Tarun Bharat

महिलांची टी-20 चॅलेंज स्पर्धा आजपासून

सुपरनोव्हाज-व्हेलॉसिटी यांच्यात सलामीची लढत, ट्रेलब्लेझर्स तिसरा संघ

वृत्तसंस्था/ शारजा

महिलांची टी-20 चॅलेंज स्पर्धा बुधवारपासून येथे सुरू होत असून भारतातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूंसह इंग्लंड, दक्षिण आफ्रिका व वेस्ट इंडीजमधील स्टार महिला क्रिकेटपटूंचाही त्यात सहभाग असणार आहे. या स्पर्धेतील सर्व सामने शारजामध्ये खेळविले जाणार असून सायंकाळी 7.30 वाजता या सामन्यांना प्रारंभ होणार आहे. महिलांची पूर्ण लांबीची आयपीएल स्पर्धा आयोजित करण्याचा बीसीसीआयचा मानस असून ही स्पर्धा त्याची रंगीत तालीम ठरणार आहे. सुपरनोव्हाज व व्हेलॉसिटी यांच्यात पहिला सामना होत आहे.

विद्यमान विजेते सुपरनोव्हाज, मागील वर्षीचे उपविजेते व्हेलॉसिटी आणि ट्रेलब्लेझर्स या तीन संघांत ही स्पर्धा होत असून प्रत्येक संघ एकमेकांविरुद्ध एक सामना खेळणार आहे. 9 नोव्हेंबर रोजी यातील अंतिम लढत होणार आहे. या तीन संघांत लंका, बांगलादेश, न्यूझीलंड येथील महिला खेळाडूंचाही समावेश आहे. सुपरनोव्हाज या संघाने या स्पर्धेवर आजपर्यंत वर्चस्व गाजविले असून मागील दोन्ही स्पर्धा त्यांनीच जिंकल्या आहेत. हरमनप्रीत कौर या संघाची कर्णधार आहे. सुपरनोव्हाज व मिताली राजचा व्हेलॉसिटी संघ यांच्यात बुधवारी पहिला सामना होणार आहे. गेल्या वर्षी याच दोन संघांत अंतिम लढत झाली होती. जेतेपदाची हॅट्ट्रिक साधणे हेच सुपरनोव्हाजचे मुख्य ध्येय असेल. मागील आवृत्तीत हरमनप्रीत कौर जबदरस्त फॉर्ममध्ये होती. तिने तीन सामने व अंतिम लढत यामध्ये एकूण दोन अर्धशतके नोंदवली. अंतिम सामन्यात तिने 37 चेंडूत 51 धावा फटकावत संघाला जेतेपद मिळवून दिले होते.

यावर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या महिलांच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत हरमनप्रीतकडून अपेक्षित कामगिरी झाली नव्हती. त्यामुळे मागील वर्षी या स्पर्धेत दाखविलेला फॉर्म पुन्हा मिळावा, अशी ती अपेक्षा करीत आहे. विश्वचषकात तिने 5 सामन्यात केवळ 6 धावांच्या सरासरीने धावा जमविल्या होत्या आणि त्याचाच भारतीय संघाला जबर फटका बसला होता. 185 धावांचा पाठलाग करताना भारतीय महिला संघ केवळ 99 धावा कोलमडला होता. यावेळी जेमिमा रॉड्रिग्जच्या कामगिरीवरही सर्वांची नजर असणार आहे. गेल्या मोसमात तिने 61.50 च्या सरासरीने सर्वाधिक 123 धावा जमविल्या होत्या आणि तिला मालिकेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कारही मिळाला होता.

गेल्या वर्षी रोमांचक ठरलेल्या टी-20 चॅलेंजच्या अंतिम लढतीत मिताली राजच्या व्हेलॉसिटीला 4 गडय़ांनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्या पराभवाची परतफेड करण्यास तिचा संघ उत्सुक झाला आहे. भारतीय महिलांमधील सर्वात स्फोटक फलंदाज म्हणून ओळख निर्माण केलेल्या शेफाली वर्माकडेही सर्वांचे लक्ष असेल. टी-20 विश्वचषक स्पर्धेत तिने सर्वाधिक 9 षटकार ठोकत सनसनाटी निर्माण केली आणि सर्वाधिक धावा जमविणाऱयांत तिने पाचवे स्थान मिळविले होते.

येथील स्पर्धेत खेळणाऱया सर्व खेळाडू कोरोनाच्या ब्रेकनंतर प्रथमच आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळत आहेत. फेब्रुवारी-मार्चमधील टी-20 विश्वचषक स्पर्धेत त्यांनी शेवटचा भाग घेतला होता. लॉकडाऊननंतर त्या प्रथमच खेळणार असल्याने  त्यांच्या तंदुरुस्तीचा स्तर पाहणे मनोरंजक ठरणार आहे. थायलंडची सलामीची फलंदाज नाथकन चान्थमही या स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. विश्वचषक स्पर्धेत तिने थायलंडतर्फे पहिले अर्धशतक झळकवण्याचा मान मिळविला होता. संलग्न देशातून या स्पर्धेत खेळणारी ती पहिली खेळाडू आहे. महिला क्रिकेटला संजीवनी देण्यासाठी 2018 मध्ये या स्पर्धेची सुरुवात करण्यात आली असून त्यावेळी फक्त एक सामना खेळविण्यात आला होता.

संघ : सुपरनोव्हाज : हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्ज (उपकर्णधार), चमारी अटापटू, प्रिया पुनिया, अनुजा पाटील, राधा यादव, तानिया भाटिया, शशिकाला सिरिवर्दने, पूनम यादव, शकीरा सेल्मन, अरुंधती रेड्डी, पूजा वस्त्रकार, आयुशी सोनी, आयाबोन्गा खाका, मुस्कान मलिक.

व्हेलॉसिटी : मिताली राज (कर्णधार), वेदा कृष्णमूर्ती (उपकर्णधार), शेफाली वर्मा, सुषमा वर्मा, एकता बिश्त, मानसी जोशी, शिखा पांडे, देविका वैद्य, सुश्र दिव्यदर्शिनी, मनाली दक्षिणी, ले कॅस्पेरेक, डॅनियली व्याट, सुन लुस, जहानारा आलम, एम. अनघा.

ट्रेलब्लेझर्स : स्मृती मानधना (कर्णधार), दीप्ती शर्मा (उपकर्णधार), पूनम राऊत, रिचा घोष, डी.हेमलता, नुझहत परवीन, राजेश्वरी गायकवाड, हरलीन देओल, झुलन गोस्वामी, सिमरन दिल बहादूर, सलमा खातुन, सोफी एक्सलस्टोन, नाथकन चान्थम, दियांन्द्रा डॉटिन, काश्वी गौतम.

सामन्याची वेळ : सायंकाळी 7.30 पासू

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स.

Related Stories

पाकचा दक्षिण आफ्रिका दौरा एप्रिलमध्ये

Patil_p

साईराज चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

Omkar B

कॅनडाचा ऍलीसिमे अंतिम फेरीत

Patil_p

आर्चर वनडे मालिकेतून बाहेर

Patil_p

..तर हाफीजची निवृत्ती लांबणीवर

Patil_p

विराटची पहिली ऑडी पोलीस स्टेशनमध्ये का?

Patil_p