Tarun Bharat

महिलेचा खून करून दागिने लंपास

हुक्केरी तालुक्यातील होसूर येथील घटना : परिसरात भीतीचे वातावरण

वार्ताहर /यमकनमर्डी

घरात एकटीच महिला असल्याची खात्री करून चोरटय़ांनी घरात शिरून महिलेचा खून करत तिच्या अंगावरील सर्व दागिने लंपास केले. ही घटना होसूर (ता. हुक्केरी) येथे घडली असून बुधवार दि. 15 रोजी उशिरा उघडकीस आली आहे. मालुताई भीमरायी अक्कतंगेरहाळ असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, निवृत्त पीएसआय भीमरायी अक्कतंगेरहाळ यांच्या दोन पत्नी असून ते पहिल्या पत्नीसमवेत बेळगाव येथे वास्तव्यास आहेत. तर त्यांची दुसरी पत्नी मालुताई या आपल्या दोन मुलींसह होसूर येथे रहात होत्या. परंतु, दोन्ही मुली अभियंता असल्याने दोघीही बेंगळूर येथे नामांकित कंपनीत काम करत आहेत. दरम्यान, मालुताई या घरात एकटय़ाच असल्याची खात्री करून चोरटय़ांनी रात्री घरात प्रवेश केला. यानंतर मालुताई यांनी चोरटय़ांशी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरटय़ांनी मालुताई यांचा खून करून अंगावरील दागिने व कपाटातील रोख रक्कम लंपास केली आहे.

बेंगळुरात रहात असलेल्या दीपाने आपल्या आईशी 13 जून रोजी फोनद्वारे संपर्क साधला होता. परंतु, त्यानंतर मालुताई यांनी दीपाचा फोन उचलला नाही. त्यामुळे भयभीत झालेल्या दीपाने नातेवाईकांना फोन करून घराकडे जाऊन पाहणी करण्यास सांगितले. यानंतर नातेवाईकांनी दीपाच्या घरी जाऊन पाहिले असता मालुताई या मृतावस्थेत आढळून आल्या. यानंतर सदर घटना उघडकीस आली. त्यानंतर यमकनमर्डी पोलिसांना यांची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तसेच श्वानपथक आणि ठसेतज्ञांना पाचारण करून तपासणी करण्यात आली.

गोकाकचे डीएसपी रमेशकुमार नाईक, यमकनमर्डीचे सीपीआय रमेशकुमार छायागोळ, पीएसआय बी. व्ही. न्यामगौडर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच तात्काळ चोरटय़ांना जेरबंद केले जाईल, असे आश्वासन दिले आहे. गावामध्ये बहुतेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने चोरटे यामध्ये कैद झाल्याची शक्यता वर्तवून त्या दिशेने शोध घेण्यात येत आहे. या घटनेची नोंद यमकनमर्डी पोलीस स्थानकात झाली. लहान-लहान चोरी होत असलेल्या गावामध्ये महिलेचा खून करून दागिने लंपास केल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Stories

मराठा समाजाच्या उद्धारासाठी एकत्र या!

Patil_p

खासदार मंगला अंगडी यांचा बार असोसिएशनतर्फे सत्कार

Amit Kulkarni

तीन खात्यांच्या विलिनीकरणाची प्रक्रिया सुरू

Patil_p

नवीन सेवांसह डिजिटलकडे पोस्टाची वाटचाल

Amit Kulkarni

आबांच्या स्मृतीस्थळाला म. ए. युवा समितीची भेट

Amit Kulkarni

कळसा-भांडुराला केंद्राची अनुमती

Omkar B