Tarun Bharat

मांगोरहिलचा कंटेनमेंट झोन आजपासून अनलॉकच्या दिशेने

निर्बंधात येणार शिथिलता, 20 रोजी होणार कंटेनमेंट मुक्त, 70 दिवसांनंतर प्रशासनाचा निर्णय

प्रतिनिधी / वास्को

मांगोरहिल अनलॉकच्या दिशेने सरकारची पावले पडू लागली आहेत. 69 दिवसांनंतर येथील कंटेनमेंट झोनविषयी फेरविचार सुरू झालेला असून आज सोमवारपासून या कंटेनमेंट झोनमध्ये निर्बंध काही प्रमाणात शिथील करण्यात येणार आहेत. वास्कोत रविवारी स्थानिक आमदार कार्लुस आल्मेदा यांच्या उपस्थितीत दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी अजित रॉय व अन्य शासकीय अधिकाऱयांसमवेत झालेल्या बैठकीत मांगोरहिलच्या कंटेनमेंट झोनसंबंधी नवीन निर्णय घेण्यात आले आहेत.

   वास्कोतील मांगोरहिलमध्ये गोव्यातील पहिला कंटेनमेंट झोन 1 जून या दिवशी उदयास आला होता. त्यानंतर बायणा, हेडलॅण्ड सडा, खारवीवाडा, झुआरीनगर अशा ठिकाणी कंटेनमेंट झोन निर्माण करण्यात आले होते. बायणा आाणि हेडलॅण्ड सडा कंटेनमेंट झोनमधून मुक्त झालेले आहेत. या कंटेनमेंट झोनपैकी मांगोरहिलचा कंटेनमेंट कोरोनाच्या प्रकरणात आतापर्यंत बराच गाजला. या भागात आठ ते दहा हजार लोकसंख्या आहे. जवळपास साडे सातशे कुटुंबे आहेत. हरीत क्षेत्र म्हणून जाहीर झालेल्या गोव्यात या वस्तीत सर्व प्रथम एकाच कुटुंबातील पती पत्नी व त्यांची मुले सुना यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने गोव्यात खळबळ माजली होती. कोरोना बाधीत आढळून येताच ही वस्ती कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आली होती. या घटनेला आज सोमवारी 70 दिवस पूर्ण होत आहेत. मात्र समाधानाची गोष्ट म्हणजे आजपासून या कंटेनमेंट झोनमधील निर्बंध शिथिल होणार आहेत. तर येत्या दि. 20 पर्यंत ही वस्ती कंटेनमेंट झोनमधून पूर्ण मुक्त होणार असून असा निर्णय रविवारी शासकीय बैठकीत झाला आहे.

कंटेनमेंट झोनमधून मुक्त करण्याची वारंवार केली होती मागणी

  प्रारंभी या कंटेनमेंट झोनला पूर्ण सहकार्य केलेल्या या वस्तीतील लोकांना अवघ्याच काही दिवसांत मानवी हालचालींवरील निर्बंधांची झळ बसू लागल्याने त्यांनी या वस्तीतील रस्त्यावर उतरून प्रशासनाविरूध्द आवाज उठवला होता. या लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, आरोग्याचे प्रश्न, रोजगाराचे प्रश्न, आर्थिक प्रश्न आणि इतर अनेक प्रश्न भेडसावू लागल्याने त्यानंतरही सतत येथील लोकांनी रस्त्यावर येऊन प्रशासनाविरूध्द आवाज उठवला. आम्हाला कंटेनमेंट झोनमधून मुक्त करा अशी मागणी या वस्तीतील लोक वारंवार करीत होते. मात्र, आवश्यक वस्तूंचा थोडाफार पुरवठा करीत प्रशासन येथील लोकांची समजूत घालीत आलेले आहे. आमचे प्रश्न सोडवा, आम्हाला कंटेनमेंट झोनमधून मुक्त करा अशी मागणी वारंवार करून येथील लोकही आता थकलेले आहेत. प्रशासन ऐकत नसल्याने हल्लीच स्थानिक नगरसेवक सैफुल्ला खान यांनी कंटेनमेंट झोनमधून मुक्त करण्याच्या मागणीसाठी उपोषणाचे हत्यारही उगारलेले आहे. मात्र, त्यांचा प्रयत्नही सफल होऊ शकला नाही.

