Tarun Bharat

महिला संघाच्या प्रशिक्षकपदासाठी पाच महिलांचे अर्ज

माजी निवड समिती प्रमुख हेमलता कला यांचा समावेश

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांत पाच महिलांचा समावेश असून त्यात माजी निवड समिती अध्यक्षा हेमलता कला यांचाही समावेश आहे. 2017 पासून पुरुष क्रिकेटपटूंनीच हे पद सांभाळले होते.

या पदासाठी अर्ज पाठविलेल्यांत ममता माबेन, जया शर्मा, सुमन शर्मा, नूशिन अल खादीर या अन्य महिलांचा समावेश आहे. माजी क्रिकेटपटू व महिला संघाचे माजी प्रशिक्षक डब्ल्यूव्ही रमण यांनी पुन्हा एकदा या पदासाठी अर्ज दाखल केला आहे. गेल्या मार्चमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका संपल्यानंतर त्यांची मुदत संपली होती. याशिवाय महिला संघाचे माजी प्रशिक्षक असलेले रमेश पोवार, तुषार आरोठे यांनीही अर्ज केला आहे. संघातील वरिष्ठ महिला खेळाडूंशी मतभेद निर्माण झाल्यानंतर पोवार व आरोठे यांना पद सोडणे भाग पडले होते. 26 एप्रिल ही अर्ज पाठविण्याची अखेरची मुदत होती.

मदनलाल यांच्या नेतृत्वाखालील क्रिकेट सल्लागार समिती आता या पदासाठी निवड करणार आहे. नीतू डेव्हिड यांच्या नेतृत्वाखालील महिला निवड समितीची, प्रमुख प्रशिक्षकपदी महिलेचीच निवड व्हावी, अशी इच्छा आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीला न्यूझीलंडमध्ये विश्वचषक स्पर्धा होणार आहे, त्याच्या तयारीसाठी त्यांना बरेच काम करावे लागणार आहे. ‘मुलाखतीच्या तारखेबद्दल बीसीसीआयकडून आम्हाला अद्याप काही कळविण्यात आलेले नाही. आम्हाला सांगितले जाईल तेव्हा, पुरुष अथवा महिला यापैकी सर्वोत्तम व्यक्ती निवडण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत,’ असे मदनलाल यांनी सांगितले. पूर्णिमा राऊत या पदावर काम केलेल्या शेवटच्या महिला होत्या. एप्रिल 2017 मध्ये त्यांना प्रमुख प्रशिक्षकपदावरून काढण्यात आले होते.

त्यानंतर तुषार आरोठे यांनी त्यांच्याकडून पदभार स्वीकारला होता आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय महिला संघाने विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती. त्यांच्या जागी नंतर रमेश पोवार यांची नियुक्ती करण्यात आली होती. पण वरिष्ठ खेळाडूंशी मतभेद झाल्यानंतर त्यांचीही हकालपट्टी झाली होती. अनुभवी मिताली राजने, आपली कारकीर्द संपविण्याचा ते प्रयत्न करीत असल्याचा त्यावेळी आरोप केला होता. रमण यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर 2020 मध्ये झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारताने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. अर्ज केलेल्या महिलांमधील हेमलता कला निवड समितीच्या माजी प्रमुख आहेत. त्यांनी शेफाली वर्मासारख्या नवोदितांना पुढे येण्याची संधी दिली. अलीकडे त्यांनी उत्तरप्रदेश वरिष्ठ संघाचे प्रमुख प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे. सुमन यांनी साहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम पाहिले असून महिलांच्या टी-20 चॅलेंजमध्ये त्यांनी माबेनसह प्रशिक्षकाचे काम केले आहे. माबेन यांनी बांगलादेश व चीन संघाला प्रशिक्षण दिले आहे तर नूशिन अल खादीर यांनाही प्रशिक्षकपदाचा थोडाफार अनुभव आहे.

Related Stories

फेलिक्स ऍलिसिमेचे तिसरे जेतेपद

Patil_p

सुपरनोव्हाजची अंतिम फेरीत धडक

Patil_p

क्रिकेटर हरभजन सिंह – गीता बसराच्या घरी पाहुण्याचे आगमन

Tousif Mujawar

भारत-ऑस्ट्रेलिया महिला संघात 15 वर्षांनंतर पहिलीच कसोटी

Patil_p

न्यूझीलंड इलेव्हन संघात रॉस टेलरचा समावेश

Patil_p

ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान कसोटी अनिर्णीत

Patil_p