Tarun Bharat

माजी टेबलटेनिसपटू व्ही. चंद्रशेखर यांचे कोरोनाने निधन

चेन्नई / वृत्तसंस्था

अर्जुन पुरस्कारप्राप्त माजी भारतीय टेबलटेनिसपटू व्ही. चंद्रशेखर यांचे बुधवारी कोरोनामुळे निधन झाले असल्याचे माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली. व्ही. चंद्रशेखर 64 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगा असा परिवार आहे. चंद्रा या नावाने ते सुपरिचित होते.

व्ही. चंद्रशेखर तीनवेळा राष्ट्रीय चॅम्पियन ठरले. शिवाय, तमिझगा टेटे असोसिएशनचे अध्यक्ष व शहरातील एसडीएटी-मेडिमिक्स टीटी अकादमीचे संचालकपदही त्यांनी भूषवले. 1982 मध्ये त्यांनी राष्ट्रकुल स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. शिवाय, प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी लक्षवेधी यश प्राप्त केले.

तब्येतीत 70 ते 80 टक्के सुधारणा झाल्यानंतर त्यांनी आश्वासक खेळाडूंना प्रशिक्षण देण्याकडे लक्ष केंद्रित केले. चंद्रा हे स्वतः निष्णात खेळाडू होते व प्रतिस्पर्ध्याची एकाग्रता भंग करण्यासाठी ते निर्णायक क्षणी धोका स्वीकारत असत.

विद्यमान भारतीय पॅडलर्स सी. साथियान व माजी राष्ट्रीय चॅम्पियन एस. रमण यांना चंद्रांनी काही काळ प्रशिक्षण दिले आहे. आघाडीचा टेटेपटू शरथ कमलने त्यांना श्रद्धांजली वाहताना 37 वर्षापूर्वीच्या आठवणीला उजाळा दिला. ‘37 वर्षांपूर्वी मृत्यूशी लढलेल्या चॅम्पियनच्या संघर्षाला पूर्णविराम मिळाला. टेबलटेनिसने आज महान मार्गदर्शक, प्रशिक्षक व उत्तम खेळाडू गमावला आहे. 1980 च्या दशकात त्यांनी या खेळाला लोकप्रियता मिळवून दिली’, असे ट्वीट शरथने केले.

साथियानने चंद्रा यांच्यासमवेत 1998 ते 2012 या 14 वर्षांच्या कालावधीत आपण खेळलो होतो, हे नमूद केले. ‘चंद्रा यांनी मला माझ्या शैलीत खेळू दिले. त्यांनी नेहमीच मदतीचा हात पुढे केला. माझ्या खेळावर त्यांचा बराच प्रभाव राहिला. त्यांच्या निधनामुळे माझी नव्हे तर माझ्या कुटुंबाची देखील मोठी हानी झाली आहे’, असे तो म्हणाला.

हॉस्पिटलविरुद्ध कायदेशीर लढाही जिंकला

1984 मध्ये गुडघ्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान गुंतागुंत निर्माण झाल्यानंतर त्यांना अनेक त्रास सोसावे लागले. दृष्टी कमी झाली, फिरणे बंद झाले. बोलता येत नव्हते. पण, यातून सावरत त्यांनी प्रशिक्षक म्हणून योगदान दिले. चुकीची शस्त्रक्रिया करणाऱया हॉस्पिटलविरुद्ध त्यांनी कायदेशीर लढाही जिंकला.

Related Stories

सेतु एफसीच्या विजयात संध्याची चमक

Patil_p

सुलतान जोहोर चषक स्पर्धेत भारत विजेता

Patil_p

माजी हॉकीपटू एस. व्ही. सुनील निवृत्त

Patil_p

महिला हॉकी – अर्जेंटिना उपांत्यफेरीत

Patil_p

बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे ‘आयपीएल’ला मुकणार

Patil_p

मिराबाई चानूला उत्तर प्रदेश सरकारतर्फे 1.5 कोटी प्रदान

Patil_p