Tarun Bharat

माजी मंत्री विनय कुलकर्णी यांना अटक

Advertisements

योगीश गौडा हत्याप्रकरणी सीबीआयची कारवाई : एक दिवसाची न्यायालयीन

वार्ताहर/ हुबळी

धारवाड जिल्हा पंचायतीचे सदस्य आणि स्थानिक भाजप नेते योगीश गौडा यांच्या हत्येप्रकरणी सीबीआय अधिकाऱयांनी माजी मंत्री आणि काँगेस नेते विनय कुलकर्णी यांना अटक केली आहे. त्यांना धारवाडच्या द्वितीय अतिरिक्त मुख्य आणि सत्र न्यायालयात हजर केले असता 1 दिवसाची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. त्यांची रवानगी बेळगावच्या हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. सीबीआयची ही कारवाई केंद्र आणि राज्य सरकारचे कारस्थान असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला आहे.

योगीश गौडा हत्या प्रकरणाचा सीबीआयकडून तपास सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणात आरोप असल्याने गुरुवारी सकाळी 6.30 वाजता सीबीआय अधिकाऱयांच्या पथकाने धारवाडच्या कल्याणनगर येथील निवासस्थानावर छापा टाकून विनय कुलकर्णी यांना ताब्यात घेतले. नंतर त्यांना धारवाड उपनगर पोलीस स्थानकात नेऊन त्यांची सलग 9 तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना सायंकाळी न्यायालयात हजर करण्यात आले. शुक्रवारी त्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सुनावणी होणार आहे. विनय कुलकर्णींचे बंधू विजय आणि निकटवर्तीय पाटील यांना देखील ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर त्यांना सोडण्यात आले.

15 जून 2016 रोजी धारवाडच्या सप्तापूर येथील स्वतःच्या मालकीच्या उदय जीममधून बाहेर आलेल्या योगीश गौडा यांच्या डोळय़ात मिरचीपूड टाकून मारेकऱयांनी त्यांच्यावर शस्त्रास्त्रांनी हल्ला केला होता. त्यानंतर हल्लेखोर दुचाकीवरून पसार झाले होते. या घटनेमुळे धारवाड जिल्हय़ात खळबळ उडाली होती. या प्रकरणी तपास करून धारवाड पोलिसांनी एफआयआर दाखल केला होता. चौकशीनंतर पोलिसांनी  माजी मंत्री विनय कुलकर्णी यांना क्लिन चीट दिली होती. त्यानंतर या प्रकरणी निःपक्षपातीपक्षे चौकशी व्हावी यासाठी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात यावे, अशी मागणी भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी केली होती. 2018 च्या विधानसभा निवडणुकीवेळी आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजप आणि काँग्रेसमध्ये योगीश गौडा हत्या प्रकरणावरून आरोप -प्रत्यारोप होत होते.

दरम्यान, सप्टेंबर 2019 मध्ये मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने हे प्रकरणी सीबीआयकडे सोपविले होते. योगीश गौडा यांच्या हत्येनंतर या प्रकरणातील हल्लेखोरांना त्वरित अटक करावी अशी मागणी करून धारवाडमध्ये तीव्र आंदोलन छेडण्यात आले होते. या आंदोलनाचे नेतृत्व सुरुवातीला योगीश गौडा यांची पत्नी मल्लम्मा गौडा यांनी करून भाजपला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा झाली होती. दरम्यान, सीबीआयने मल्लम्मा गौडा यांचीही चौकशी केली होती. सीबीआयने तपास करून मे 2020 मध्ये धारवाड न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सीबीआयने या प्रकरणात आतापर्यंत 6 जणांना अटक केली आहे.

काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

गुरुवारी सकाळी विनय कुलकर्णी यांना सीबीआयने ताब्यात घेतल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी केली. तसेच उपनगर पोलीस स्थानकासमोर निदर्शने केली. विनय कुलकर्णी निर्दोष असून त्यांची सुटका करावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली.

आरोप असल्याने कारवाई : येडियुराप्पा

माजी मंत्री विनय कुलकर्णी यांना सीबीआयने अटक केल्याबाबत मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी प्रतिक्रिया देताना, विनय कुलकर्णींवर आरोप आहे. पुरावे आढळून आल्याने सीबीआयने त्यांना ताब्यात घेतले असावे. योगीश गौडा यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, अशी सर्वांची अपेक्षा आहे, असे सांगितले.

Related Stories

डॉ. के. त्यागराजन बेळगावचे नवे पोलीस आयुक्त

Patil_p

शहरात उद्या वीजपुरवठा खंडित

Amit Kulkarni

यल्लम्मा देवस्थान परिसराची स्वच्छता करा

Amit Kulkarni

प्रज्वल, श्रीरंग, मंदास, सक्षम, पार्थ विजेते

Amit Kulkarni

वाळकीत धनाजी पाटील यांचा सत्कार

Patil_p

जागा विनियोगाच्या प्रस्तावावर कॅन्टोन्मेंट बैठकीत चर्चा

Amit Kulkarni
error: Content is protected !!