब्बल नऊ महिन्यांपासून मिरज-कोल्हापूर, मिरज-पुणे, मिरज-बेळगाव, मिरज-सोलापूर, मिरज-पंढरपूर मार्गावरील पॅसेंजर सुरू करण्याची आग्रही मागणी असताना मित्तल यांनी कोणतेही भाष्य केले नाही. त्यामुळे रेल्वे प्रवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. दौऱ्याच्या उत्तरार्धात खासदारांकडून निवेदन स्वीकारुन केवळ एकच मिनिट चर्चा झाली. या एक मिनिटाच्या चर्चेने रेल्वेचे प्रश्न मार्गी लागतील का? हाच खरा प्रश्न आहे. |
काजू, बदामावर ताव महाव्यवस्थापकांच्या दौऱ्यानिमित्त जंक्शनबाहेर मंडप घातला जात होता. यंदा मात्र फलाटावरच अलिशान मंडप उभारला होता. महाव्यवस्थापकांची खातिरदारी करण्यासाठी सोफासेट, काचेचे टेबल, पॅन, बिसलरीच्या बाटल्या ठेवल्या होत्या. याशिवाय त्यांच्या नाष्टÎासाठी काजू, बदाम, पिस्ता, सुके अंजिर, कुंदाबर्फी, बाकरवडी, बटाटे चिप्स आदी पदार्थांची मेजवानी होती. शामीयानात बसूनच महाव्यवस्थापकांनी खासदार संजयकाका पाटील, आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी प्रवाशांच्यावतीने दिलेले विविध मागण्यांचे निवेदन स्वीकारले. |


धावता पाहणी दौरा मित्तल यांनी एक तासाच्या दौऱ्यात सर्वच विभागांना धावती भेट दिली. कोणत्या विभागात काय चर्चा झाली, याची माहिती दिली गेली नाही. प्रवाशांच्या समस्या, मागण्या काय आहेत? येथे यंत्रणा अपुरी पडते का? याची साधी चौकशीही झाली नाही. स्टेशन प्रबंधकांनी माहिती दिली आणि महाव्यवस्थापकांनी ऐकली. कामचुकार आणि मनमानी कारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांविषयी अनेक तक्रारी असताना त्याची चौकशीही झाली नाही. |
दगडफेकीचा पुरावाच संपवला दोन आठवड्यापूर्वी स्थानकावर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक करुन दर्शनी भागाच्या काचा फोडल्या होत्या. स्टेशन प्रबंधकांनी याची साधी तक्रारही पोलिसात दिली नव्हती. महाव्यवस्थापकांच्या भेटीवेळी फुटलेली काच दाखवून स्थानिक लोकप्रतिनिधींकडून जाब विचारला जाणार होता. मात्र, स्टेशन अधिकाऱ्यांनी फुटलेली ही काच बदलून दगडफेकीचा पुरावाच नष्ट केला. त्यामुळे संशयित आरोपी मोकाटच आहेत. |