Tarun Bharat

माझा-दोआबामध्ये ‘आप’ची एंट्री, काँग्रेस अडचणीत

Advertisements

पंजाबमध्ये 2017 च्या तुलनेत अकाली मजबूत : भाजप मतांची टक्केवारी वाढविण्याच्या प्रयत्नात

पंजाबमध्ये 5 वर्षांपासून सत्तेत राहिलेला काँग्रेस पक्ष आता अत्यंत आव्हानात्मक लढतीत अडकून पडला आहे. शिरोमणी अकाली दल स्वतःच्या कॅडरच्या बळावर कामगिरी सुधारण्याच्या प्रयत्नात आहे. तर भाजप नव्या सहकाऱयांसोबत जागा आणि मत हिस्सेदारी वाढविण्याच्या हालचाली करत आहे. या सर्वांदरम्यान 5 वर्षांपूर्वी मालवा भागात चांगली कामगिरी करणारा आम आदमी पक्ष माझा आणि दोआबामध्ये एंट्री घेताना दिसून येत आहे.

अकाली दलापासून वेगळे झाल्यावर भाजप आता नव्या प्रादेशिक पक्षांसोबत मिळून लढत चौकोनी करू पाहत आहे. तर 3-4 जागांवर शेतकरी संघटनांचा संयुक्त मोर्चा या संघर्षाला पाच-कोनीय करताना दिसून येत आहे. राज्यात अशाप्रकारे मतविभागणी कधीच झाली नव्हती. याचमुळे या निवडणुकीत नेमका कोण आघाडीवर आहे हे सांगणे अवघड असल्याचे मानले जाते.

मालवामध्ये आप मजबूत

नवी दिल्ली-अमृतसर राष्ट्रीय महामार्गावर शंभू बॉर्डर आणि राजस्थान सीमेपासून अबोहर ते लुधियानापर्यंत सतलुज नदीच्या पलिकडील भागाला मालवा म्हटले जाते. पंजाब विधानसभेच्या 117 पैकी 69 जागांसह हाच भाग ‘राज्याच्या सत्तेची चावी’ आहे. या भागात आम आदमी पक्ष स्वतःला मजबूत करताना दिसून येत आहे. पंजाबच्या या भागात मतदार 70 वर्षांपासून आलटून-पालटून सत्तेत राहणाऱया काँग्रेस-अकाली दलाच्या जागी तिसऱया पर्यायाची निवड करू पाहत असल्याची चर्चा असून हा पर्याय आम आदमी पक्ष ठरू शकतो. मालवाच्या 69 पैकी 30 जागांवर चौकोनी लढत आहे. तर 39 जागांवर आम आदमी पक्ष, काँग्रेस आणि अकाली दलात टक्कर आहे. पंजाबच्या शेतकरी संघटनांचा संयुक्त मोर्चा येथे 30 जागांवर काहीसा प्रभाव पाडू शकतो. परंतु येथे जागा जिंकणे त्याला अवघड असल्याचे मानण्यात येते. या भागात काँग्रेस आणि अकाली दलाच्या  लढाईत आप स्वतःला सेफ झोनमध्ये मानला होता. परंतु याच भागात संयुक्त समाज मोर्चा मतांमध्ये विभागणी करण्याची शक्यता आहे. मालवा हा शेतीबहुल ग्रामीण भाग असल्याने येथे भाजपची स्थिती कमकुवत दिसून येते. 2017 मध्ये अकाली दलासोबत आघाडी असूनही भाजपला येथे केवळ एक अबोहर मतदारसंघ जिंकता आला होता. यंदाही पक्षाला येथे जागा जिंकण्यासाठी जोरदार मेहनत करावी लागणार आहे.

माझा : काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळतोय

माझामध्ये 2017 च्या निवडणुकीत काँग्रेसने 25 पैकी 22 जागा जिंकल्या होत्या. परंतु यंदा त्याचा हा बालेकिल्ला ढासळत असल्याचे चित्र आहे. तरनतारन जिल्हय़ातील 4 मतदारसंघ वगळता अमृतसर, पठाणकोट आणि गुरदासपूर जिल्हय़ाच्या 21 जागांपैकी 5-6 ठिकाणी भाजप कमाल करू शकतो. मागील वेळी अकाली दलाला येथे 2 जागा (मजीठा आणि बटाला) मिळाल्या होत्या. यंदा या भागातून पक्षाच्या आमदारांची संख्या वाढू शकते. उर्वरित पंजाबप्रमाणेच माझाचे मतदार सत्ताबदल घडवून आणण्याचा विचार करत असल्याचे मानण्यात येत आहे. हीच स्थिती कायम राहिल्यास आम आदमी पक्ष सर्वात चकीत करणारा घटक ठरणार आहे. शेतकरी संघटनांच्या संयुक्त समाज मोर्चाचा येथे प्रभाव नाही.

