Tarun Bharat

मांगोरहिल कंटेनमेंट झोनवरील निर्बंध शिथील केल्याने समाधान, लोक बाहेर पडू लागले

Advertisements

प्रतिनिधी / वास्को

मांगोरहिल भागातील कंटेमेंट झोनवरील निर्बंध रविवारी मध्यरात्री दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱयांच्या आदेशानुसार शिथील करण्यात आले. त्यामुळे या वस्तीत सोमवारी नागरिकांमध्ये समाधान दिसून आले. आता कडक निर्बंध या वस्तीतीलच केवळ 17 घरांसाठी असून ही घरे मायक्रो कंटेनमेंट झोनमध्ये येतात. दि. 20 पर्यंत हे निर्बंधही उठवले जाणार आहेत.

सत्तर दिवसांनंतर वास्कोतील मांगोरहिल भागातील कंटेनमेंट झोनवरील कडक निर्बंध सोमवारी सकाळपासून शिथील करण्यात आले. या वस्तीच्या नाक्यांवर अद्यापही पोलिसांचे कडे आहेत. नाकाबंदीही आहे. मात्र, लोकांना कामानिमित्त येण्याजाण्यासाठी मोकळीक देण्यात आलेली आहे. याच वस्तीत तीन वेगवेगळे मायक्रो कंटेनमेंट झोन करण्यात आलेले असून त्यात सतरा घरांचा समावेश आहे. पुढील काही दिवस या कुटुंबांना निर्बंधांचा सामना करावा लागणार आहे. दि. 20 पर्यंत मांगोरहिलमधून कंटेनमेंट झोन पूर्णपणे हटवण्याचा प्रयत्न प्रशासन करीत आहे. त्याची काल सोमवारपासून सुरवात झालेली आहेत. येथील रस्ते वाहतुकीसाठी अद्याप खुले करण्यात आलेली नाहीत. पोलीस बंदोबस्त आहे. तसेच अन्य निर्बंधही आहेत. परंतु निर्बंध शिथील झाल्याने लोकांमध्ये समाधान पसरले आहे. काल सोमवारी या वस्तीतील बरेच लोक बाहेर पडले. त्यांनी समाधानाचा सुस्कारा सोडला. मात्र, काल दिवसभरात मोठय़ा प्रमाणात पाऊस पडल्याने या लोकांवर नैसर्गीक निर्बंध आले. पावसामुळे लोकांनी घराबाहेर पडणे टाळले.

फिटनेस सर्टीफिकेटसाठी आरोग्य तपासणी सुरू

या वस्तीतील लोकांना आता आपल्या रोजीरोटीसाठी बाहेर पडण्यास मोकळीक देण्यात आल्याने ते या वस्तीबाहेर पडतील. परंतु त्यांना आरोग्यसंबंधी कोणत्याही अडचणी कामाच्या किंवा इतर ठिकाणी येऊ नयेत यासाठी आमदार कार्लुस आल्मेदा यांनी मुरगावच्या काही नगरसेवकांच्या मदतीने सोमवारी तेथीलच मांगोर स्पोर्टस् क्लबमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन केले. या ठिकाणी या वस्तीतील नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना फिटनेस सर्टीफीकेट देण्यात आले. आरोग्य खात्यानेच ही तपासणी केली. बाहेर आरोग्यविषय अडचण आल्यास त्या वस्तीतील लोकांना या सर्टीफिकेटची मदत होणार आहे. या आरोग्य शिबिराला लोकांनीही चांगला प्रतिसाद दिला. एक हजारहून अधिक लोकांनी काल दिवसभरात आरोग्य तपासणी करून घेतली.

