कुर्डुवाडी / प्रतिनिधी
लग्नाची संपूर्ण तयारी झाली. वधू-वर पक्षाकडील पाहुणेही मांडवात येऊन बसले. थोड्याच वेळात लग्न लागणार तोच पोलिस आणि ग्रामविकास अधिकारी विजय माढेकर लग्नस्थळी पोहोचले. मुलगी अल्पवयीन असल्याची घोषणा करीत लग्न थांबविण्यात आले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. कुर्डू ता.माढा येथे रविवारी ही घटना घडली.
आज सकाळी १२.३० वाजता लग्न होणार होते. त्यातील वधू मुलीचे वय हे खूप लहान असल्याची गोपीनिय माहिती सोलापूर येथील बाल संरक्षण अधिकारी ताटे व माढा पंचायत समितीचे बालविकास प्रकल्प अधिकारी विनोद लोंढे यांना दूरध्वनीवरून मिळाली. लागलीच त्यांनी याबाबत गावचे ग्रामविकास अधिकारी विजय माढेकर यांना पोलिसांच्या मदतीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे ग्रामविकास अधिकारी विजय माढेकर, पोलीस हवालदार रंदिवे, पोलीस कर्मचारी आरकिले यांचे पथक लग्न लागण्याच्या अगोदरच विवाहास्थळी पोहचले. तर लग्नाची सगळी तयारी सुरू झालेली होती. परंतू संबधीत पथकाने त्यांच्यावर कारवाई करीत येथील बालविवाह रोखण्यात यश मिळवले.
दरम्यान, अचानक पोलिस आल्याने वधू-वरांकडील मंडळींनी हे लग्न नसून साखरपुडा असल्याचे सांगितले. परंतु संबधीत पथकाने आलेल्या वऱ्हाडाला याबाबत विचारले तर लग्न असल्याचे समजले. त्यामुळे बाल संरक्षण अधिकारी ताटे यांच्या सूचनेनुसार पथकाने अल्पवयीन मुलीला व वडीलाला जबाबासाठी यावेळी ताब्यात घेतले व त्यांचे कुर्डुवाडी पोलिसांत जबाब घेऊन पुढील कारवाईसाठी सोलापूर येथील बाल संरक्षण कार्यालयाकडे ताब्यात देण्यात आले.


previous post