कंटेनमेंट झोनमध्ये कोंडण्याचा प्रकार अमानवी असल्याची लोकांची भावना

 वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा यांनी तातडीची उपाययोजना म्हणून मांगोरहिलच्या कंटेनमेंट झोनचे समर्थनच केले होते. मात्र, प्रशासनाला या कंटेनमेन्ट झोनमधील लोकांना सेवा पुरवणे जड होऊ लागल्याने आमदारही समस्येत अडकले होते. मुख्यमंत्री आणि प्रशासकीय अधिकाऱयांकडे त्यांनी लोकांच्या समस्यांच्याबाबतीत बराच पाठपुरावा करावा लागला. मात्र, या प्रयत्नांना तात्पुरतेच यश येत होते. पुन्हा पुन्हा लोकांच्या रोषाला आमदारांनाही सामोरे जावे लागले. त्यामुळेच मांगोरहिलच्या कंटेनमेंट झोनच्याबाबतीत फेरविचार करण्यात यावा अशी मागणी त्यांनी लावून धरल्याने साधारण दीड महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी मुरगाव तालुक्यातील आमदार व मंत्र्यांसमवेत बैठक घेऊन मांगोरहिलवासियांना आणखी पंधरा दिवस वाट पाहण्याची विनंती केली होती. परंतु मांगोरहिलमधील कंटेनमेंट झोन होता तसाच राहिला आणि या झोनमधील लोकांच्या समस्याही तेवढय़ाच उग्र बनत राहिल्या. आजघडीस मांगोरहिलच्या या कंटेनमेंट झोनमध्ये प्रशासन आणि सरकारविरूध्द तीव्र असंतोष आहे. गेले सत्तर दिवस हे लोक कंटेनमेंट झोनमध्ये कोंडले गेलेले आहेत. हा अमानवी प्रकार असल्याची भावना या लोकांची झालेली आहे.

मांगोरहिलच्या लोकांवर प्रशासनाकडून अन्याय, आमदार कार्लुस आल्मेदा यांचा जिल्हाधिकाऱयांच्या कार्यपध्दतीवर रोष

   वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा यांना मांगोरहिलच्या कंटेनमेंट झोनमधील लोकांवर मागचे जवळपास अडिच महिने झालेला अन्याय मान्य आहे. त्यांनी लोकांची बाजू घेतलेली आहे. ते म्हणतात की, कंटेनमेंट झोनमध्ये निर्बंध लादल्यानंतर ज्या गतीने शासकीय प्रक्रीया उरकायला हवी होती, ती अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. कोविड चाचण्या, आरोग्याच्या इतर समस्या, जीवनावश्यक वस्तू आणि त्यांचे इतर प्रश्नही प्रशासन योग्य पध्दतीने हाताळू शकलेले नाही. त्यामुळेच लोक कंटेनमेंट झोनविरोधात रस्त्यावर उतरायला लागले. दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱयांवर आमदार कार्लुस आल्मेदा यांनी प्रथमपासूनच रोष व्यक्त केलेला आहे. कंटेनमेंट झोनचा नकाशाच चुकीचा बनवण्यात आलेला होता. काही प्रभाग आणि वस्तीला नाहक कंटेनमेंटमध्ये घुसडण्यात आले होते. या अधिकाऱयांना या परीसराबाबत ज्ञान नव्हते आणि त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींनाही विश्वासात घेतले नव्हते. त्यामुळेच अर्धा अधिक गोळ झालेला आहे. दक्षिण गोवा जिल्हाधिकारी अजित रॉय यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना सतत चुकीचे सल्ले दिलेले आहेत. त्यामुळेच हा कंटेनमेंट झोन गेले 70 दिवस रखडत राहिलेला आहे असा आरोप आमदार आल्मेदा यांनी केला आहे. या वस्तीत बहुतेक घरे म्हणजे एकच खोली. त्या खोलीत किती दिवस कोंडून ठेवावे हा गंभीर प्रश्न होता. या वस्तीतील लोकांच्या आरोग्याच्या प्रश्नाबाबत दयामाया दाखवण्यात आली नाही. विद्यार्थ्यांचा शिक्षण संस्थांत प्रवेश घेण्याचा प्रश्न होता. त्यांना जाता येत नव्हते. तीथेही जिल्हाधिकाऱयांनी योग्य विचार केला नाही असे स्पष्ट करून मांगोरहिलच्या त्या कुटुंबांच्या जागी या अधिकाऱयांची कुटुंबे असती तर हेच निर्बंध लावले गेले असते काय असा प्रश्न आमदारांनी केला. परप्रांतीय व गरीब लोकांची वस्ती आहे म्हणून प्रशासन त्यांच्याविरूध्द ऐवढे कडक वागत नसावे ना असा संशय व्यक्त करून माणूसकीच्या नजरेतून हा प्रकार आपल्याला योग्य वाटत नाही. त्यामुळेच आपल्याला या वस्तीला कंटेनमेंटमधून मुक्त करण्यासाठी दबाव आणावा लागत असल्याचे आमदार आल्मेदा यांनी स्पष्ट केले.

