Tarun Bharat

मातेच्या अश्रूंची न्यायालयाकडून दखल पोटच्या गोळय़ाला वाचविण्यासाठी धडपड : मातेच्या जिद्दीचा महिला न्यायाधीशांकडून सन्मान

Advertisements

मडगाव

चिमुरडय़ा मुलांसह पतीने घराबाहेर काढल्याने तिच्या समोर बिकट परिस्थिती निर्माण झाली. त्यातच हातात पैसा नसल्यामुळे हलाखीत दिवस कंठावे लागत  आहेत. अशा स्थितीत 4 वर्षांचा मुलगा आजारी पडतो, तेव्हा आपल्या पोटच्या गोळय़ावर योग्य उपचार करून त्याचा जीव वाचविण्यासाठी आई न्यायालयात जाऊन आपली कैफियत मांडते. याची उत्स्फूर्तपणे दखल घेऊन तिच्या मदतासाठी न्यायालय धावून आले. त्या मुलाच्या उपचाराचा संपूर्ण खर्च बापाने करावा, असा आदेशच या न्यायालयाच्या महिला न्यायाधीशांनी जारी केला.

प्रस्तुत प्रकरणातील एक महिला मडगावच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱयांच्या न्यायालयात आपली कैफियत मांडते. न्यायाधीश, माझ्या 4 वर्षांच्या मुलाचे यकृत जन्मताच खराब झालेले आहे. मडगावच्या एका इस्पितळात या 4 वर्षांच्या मुलावर शस्त्रक्रिया केली आहे. एका शस्त्रक्रियेने यकृत बरे होणारे नाही. त्यासाठी टप्प्या-टप्प्याने शस्त्रक्रिया कराव्या लागतील. पहिल्या शस्त्रक्रियेसाठी 1.5 लाख रुपये तर दुसऱया शस्त्रक्रियेसाठी 2.5 लाख रुपये खर्च होणार आहे.

आकडाच लाखांत असल्यामुळे या 4 वर्षांच्या मुलाची माता हादरते. पदरात दोन अपत्ये, पतीचा आधार नाही. भावाच्या घरात दयेच्या आश्रयावर राहात असलेल्या या अबलेने धीर सोडला नाही. पतीचा आधार नाही, मात्र मुलाला वाचवायचेच या एकमेव जिद्दीने ती पेटली होती. मात्र शस्त्रक्रियेसाठी डॉक्टरांनी सांगितलेला आकडा लाखांच्या घरात होता.

मुलाला तर वाचवायचे होते. शेवटी तिने न्यायालयाचा दरावाजा ठोठावला. आपली व्यथा न्यायालयापुढे मांडली. ती म्हणाली, आपल्या मुलाला वाचविण्यासाठी आपण धडपड करत आहे. माझ्या 4 वर्षांच्या मुलाला जीवनदान मिळण्यासाठी माझ्या पतीला 2.5 लाखांची व्यवस्था करण्याचा आदेश द्या. एखाद्याच्या हृदयाला भिडणारे त्या मातेची आर्त हाक ऐकून न्यायालयाला तिची दया आली.

योगायोग असा की, न्यायालयाच्या न्यायाधीशही एक महिला होती. तीही एक आई होती. तिच्यातील आई जागी झाली. एखाद्या सिनेमातील कथा प्रेक्षकांच्या हृदयाला भिडते, तशी एक माता आपल्या मुलाला वाचविण्यासाठी करत असलेली धडपड न्यायमूर्तीच्या खुर्चीवर विराजमान झालेल्या महिला न्यायाधीशांच्याही हृदयाला भिडली. असाह्य महिलेची याची गांभीर्याने दखल घेत धर्मपत्नीला सोडून अन्य महिलेसोबत राहणाऱया संबंधीत पतीला न्यायालयाने आदेश दिला. चार वर्षांच्या या मुलाच्या यकृतावरील शस्त्रक्रियेसाठी दोन दिवसांत 2.5 लाखाची व्यवस्था करा. अन्यथा या मुलाच्या बापाला पकडण्यासाठी वॉरंट जारी करा, असा न्यायालयाकडून आदेश देण्यात आला.

न्यायालयात उपस्थित असलेल्या प्रेक्षकातील एकाच्या तोंडून त्यावेळी साहजिकच एक प्रतिक्रिया उमटली- न्यायाधीशांच्या रूपाने या मातेला देव पावला.

……………….

बॉक्स

अश्रूंद्वारे मानले न्यायालयाचे आभार !

 न्यायालयाने दखल घेत मुलाच्या शस्त्रक्रियेचा खर्च करण्याबाबत पतीला दिलेल्या आदेशानंतर त्या मातेने आपल्या डोळय़ांतील अश्रूंना वाट मोकळी करून दिली व न्यायालायाचे आभार मानले. अश्रूंनी डबडबलेल्या डोळय़ांनी त्या मातेने त्या महिला न्यायाधीशांकडे पाहिले. केवळ एकमकांकडे पाहून न बोलताही डोळ्याच्या हावभावातून दोन्ही मातांचे संभाषण झाले. ते संभाषण दोन मातांच्या हृदयाचे होते. हा न्याय दिला त्या न्यायाधीशांचे नाव सारिका फळदेसाई, असे आहे.

Related Stories

विद्याप्रबोधिनी ताब्यात घेण्याचा भाजपचा मनसुबा

Omkar B

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 39

Omkar B

कपिलेश्वरी जन्क्शनजवळील खडपाबांध जोडरस्ता ओलंडताना अपघाताचे सत्र

Amit Kulkarni

गोव्याच्या लसेंचा फायदा इतर राज्यांतील लोकांनी घेणे थांबवा

Amit Kulkarni

राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस

Patil_p

पाऊस परतीच्या वाटेवर तर नाही?

Amit Kulkarni
error: Content is protected !!