Tarun Bharat

महिला कलाकार असणारे कार्यक्रम दाखवू नका

तालिबानचा फर्मान- महिला पत्रकारांनी हिजाब घालणे आवश्यक

वृत्तसंस्था / काबूल

अफगाणिस्तानातील तालिबानी राजवटीने देशातील सर्व टीव्ही वाहिन्यांना महिला कलाकार असणारे कार्यक्रम प्रसारित न करण्याचा आदेश दिला आहे. प्रत्येक महिला पत्रकाराने स्वतःच्या वृत्ताचे प्रसारण करताना पारंपरिक हिजाब घातलेला असावा असेही तालिबानकडून वृत्तवाहिन्यांना बजावण्यात आले आहे.

देशातील सर्व टीव्ही वाहिन्यांना आमच्या आदेशांचे पालन करावे लागेल असे काही दिवसांपासून तालिबानच्या माहिती-प्रसारण विभागाकडून म्हटले गेले आहे. तालिबानने 15 ऑगस्ट रोजी काबूलवर कब्जा केला होता. तेव्हापासून तेथे अनेक बंधने लादण्यात आली आहेत.

तालिबान राजवटीने नवे धार्मिक दिशानिर्देश दिले आहेत. या दिशानिर्देशांचे पालन करण्याचा आदेश वृत्तवाहिन्यांना देण्यात आला आहे. महिला कलाकार नसलेले नाटक किंवा कार्यक्रम प्रसारित करता येणार असल्याची अट घालण्यात आली आहे. इस्लामशी संबंधित चित्र दाखविण्यात आलेले कार्यक्रम किंवा चित्रपट प्रसारित करू नये असे वृत्तवाहिन्यांना सांगण्यात आले आहे.

परंपरांची खबरदारी घ्या

इस्लाम किंवा अफगाणिस्तानच्या परंपरांच्या विरोधात असलेले कार्यक्रम किंवा चित्रपट दाखविले जाऊ शकत नाहीत. हे नियम नसून दिशानिर्देश आहेत. देशातील सर्व टीव्ही वाहिन्या याचे पालन करतील अशी अपेक्षा असल्याचे तालिबानचा प्रवक्ता हाकिफ मोहाजिरने म्हटले आहे. तालिबानने नवे दिशानिर्देश सोशल मीडियावरही प्रसिद्ध केले आहेत.

महिलांना अधिकार नाहीत

महिलांना इस्लामच्या मर्यादेत राहून सर्व अधिकार देण्यात येतील असे आश्वासन तालिबानने दिले होते. पण असे घडताना दिसून येत नाही. विद्यापीठ आणि शाळांमध्ये महिलांसाठी अत्यंत कठोर नियम लागू करण्यात आले आहेत. महिला पत्रकारांना रस्त्यांवर मारहाण करण्याचे प्रकार घडले आहेत. अफगाणिस्तानात दोन दशकांपासून खासगी टीव्ही वाहिन्या आहेत.  तालिबानच्या राजवटीत या वाहिन्यांवर अनेक निर्बंध लादण्यात आल्याने अनेक वाहिन्या बंद झाल्या आहेत.

Related Stories

मालदीवमध्ये भीषण आग ; ९ भारतीयांचा मृत्यू

Archana Banage

युक्रेनच्या युवती घेत आहेत सैन्य प्रशिक्षण

Patil_p

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे नरेंद्र मोदींना आमंत्रण

Amit Kulkarni

जगात पायाभूत प्रकल्प सुरू करणार अमेरिका

Patil_p

ईस्टर आयलँडवर 900 मूर्ती

Patil_p

अलाउलात पर्यटकांना मिळणार प्रवेश

Patil_p