वास्को भाजपा मंडळाकडून कंटेनमेंटचा प्रश्न मिटवल्याबद्दल आभार

दरम्यान, मांगोरहिलच्या कंटेनमेंट झोनचा प्रश्न मिटवण्यासाठी कष्ट घेतल्याबद्दल वास्को भाजपा गट समितीने आमदार कार्लुस आल्मेदा यांचे आभार मानले आहेत. मुख्यमंत्री, भाजपाचे प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, उपाध्यक्ष दत्ता खोलकर, माजी खासदार नरेंद्र सावईकर यांचेही आभार मानण्यात आले आहेत. मुरगावचे नगराध्यक्ष नंदादीप राऊत, नगरसेवक यांनीही गेल्या सत्तर दिवसांत या कंटेनमेंट झोनच्या समस्या दूर करण्यास योगदान दिल्याबद्दल त्यांचेही आभार भाजपा गट समिती अध्यक्ष दीपक नाईक यांनी मानले आहेत. तसेच गेले सत्तर दिवस अनेक अडचणींचा सामना करीत आणि कष्ट सोसत कंटेनमेंट झोनमध्ये राहून प्रशासनाला आणि सरकारला सहकार्य केल्याबद्दल भाजपाने आभार मानले आहेत.

खारवीवाडा कंटेनमेंट झोन मुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू

दरम्यान, मांगोरहिलच्या कंटेनमेंट झोनचा प्रश्न आता मिटत आल्याने एका बाजुने समाधान पसरलेले असतानाच खारवीवाडा कंटेनमेंटमध्ये लोकांमध्ये असंतोष वाढत आहे. या कंटेनमेंट झोनलाही महिना उलटलेला असून या लोकांच्या अडचणींमध्ये वाढ होऊ लागली आहे. काल सोमवारी संध्याकाळी येथील काही नागरिकांनी आमदार कार्लुस आल्मेदा यांच्या समवेत मुरगावच्या उपजिल्हाधिकाऱयाबरोबर बैठक घेतली. या बैठकीत नागरिकांनी आपल्या विविध समस्या मांडल्या. मासेमारी हंगाम सुरू झालेला असताना या व्यवसायावरच अवलंबून असलेल्यांना मासेमारी व इतर संबंधीत कामासाठी बाहेर पडता येत नाही. आता विशेष कोरोना पॉझिटिव्हही कोणी आढळून येत नाही. शेवटच कोरोना बाधीतही बरा झालेला आहे. काही दिवसांत त्याचे कॉरन्टाईनचे दिवसही संपतील. त्यामुळे कंटेनमेंट झोनमध्ये अजूनही ठेवणे अनावश्यक असल्याचे या लोकांचे म्हणणे आहे. मुरगावच्या उपजिल्हाधिकाऱयांनी आमदार व या लोकांनी मांडलेल्या वस्तुस्थितीची दखल घेऊन आपण यासंबंधीचा अहवाल जिल्हाधिकाऱयांना पाठवू असे आश्वासन दिले. मार्गदर्शकतत्वांनुसार खारवीवाडा भागातील कंटेनमेंट झोन येत्या काही दिवसांत हटवणे शक्य असल्यास जिल्हाधिकारी निर्णय घेतील असे उपजिल्हाधिकाऱयांनी स्पष्ट केले.

वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा यांनी मांगोरहिल प्रमाणेच खारवीवाडा कंटेनमेंट झोनमध्येही आता कोरोनाचा प्रभाव राहिलेला नसल्याचे स्पष्ट करून  उपजिल्हाधिकाऱयांनी यासंबंधी अहवाल पाठवल्यानंतर जिल्हाधिकारी योग्य निर्णय घेतील. येत्या दोन दिवसांत खारवीवाडा भागातील कंटेनमेंट झोनही हटवला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Related Stories

एमईएस महाविद्यालय व माजी विद्यार्थी संघटनेतर्फे चर्चासत्राचे आयोजन

Amit Kulkarni

मडगावातील गैरव्यवहारांवर कारवाई करा अन्यथा पुढील कृती करावी लागेल

Omkar B

अयोध्येतील श्रीराम मंदिर भारतीयांची एकात्मता अधिक सशक्त करणार

Patil_p

मगोच्या कार्यपद्धतीमुळेच बहुसंख्य नगरसेवकांचा पाठिंबा

Patil_p

अटलसेतू मातीच्या भरावाचा जोडभाग खचला

Omkar B

पाच महिन्यात 110 जणांचा अपघाती मृत्यू

Amit Kulkarni
error: Content is protected !!