Tarun Bharat

महिनाभरापूर्वी कुटुंबप्रमुख गेले, आता पत्नी, सून अन् नातूही

Advertisements

वार्ताहर/ मार्गताम्हाने

कर्त्या पुरुषाच्या महिनाभरापूर्वीच झालेल्या मृत्यच्या धक्क्यातून सावरण्याआधीच पेढे कुंभारवाडीतील मांडवकर कुटुंबियांवर काळाने पुन्हा एकदा घाला घातला. बुधवारच्या अतिवृष्टीत दरड कोसळून संपूर्ण घरच गाडले गेले. यामध्ये सासू, सून, नातू यांच्या मृत्यूने पेढे परिसरावर शोककळा पसरली आहे. दरडीमुळे लगतची आणखी सहा घरेही जमीनदोस्त झाली आहेत.

जिह्यात पूर आणि दरडी कोसळून कित्येक संसार उद्ध्वस्त झाले. चिपळूणपासून सुमारे 2 कि.मी. वरील पेढे कुंभारवाडी येथे डोंगरालगत असलेल्या 6 घरांवर दरड कोसळून ती घरेच जमीनदोस्त झाली. यापैकीच मांडवकर कुटुंबियांचे घर या दरडीत सापडले. यात सासू, सून व दीड वर्षाचा मुलगा वाहून गेले. या तिघांचे मृतदेह दुसऱया दिवशी सापडले. पेढे कुंभारवाडीतील हरिश्चंद्र मांडवकर यांचे महिनाभरापूर्वीच आजाराने निधन झाले होते. त्यांचा मुलगा अविनाश नोकरीनिमित्त मुंबईला असतो. वडिलांचे उत्तरकार्य उरकून तो एकटाच मुंबईला गेला. वडिलांच्या भाद्रपद महिन्यात येणाऱया विधीला संपूर्ण कुटुंबाला पुन्हा गावाला आणावे लागेल, यासाठी त्याने आई अर्चना, पत्नी आरोही व मुलगा आरुष या तिघांना गावालाच ठेवले होते. कोसळलेल्या दरडीत त्यांचे संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झाले.  

कुंभारवाडीत डोंगरालगतच एकूण 6 घरे होती. यामध्ये एक घर बंद होते. अन्य घरातील माणसांनी दरड कोसळण्याचा आवाज आल्याने घराबाहेर उडय़ा मारल्या. मात्र बाहेर पुराचे पाणी असल्याने त्यांनी कसेबसे स्वतःला वाचवले. यातील एका घरातील सुप्रिया शशिकांत मांडवकर गंभीर असून त्यांच्यावर रत्नागिरीतील चिरायू हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. पेढे कुंभारवाडीतील 6 घरांचे अवशेषही शिल्लक राहिलेले नाहीत. पेढे गावात पाणी घुसण्याला महामार्गाचे अधिकारी व ठेकेदार जबाबदार असल्याचा ठपका ठेऊन रस्त्याचे काम बंद करावे, यासाठी ग्रामस्थ तेथे गेले होते. मोऱयांच्या अर्धवट बांधकामामुळे पाणी परशुरामपासून पेढेकडे वळल्याने ही पूरस्थिती ओढवली असून कल्याण टोलवेजचे अधिकारी व ठेकेदार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली.

..अन् काकांनी धाव घेत 6 जणांना वाचवले

पेढे गावातील कुंभारवाडीसह विठ्ठलपेठ व तळेवाडी या 2 वाडय़ांना पुराच्या पाण्याने वेढले होते. दुपारच्या सुमारास त़ळेवाड़ीतील घराभोवती पाणी छतापर्यंत पोहोचले होते. अशावेळी काहींनी आपल्या दुमजली घरांचा आश्रय घेतला. यावेळी संदीप सातपुते यांच्या कौलारु घरालाही पाणी लागले. आपण बुडणार, या भीतीने घरातील 18 वर्षाच्या मुलीने पेढेचे सरपंच प्रवीण पाकळे यांना मोबाईल करुन काका मला वाचवा, असा टाहो फोडला. यावेळी त्यांनी तिला धीर देत बोटीची व्यवस्था करतो, असे सांगितले. मात्र तोपर्यंत पुराचे पाणी वाढत गेल्याने पाकळे यांनी स्वतः या कुटुंबाला वाचवण्यासाठी धाव घेतली. संतोष संसारे व एकनाथ रेडीज यांच्या मदतीने या कुटुंबांतील सहाजणांना दोरीच्या सहाय्याने बाहेर काढून अन्यत्र हलवले.

Related Stories

रुजारिओ पिंटो यांची हॅट्रिक

Anuja Kudatarkar

जिह्यात कोरोनाचा मृत्युदर पुन्हा 3 टक्क्यांवर

Patil_p

काँग्रेस तालुका अध्यक्ष आबा मुंज यांचे निधन

NIKHIL_N

लॉकडाऊन काळात युवकांनी सायकलची बनविली ‘वंडर’ बाईक

NIKHIL_N

… पश्चिम किनारपट्टीवर 1 हजारहून अधिक ट्रॉलर्सची घुसखोरी

Patil_p

केंद्राची ऑप्टिकल फायबर इंटरनेट योजना सिंधुदुर्गमध्ये राबविणार!

NIKHIL_N
error: Content is protected !!