सिद्धू-मजीठिया आमने-सामने

माझाच्या अमृतसर जिल्हय़ातील अमृतसर पूर्व मतदारसंघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू आणि अकाली दलाचे विक्रम सिंह मजीठिया आमने-सामने आहेत. आजवर कुठलीच निवडणूक न हरलेल्या दोन्ही नेत्यांदरम्यान यावेळी ही निवडणूक प्रतिष्ठेचा विषय ठरली आहे. या मतदारसंघात भाजप उमेदवार माजी आयएएस अधिकारी डॉ. जगमोहन सिंह राजू आणि आपच्या जीवनज्योत कौर मुख्य लढतीतून बाजूला पडल्याचे चित्र आहे. मजीठामधून पहिल्यांदाच मजीठिया यांच्या पत्नी  गुनीव कौर मैदानात उतरल्या आहेत.

दोआबा : एनआरआय बेल्टमध्ये भाजप चमकणार

दोआबा हा पंजाबचा एनआरआय बेल्ट असून विदेशात राहणाऱयांचा प्रभाव येथे दिसून येतो. यंदा आम आदमी पक्ष एनआरआयकडून निधी जमविण्याचा कार्यक्रम करत नाही, परंतु विदेशात राहणाऱया पंजाबींच्या मनात अद्याप त्याच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे. विदेशात राहणारी मुले स्वतःच्या कुटुंबीयांना यंदा आपला संधी देण्यास सांगत आहेत. 2017 मध्ये दोआबाच्या 23 जागांपैकी 15 जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. भाजपला येथे केवळ एक जागा मिळाली, तर अकाली दलाने 5 जागांवर यश मिळविले हेते. यंदा भाजपच्या जागा वाढणार असल्याचे मानले जात आहे. जालंधर शहरातील विविध मतदारसंघांमधून मनोरंजन कालिया, केडी भंडारी आणि मोहिंदर भगत तसेच फगवाडामधून विजय सांपला लढतीत उतरले असून याचा फटका काँग्रेसला बसणार आहे.

शेतकऱयांचा प्रभाव नाही

अकाली दलाला 2017 प्रमाणेच दोआबामध्ये 5-6 जागा मिळण्याची शक्यता आहे. नवांशहरमध्ये काँग्रेसने विद्यमान आमदार अंगद सिंह यांना उमेदवारी नाकारल्याने पक्षाला नुकसान होण्याची चिन्हे आहेत. येथे अंगद सिंह मुख्य आव्हान ठरले आहेत. शेतकरी आंदोलनाचा गढशंकर आणि चब्बेवाल यासारख्या दोन-तीन मतदारसंघांवर प्रभाव आहे. परंतु जागा जिंकणे त्यांच्यासाठी दुरापास्त ठरणार आहे. उमेदवाराची प्रतिमा, काम करण्याची पद्धत आणि स्थानिक मुद्दे समीकरणांना अधिक रंगतदार करत आहेत.

कॅप्टन यांचे आव्हान

पंजाबच्या या निवडणुकीत काँग्रेस एकप्रकारे स्थित्यंतराला सामोरा जात आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू आणि मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी हे पक्षाला कॅप्टन यांच्या प्रभावातून बाहेर काढण्याच्या प्रयत्नात आहेत. तर 80 वर्षीय कॅप्टन अमरिंदर सिंह नवा पक्ष स्थापन करून तो मजबूत करण्यासाठी झटत आहेत. कॅप्टन यांचा पक्ष या निवडणुकीत काँग्रेसच्या मतांना विभागण्याचे काम करू शकतो.

Related Stories

तबलिगी जमातीचे प्रमुख मौलाना साद यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल

prashant_c

मतदान यंत्रे तृणमूल नेत्याच्या घरात

Patil_p

तीन दिवसांनी पुन्हा पेट्रोल-डिझेल वधारले

Amit Kulkarni

केंद्र सरकारने ७४ कोटी लसीच्या डोसची मागणी नोंदवली

Abhijeet Shinde

‘ई-रुपी’ डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मचे आज अनावरण

Patil_p

सीएएकडून मुस्लिमांना कोणताही धोका नाही : रजनीकांत

prashant_c
error: Content is protected !!