Tarun Bharat

माजी आमदार, साहित्यिक, स्वा.सै. गजानन रायकर यांचे निधन

आज मडगावात होणार अंत्यसंस्कार

प्रतिनिधी / मडगाव

गोवा स्वातंत्र्यानंतर 1961 साली झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत फोंडा तालुक्यातून आमदार झालेले स्वा.सै. गजानन रायकर यांचे काल गुरुवारी दुपारी 2.30 वा. गोमेकॉत अल्पआजाराने निधन झाले. गजानन रायकर हे स्वातंत्र्यसैनानी, लेखक व कवी म्हणूनही ओळखले जायचे. मराठी भाषेचे ते जाज्वल्य अभिमानी होते.  त्यांनी मराठी साहित्य क्षेत्रात मोलाचे योगदान दिले होते. त्यांचे ‘संगम’ हे मासिक बरेच लोकप्रिय ठरले होते. त्यांच्या निधनाबद्दल केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्यासह अनेक मान्यवरांनी दुःख व्यक्त केले आहे.

गजानन रायकर यांच्यावर आज सकाळी 11 वा. मडगाव हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील. त्यांच्या पश्चात मुलगा पराग रायकर, स्नुषा प्रणिता रायकर, दोन विवाहित मुली : पूजन नाईक व संगीता खोलणकर तसेच नातवंडे असा परिवार आहे.

गजानन रायकर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना प्रथम मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळात दाखल करण्यात आले होते. प्रकृती नाजूक बनल्याने त्यांना तातडीने गोमेकॉत हलविण्यात आले. त्या ठिकाणी त्यांना मेंदूत रक्तस्त्राव (ब्रेन हॅमरेज) झाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. वयोमान झाल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणे शक्य झाले नाही, अशी माहिती त्यांचा मुलगा पराग रायकर यांनी दिली.

27 मे 1935 साली जन्म झालेल्या गजानन रायकर यांनी ऐन तारुण्यात गोव्याच्या स्वातंत्र्यलढय़ात भाग घेतला. 1954 साली त्यांना अटक झाली व तुरूंगवास भोगावा लागला. गोवा स्वातंत्र्यानंतर 1961 साली झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत फोंडा तालुक्यातून त्यांनी प्रजा समाजवादी पक्षाच्या उमेदवारीवर निवडणूक लढविली व ते विजयी झाले. फोंडय़ाचे आमदार म्हणून त्या काळात उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. हिंदी साहित्य यात्रेचे ते सदस्य होते. केंद्र सरकारने ‘ताम्रपत्र’ देऊन त्यांचा गौरव केला होता.

‘संगम’ मासिकाचे संपादक

संगम हे मासिक त्यांनी गेली कित्येक वर्षे प्रकाशित केले. या मासिकांतून त्यांनी नवोदित लेखकांना संधी दिली होती. त्यांच्या असंख्य कविता व लेख या मासिकांतून प्रकाशित व्हायचे. दरवर्षी संगम मासिकाच्यावतीने विविध क्षेत्रात योगदान देणाऱया मान्यवरांचा ते गौरव करीत होते. मात्र, गेल्या काही वर्षापासून आरोग्य साथ देत नसल्याने त्यांनी हे मासिक बंद केले होते. त्यांची ‘इंद्रफुले’ व अन्य साहित्य प्रकाशित झालेले आहे.

एक थोर स्वातंत्र्यसेनानी हरपला : केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक

थोर स्वातंत्र्यसैनिक, लेखक, फोंडय़ाचे पहिले आमदार श्री. गजानन रायकर यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखदायी व क्लेशकारक आहे. गोवा मुक्ती संग्रामातील त्यांचे योगदान अनन्यसाधारण असेच होते. गोवा मुक्ती चळवळीच्या काळात त्यांनी लिहिलेल्या कविता स्फूर्तीचा वणवा पेटवणाऱया होत्या. त्यांच्या जाण्याने एक थोर स्वातंत्र्य सेनानी हरपला.   ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो व हे दुःख पचवण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना देवो ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो, असे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी म्हटले आहे.

प्रख्यात लेखकाला गमावलो : मुख्यमंत्री

गजानन रायकर हे गोव्याचे प्रख्यात स्वातंत्र्यसैनिक होते. तसेच लेखक आणि फोंडय़ाचे माजी आमदार होते. त्यांच्या निधनामुळे आपण दुःखी झाल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे. या दुःखाच्या समयी आपल्या  प्रार्थना त्यांच्या कुटुंबासोबत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

गोवा मुक्ती लढा, साहित्यातील योगदान प्रेरणादायक : कामत

गोमंतभूमीचे सुपुत्र, स्वातंत्र्यसेनानी, गोवा विधानसभेचे माजी आमदार, लेखक, कवी आदरणीय गजानन रायकर यांच्या निधनावर विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी दुःख व्यक्त केले असून त्यांचे गोवा मुक्ती लढा तसेच साहित्य क्षेत्रातील योगदान येणाऱया पिढींना स्फूर्ती व प्रेरणा देत राहील, असे म्हटले आहे.

Related Stories

म्हापसा पालिकेचे कर्मचारी सतावत असल्याचा व्यापाऱयांचा आरोप

Omkar B

राज्यात ‘जनता कर्फ्यु’त 25 पर्यंत वाढ

tarunbharat

बोरिगोट्टोवासियांना सतावणाऱया पाण्याच्या प्रश्नापासून मुक्ती

Amit Kulkarni

ममता बॅनर्जी 28 रोजी गोव्यात

Amit Kulkarni

चोडण येथील कावा खाजनची लवकरात लवकर दुरूस्ती करावी

Omkar B

आडपई येथील सायकलींग मॅराथॉनला उत्स्फुर्त प्रतिसाद

Amit Kulkarni