शेवटी आमदारांच्या दबावाची घेतली दखल

   आमदार आल्मेदा यांनी शनिवारी पुन्हा एकदा मांगोरहिच्या कंटेनमेंट झोनच्या प्रश्नाचा सरकारकडे पाठपुरावा केला होता. तेव्हा त्यांनी अशाच पध्दतीने रोष व्यक्त केला होता. त्याचाच परीणाम म्हणून या कंटेनमेंट झोनविषयी निर्णय घेण्यासाठी बैठक घेण्याचे शनिवारी रात्री प्रशासकीय पातळीवर निश्चित झाले. व ही बैठक मुरगावच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी दुपारपर्यंत पार पडली. या बैठकीला आमदार कार्लुस आल्मेदा यांच्यासह दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी अजित रॉय, मुरगावचे उपजिल्हाधिकारी सचिन देसाई, पोलीस उपअधीक्षक राजू राऊत देसाई व इतर अधिकारी उपस्थित होते.

कंटेनमेंट झोनमध्ये आजपासून येणार शिथिलता

  या बैठकीत मांगोरहिलच्या कंटेनमेंट झोनबाबत फेरविचार सुरू झाल्याचे दिसून आले. हा कंटेनमेंट झोन अनलॉक करण्याची प्रक्रिया आजपासूनच सुरू होणार आहे. येत्या 20 ऑगष्टपर्यंत हा कंटेनमेंट झोन मुक्त करण्यात येईल. पहिल्या टप्प्यात आज सोमवारपासून या वस्तीतील लोकांना ज्यांना नोकरीवर जायचे आहे, त्यांना नावे नोंदवून बाहेर जाता येईल व नाव नोंद करून पुन्हा वस्तीत यावे लागेल. त्यामुळे या कंटेनमेंट झोनमध्ये आजपासून थोडी शिथिलता येणार आहे. त्याच बरोबर येत्या काही दिवसात या वस्तीतील आवश्यकता असललेल्या घरांसाठी तीन मायक्रो कंटेनमेंट झोन तयार करण्यात येतील. त्यामुळे इतरांवर निर्बंध राहणार नाहीत. अशा पध्दतीने येत्या दि. 20 पर्यंत कंटेनमेंन्ट झोन उठवण्याचो या बैठकीत ठरले आहे. विशेष म्हणजे या वस्तीत मागच्या चौदा दिवसांपासून एकही कोरोना बाधीत आढळून आलेला नाही. सध्या त्या भागात कोरोना पॉझिटीव्ह कुणी नसल्याने कोरोनासंबंधीत मार्गदर्शकतत्वांनुसार हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

नगरसेवक सैफुल्ला खान यांचे उद्या पुन्हा उपोषण

   दरम्यान, स्थानिक नगरसेवक सैफुला खान यांनी कंटेनमेंट झोनमधून मांगोरहिलवासियांना मुक्त करण्याच्या मागणीसाठी उद्या मंगळवारी पुन्हा उपोषणास बसणार असल्याचे जाहीर केलेले आहे. आपण 3 रोजी केलेल्या उपोषणाच्या प्रयत्नानंतर आमदार दिगंबर कामत यांच्या उपस्थितीत दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱयांनी आपल्याला दि. 8 ऑगष्ट सकाळपर्यंत कंटेनमेंट झोनचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते. जिल्हाधिकाऱयांनी ते आश्वासन पाळलेले नाही. त्यामुळे पुन्हा हा प्रश्न सोडवण्यासाठी पुन्हा उपोषण करण्यावाचून पर्याय नसल्याचे नगरसेवक सैफुल्ला खान यांनी म्हटले आहे.

Related Stories

जॉय काकोडकर तिसवाडी बुद्धिबळ रॅपीड स्पर्धेचा विजेता

Amit Kulkarni

मोपा विमानतळाची सुरु जनसेवा!

Amit Kulkarni

आयएसएलमध्ये आज वास्कोत हैदराबाद-नॉर्थईस्ट महत्वपूर्ण लढत

Patil_p

राज्यातील दुधाची आवक कमी झाल्यामुळे गोवा डेअरीच्या हायफॅट दुधाची टंचाई

Amit Kulkarni

‘आरजी ’जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही

Amit Kulkarni

मडगावात शनिवारपासून ‘सरस’ मेळा

Amit Kulkarni