Tarun Bharat

मानधन लाभार्थी निवड समिती स्थापणार!

Advertisements

आमदार वैभव नाईक यांची घोषणा : दशावतार मंडळे, भजनी कलाकारांना आर्थिक मदत

प्रतिनिधी / कुडाळ:

दशावतार व भजनी कलाकार शासकीय मानधनापासून वंचित राहू नयेत, यासाठी सर्वसमावेशक अशी स्वतंत्र मानधन लाभार्थी निवड समिती स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा आमदार वैभव नाईक यांनी बुधवारी येथे केली. विरोधक राजकारण करीत राहणार. आपण आपले काम करीत राहू, असेही ते म्हणाले.

खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून जिल्हय़ातील दशावतार मंडळे व भजनी कलाकार यांना येथील सिद्धिविनायक सभागृहात आयोजित कार्यक्रमात नाईक यांच्या हस्ते आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

नाईक म्हणाले, हे दोन्ही कलाकार आपली कला रोज सादर करून उपजीविका करणारे आहेत. कोरोनाच्या कालावधीत सर्वच कार्यक्रमांवर बंदी आली आणि या कलाकारांची रोजीरोटी बंद झाली. याची दखल घेऊन आज दुसऱया टप्प्यात या कलाकारांना आर्थिक मदतीचे वाटप होत आहे. ही मदत त्यांची गरज पूर्णपणे भागवेल असे नाही. परंतु त्यांच्यासाठी हातभार नक्कीच आहे. या दोन्ही कलाकारांना लोकाश्रय मिळाला आहे. त्यांना राजाश्रय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

शासनस्तरावर कलाकारांना मानधन देण्यात येते. बऱयाच कलाकारांना त्याचा लाभ होत आहे. असे असले, तरी शासनाचे मानधन आजपर्यंत ज्यांना मिळाले नाही, अशा सर्व कलाकारांना तसेच यापुढे या मानधनासाठी सादर करण्यात येणारे प्रस्ताव परिपूर्ण असावेत व कोणीही मानधनापासून वंचित राहू नये, यासाठी मार्गदर्शक तत्वे नियम-अटींच्या आधारांवर ही समिती काम करील, असेही त्यांनी सांगितले.

कलाकारांना आमच्या पातळीवर पूर्ण सहकार्य मिळेल, अशी ग्वाही देतानाच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विरोधक राजकारण करीत आहेत. ते त्यांनी करावे. आम्ही आमचे काम करीत राहणार, असेही ते म्हणाले.

खासदार विनायक राऊत स्वत: भजन कलाकार आहेत. त्यांना कलाकारांबद्दल आत्मियता आहे. त्यांच्या माध्यमातून कलाकारांचे प्रश्न नक्कीच मार्गी लागतील, असे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी सांगत विरोधकांना कोरोनाचे काही गांभीर्य नाही. ते राजकारण करीत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात कोरोना प्रतिबंधासाठी चाललेले काम लक्षात घेतले, तर महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याचा अधिकार विरोधकांना नसल्याचे स्पष्ट केले.

भालचंद्र केळुसकर यांनी प्रास्ताविकात कलाकारांची माहिती आणि सध्या कलाकार कोणत्या स्थितीत आहेत, हे सविस्तर सांगितले. सूत्रसंचालन नागेश नाईक यांनी केले. संदेश पारकर, संजय पडते, राजा सामंत आदींनी मार्गदर्शन केले. शिवसेना जिल्हा महिला आघाडीप्रमुख जान्हवी सावंत, रुची राऊत, गितेश राऊत, शिवसेना कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, जि. प. सदस्य नागेंद्र परब, अमरसेन सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, अभय शिरसाट, अतुल बंगे, सुशिल चिंदरकर, दशावतार संघटनेचे अध्यक्ष तुषार नाईक, भजन संघटनेचे अध्यक्ष शशी राणे, संदीप म्हाडेश्वर, बाळा पावसकर, राजू गवंडे यांच्यासह कलाकार व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

‘गणपती स्पेशल’ महिनाभरानंतर यार्डात विसावल्या!

Patil_p

जिल्हय़ात हलक्या पावसाची शक्यता

NIKHIL_N

सांगलीतील फरारी आरोपीच्या खेड पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Abhijeet Shinde

स्वदेशी बनावटीच्या डेमू ट्रेन’ नेपाळला सुपूर्द

Patil_p

डॉ. गजानन सारंग यांची बदली तात्काळ थांबवा

Ganeshprasad Gogate

‘सुंदर गाव’मधील विजय चांगल्या कामाचे प्रतिक!

NIKHIL_N
error: Content is protected !!