काँग्रेसने ‘एकला चलो’ धोरण राबविल्यास बहुमत मिळणार असल्याचा दावा
प्रतिनिधी /मडगाव
मागील निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा घात करून भाजपाला सरकार बनवण्यासाठी मदत केलेल्या पक्ष?शी कोणतीही युती नको, असे मत व्यक्त करताना दक्षिण गोवा खासदार फ्रान्सिस्को सार्दिन यांनी काँग्रेस पक्षाने एकला चलो धोरण राबविल्यास मागील वेळेपेक्षा जास्त जागांसह बहुमत मिळेल, असा दावा केला आहे.
पक्षाच्या मडगावातील जिल्हा कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. समविचारी पक्षांशी युती करण्यासंदर्भातील बोलणी कुठवर पोहोचली आहेत अशी पत्रकारांनी विचारणा केली असता त्यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली. आपण सुरुवातीपासून कोणत्याही पक्षाशी युती करण्याची गरज नसल्याचे पक्षश्रेष्ठींना कळविले आहे. मागील वेळी 17 जागांवर काँग्रेस उमेदवार निवडून आले होते. अशावेळी 13 आमदार असलेल्या भाजपाला सत्तेवर येण्यास मदत केलेल्यांकडे युती नकोच असे आपण स्पष्ट केले आहे, असे सार्दिन यांनी सांगितले.
काँग्रेस पक्षात युती नको व पाहिजे असे दोन गट असल्याचे त्यांच्या नजरेस आणून दिले असता, आपण पक्षश्रेष्ठींना जे सांगायचे ते सांगितले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. पुढे पक्ष जो निर्णय घेईल त्याचे पक्षाचा सैनिक म्हणून आम्ही पालन करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
व्हॅट कमी करून इंधन दर घटवा
सध्या इंधनाचे दर सामान्यांचा आवाक्मयाबाहेर गेले आहेत. इंधन दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंचे दर हाताबाहेर गेले आहेत. राज्य सरकारने व्हॅट कमी करून इंधन दर कमी करावेत, अशी मागणी त्यांनी केली. कामावर कायम केले जात नसल्याने शिक्षक रस्त्यावर येत आहेत. अन्य सरकारी विभागांतही 10 वर्षांहून अधिक काळ काम करूनही कायम केले जात नसल्याबद्दल सार्दिन यांनी नाराजी व्यक्त केली. पाच वर्षे काम केल्यानंतर अशा कामगारांना सेवेत कायम करावे यासाठी आपण संसदेत आवाज उठविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भाजपाच्या जनमत चोरण्याच्या कृतीचा किशोर यांनी अभ्यास करावा
तृणमूल काँग्रेस भाजपाला सत्तेवर आणण्यासाठी गोव्यात निवडणूक लढवत असल्याचे आमच्या पक्षाने आधीच नजरेस आणून दिले आहे. त्यामुळे भाजपाला येत्या काही काळात सत्तेपासून दूर करणे शक्मय नसल्याचे विधान प्रशांत किशोर यांनी केले आहे, असे सार्दिन एका प्रश्नावर उत्तरले. गेल्या वेळी भाजपाला 13 जागा, तर काँग्रेसला 17 जागा मिळाल्या होत्या. नंतर भाजपाने जनमत चोरून सरकार स्थापन केले. त्याचा अभ्यास किशोर यांनी करावा, असा सल्ला त्यांनी दिला.