Tarun Bharat

‘माणसा, कधी होशील रे तू माणूस!’

मानसिक अस्वस्थ महिला दुसऱयांदा गर्भवती, बलात्काराचे प्रकरण असूनही पोलिसांचे दोन वर्षे अक्षम्य दुर्लक्ष

रमेश हिरेमठ /बेळगाव

ती कुठून आली आहे? कोणालाच माहिती नाही. मनात आले तर हिंदीतून चार शब्द बोलते. नाही तर निःशब्द बनून राहते. ती कधी एका ठिकाणी बसत नाही. महामार्गावर, खेडय़ापाडय़ात विमनस्क अवस्थेत भटकत असते. कोणी मूठभर अन्न दिले तर पोट भरून घेते. तिची मनःस्थितीही बरी नाही. तिचे कोणीच वारसदार या परिसरात नाहीत. आता ती दुसऱयांदा गर्भवती आहे. परिस्थितीची बळी ठरल्याने मानसिक स्वास्थ्य हरवून बसलेल्या महिलेला स्वतःला माणूस म्हणवणाऱया काहींनी तिला आपल्या वासनेची शिकार बनवली आहे.

सुमारे 28 ते 30 वषीय महिलेची ही कथा आहे. दोन वर्षांपूर्वी एका मुलीला जन्म देणाऱया या कुमारी मातेला पुन्हा दिवस गेले आहेत. मानसिक अस्वास्थ्यामुळे वणवण भटकणाऱया तिच्या या स्थितीला जबाबदार कोण? याचा शोध घेणेही कठीण झाले आहे. एरव्ही या ना त्या कारणाने सर्वसामान्य नागरिकांना दरडावणाऱया पोलीस अधिकाऱयांनी या अनामिकेला वाऱयावर सोडले आहे.

समाजातील विकृत मनोवृत्ती, पोलीस दलातील काही अधिकाऱयांचा बेजबाबदारपणीमुळे या असाहाय्य महिलेची फरफट झाली. दोन वर्षांपासून ही अनामिका बेळगाव परिसरात वावरते आहे. पूर्वानुभव लक्षात घेऊन सरकारतर्फे एखाद्या निराश्रित केंद्रात तिची रवानगी करायला हवी होती. पहिल्यांदा ती गर्भवती झाली, त्याचवेळी बलात्काराचा गुन्हा दाखल करून तिच्या या अवस्थेला जबाबदार कोण? याची चौकशी व्हायला हवी होती. मात्र, काहीच झाले नाही.

21 फेब्रुवारी 2022 रोजी या अनामिकेला श्रीनगर येथील एका सामाजिक कार्यकर्त्याने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. एक दिवस आधी के. के. कोप्प परिसरात भटकत असताना तिला नागरिकांनी हिरेबागेवाडी पोलिसांकडे सोपविले. पोलिसांनी एका एनजीओकडे तिला पाठविले. तिची निगराणी करण्याची व्यवस्था झाली. या सामाजिक कार्यकर्त्यानेही अनामिकेची उत्तम सेवा केली. पोटदुखीमुळे तिला सिव्हिल हॉस्पिटलला दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करून ती सहा महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले.

पोलीस अधिकाऱयांनी आपल्यावरची जबाबदारी झटकल्याचे सामोर

त्याचदिवशी माळमारुती पोलिसांना ही माहिती देण्यात आली. दोन वर्षांत सलग दुसऱयांदा गर्भवती असलेल्या या अनामिकेला न्याय देण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत. एखादी मतिमंद, गतिमंद महिला किंवा तरुणी गर्भवती झाली तर तिच्या या अवस्थेला जबाबदार कोण? याचा शोध घेण्यासाठी बलात्काराचा गुन्हा दाखल करून तपास हाती घ्यावा लागतो. दोन वर्षांपासून त्या-त्या वेळच्या पोलीस अधिकाऱयांनी आपल्यावरची जबाबदारी झटकल्याचे सामोरे आले आहे.

या अनामिकेविषयी मिळालेली माहिती धक्कादायक आहे. दोन वर्षांपूर्वी महामार्गावर भटकत असताना काकती पोलिसांनी एका एनजीओकडे तिला सोपविले होते. तिची मानसिक स्थिती बरी नाही, तिचा सांभाळ व्हावा म्हणून एनजीओकडे तिला सोपविण्यात आले होते. त्याचवेळी ती अपघातात जखमी झाली होती. संबंधित एनजीओने तिच्यावर चांगले उपचार केले. तिचा सांभाळही व्यवस्थित केला. मात्र, पोलीस अधिकाऱयांनी आपली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडली नाही.

पोटदुखीमुळे तेव्हाही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तिची तपासणी करण्यात आली. त्यावेळी गर्भवती असल्याचे आढळून आले होते. त्याचवेळी बलात्काराचा गुन्हा दाखल करून तपास हाती घ्यायला हवा होता. 28 जुलै 2020 रोजी तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. सध्या ही मुलगी एका अनाथाश्रमात आहे. ही अनामिका सिव्हिल हॉस्पिटलमधून बेपत्ता झाली होती. त्यावेळी एपीएमसी पोलीस स्थानकात एफआयआरही दाखल झाला होता. तेव्हापासून ती कोणाला सापडली नव्हती.

महिला संघटनांनी पुढाकार घ्यावा

आता हिरेबागेवाडी पोलिसांना सापडली ती पुन्हा एकदा गर्भवती अवस्थेतच! तिला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करून आठ दिवस उलटले तरी अद्याप तिच्याविषयी योग्य ती कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही. यावरून पोलीस यंत्रणेला अशा प्रकरणांबाबत गांभीर्यच नसल्याचे दिसून येते. आता या अनामिकेला न्याय देण्यासाठी महिला संघटनांनी पुढाकार घेण्याची गरज अधोरेखित होत आहे.

तिच्या भाषेवरून ती परप्रांतीय असल्याचे समजून येते. मात्र, आपल्याविषयी व्यवस्थित माहिती देण्याच्या अवस्थेत ती महिला नाही. त्यामुळे ती कुठून आली आहे? याचा उलगडाच होत नाही. यासाठी पोलीस दलाने प्रयत्न केले नसल्याचे दिसून येते. बारीकसारीक प्रकरणात आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी पोलिसी खाक्मया दाखविणारे अधिकारी एका अबलेला दोनवेळा जबरदस्तीने मातृत्व लादणाऱया नराधमांचा छडा का लावत नाहीत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पोलीस आयुक्त लक्ष घालणार का?

पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन या अनामिकेच्या अवस्थेला जबाबदार कोण? याचा तपास लावावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. कारण अलीकडच्या काही वर्षांत अधिकाऱयांच्या खाबूगिरीमुळे पोलीस दल बदनाम झाला आहे. दोन वर्षांत या अनामिकेच्या प्रकरणात योग्य ती कायदेशीर कारवाई का झाली नाही? याचीही चौकशी करण्याची गरज आहे.

Related Stories

रक्तदान करून अभिवादन

Amit Kulkarni

भाजीपाल्याची आवक वाढल्याने दरात घसरण

Patil_p

मुतगे ग्रा. पं. अध्यक्षपदी किरण पाटील यांची बाजी

Amit Kulkarni

युवा मेळाव्याची प्रशासनाला धास्ती

Amit Kulkarni

ईद-ए-मिलाद साजरी करण्यास मुभा द्या

Amit Kulkarni

खानापुरात 112 क्रमांकाबाबत माहिती फलकांद्वारे जागृती

Patil_p
error: Content is protected !!