Tarun Bharat

माय मराठीचा दक्षिण दिग्विजय

Advertisements

व्ही . एस. वाळवेकर

माय मराठीचा दक्षिण दिग्विजय जाणून घेण्याआधी याला कोणते कारण घडले, कशारीतीने  हे घडत गेले हे सारेच थोडक्मयात का होईना  पहाण्यासाठी प्राचीन, अर्वाचीन इतिहासाची पाने उलगडावी लागणार आहेत. आता कुणी विद्वान म्हणतील अहो कशाला गाडलेला इतिहास उकरून काढता, काय मिळणार, इथेच चुकतो आपण. इतिहास गाडता येत नाही. आम्हाला गाडले जाते, जाळले जाते पण इतिहास जिवंतच असतो. पूर्वी घडलेले प्रसंग, तेव्हाच्या चुका, आमच्यातील दोष याची तो आठवण करून देतच असतो.  इतिहास कुणाला क्षमा करत नाही आणि मुख्य म्हणजे इतिहासाची पुनरावृत्ती होत असते.

दोन सहस्त्र वर्षांचा स्वातंत्र्यलढा

श्री राम-कृष्णांच्या पदस्पर्शाने पावन अतिप्राचीन असा भारत, भरत खंड. राष्ट्र वाचले तरच संस्कृती देव, धर्म, भाषा यांचे रक्षण होणार आणि त्यासाठी तर दोन सहस्त्र वर्षे आपण लढत आहोत. या दोन  सहस्त्र वर्षात या राष्ट्रावर सतत परकीयांची आक्रमणे होतच राहिली. अलेक्झांडर उर्फ सिकंदराच्या धाडी पडल्या, तेव्हा सम्राट चंद्रगुप्त, चाणक्मय, सम्राट पुष्यमित्र यानी प्रखर प्रतिकार करून त्याला पिटाळून लावले. जाताना त्याचे हाल हाल झाले. सिकंदर जगज्जेता कधीच नव्हता. त्यानंतर शक, कुशाण, हूण अशांच्या धाडी आल्या. रानटी क्रूर अशा या टोळय़ाचा प्रतिकार शककर्ता शालिवाहन, सम्राट विक्रमादित्य, सम्राट यशोवर्मा या महनीय राजांनी केला. यातील शक, ग्रीक, कुषाण, हूण, परकीय इथेच जे राहिले, त्यांनी हिंदूधर्म, संस्कृती, स्वीकारली. हिंदूत मिसळून परकीय आक्रमणकाऱयांना धूळ चारल्यानंतर थोडा काळ शांतता लाभली. तेव्हा हे हिंदुराष्ट्र आपल्या तेजाने, शौर्याने, वैभवाने उजळून निघाले. हिंदूधर्म, संस्कृती, मठ-मंदिरे अबाधितच राहिली पण फार काळ हे  चालले नाही. परत एकदा या हिंदुराष्ट्राला अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागले.

हिंदुराष्ट्रावर मुसलमानांचे आक्रमण

मुसलमानांचे  आक्रमण आठव्या शतकाच्या प्रारंभी झाले. मुसलमान येताना आपला धर्म व संस्कृती घेऊन आले. राज्यविस्ताराबरोबर धर्मप्रसाराचा हेतू पोटी ठेवून आले. पुढील हजार वर्षांच्या
हिंदू-मुसलमानांच्या झगडय़ात राजकीय व
धार्मिक अशी दोन्ही कारणे होती. सिंधचा राजा दाहीर प्राणपणाने लढला. पराभूत झाला. नंतर काठेवाड प्रांतात महमद गझनीने प्रसिद्ध सोमनाथ मंदिरावर स्वारी केली. अचानक झालेल्या या हल्ल्याला स्थानिक नागरिक आखाडय़ाचे साधूसंत पुजारी असा पन्नास हजाराच्या जमावाने प्रतिकार केला ते सर्व कापले गेले. महमदाने मंदिर फोडले, मूर्ती फोडली, मूर्तीतील हिरे, माणके संपत्ती लुटली, गावे लुटली, कत्तली केल्या. असेच तुर्क, अरब, पठाण, मुगल याच्या धाडी येतच राहिल्या. मंदिरे, मठ, धर्मस्थाने, याचे मोडतोड केली, हिंदूना बाटविण्यात आले. या मुसलमानी झंझावताची झळ महाराष्ट्रापर्यंत आली. धर्मांतर, मूर्तीभंजन, कत्तली आयाबहिणीवर अत्याचार याने महाराष्ट्र ग्रासून गेला. काळ मोठा कठीण आला.

युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र इथे सांगत नाही. पण त्या वेळच्या परिस्थितीबद्दल थोडे सांगावे लागते. 1944 ची गोष्ट तेव्हा ब्रिटिश शासन होते. मला मराठी चवथीला पुस्तक होते. कर्नाटकचा इतिहास त्या पुस्तकात पंचाहत्तर टक्के भाग छत्रपती शिवाजी महाराजाच्या चरित्राने व्यापला होता. कारण शिवाजी महाराजांनी थेट दक्षिणेत मुसंडी मारली होती. कर्नाटक, आंध्र, तामिळनाडूपर्यंत पोचले होते. तुंगभदेतीरी विद्यारण्य स्वामीच्या प्रेरणेने हरिहर बुक, यांनी विजयनगर राज्याची स्थापना केली होती. प्रचंड मोठे साम्राज्य, चतुरंग सैन्य, अफाट मोठी मंदिरे, सुवर्ण रत्नांची बाजारपेठ, वैभवशाली हिंदुराज्य. पुढे सत्तेवर आलेला सम्राट कृष्णदेवराय शूर मुत्सद्दी तर होताच, गुणी जनांच्या विद्येचा चाहता होता. कन्नड, तेलगू, संस्कृत ग्रंथ रचना केली होती. या वैष्णव धर्मीय राजांचे राजगुरु होते व्यासराय. वेदविद्येचे प्रकांड पंडित, राजकारण धुरंदर, मुत्सद्दीपण होते. छत्रपती शिवाजी महाराजाच्या आधिपासून माय मराठी इकडे पोचली होती. त्यानंतर छत्रपति शिवाजी महाराजांच्या दक्षिणेकडील मोहिमेस गेलेले कर्नाटक, आंध्र, तामिळनाडूपर्यंत मराठी लोक तिकडे स्थायिक होत गेले. चवथीच्या कर्नाटकच्या इतिहासात हे पण नमूद होते की, शिवाजी महाराज बालपणी, बेंगळूरला वडील शहाजी राजेंकडे राहात असताना ते आपल्या माता जिजाऊ यांच्यासोबत उद्ध्वस्त हंपी, विजयनगर येथे गेले. पडझड झालेले ते साम्राज्य भग्न, उग्र नरसिंह, भग्न गणपती, उद्ध्वस्त मंदिरे, बाजारपेठ हे सारे पाहिले. तो सारा इतिहास जिजाऊ मातेने समजावून सांगितला. ते दृष्य, तो इतिहास श्री शिवरायांच्या अंतरी कोरला गेला. बेंगळूरात काडसिद्धेश्वर म्हणून शंकराचे देऊळ आहे. तेथे बालशिवाजी खेळत असत, हे पण मी दक्षिणेकडे प्रवासाला गेलो असता, तेथील स्थानिकांनी सांगितले. ही झाली पंचवीस वर्षापूर्वीची गोष्ट. शिवाय त्यांना बालपणी माता जिजाऊसाहेब रामायण, महाभारत, पुराणे कथा सांगत. सुसंस्कारामुळे छत्रपती शिवाजी महाराजाची देवावर, धर्मावर प्रगाढ श्रद्धा होती. त्यांनी अनेक मठ मंदिरे, विद्वान यांना दिलेल्या देणग्या, दान, सनद इत्यादी गोष्टीवरून सिद्ध होतेच. आंध्र प्रदेशातील श्रीशैल मल्लिकार्जुनावर त्यांची श्रद्धा होती. अनेकदा त्यांनी भेटी दिल्या. तिथे शिवसृष्टी उभारली आहे. असो. पुढे मराठे अटकेपार गेले. इंदूर, बडोदा, इथे मायमराठी पोचली, झांशीला माय मराठी पोचली.
श्री छत्रपती शिवाजी, समर्थ रामदास, विद्यारण्य, हरीहर, बुक्क, व्यासराय, कृष्णदेवराय, देव, देश धर्मासाठी चंदनाप्रमाणे झिजलेले हे महनीय.

शहाजीराजे भोसले दूरदृष्टीचे, धोरणी. बेंगळूर त्यांना आंदणच होते. भविष्याचा विचार करून त्यांनी महाराष्ट्रातून ज्ञानी, पंडित तसेच राजकारण जाणणारे कर्तबगार अशा अनेक मराठी कुटुंबाना बेंगळूरला बोलावून घेतले. त्यामुळे मराठी भाषा, संस्कृती, कर्नाटकात रुजली, वाढली, बहरली…

तंजावर मराठी राज्य

तंजावर हे पुराणप्रसिद्ध, धार्मिक व राजकीयदृष्टय़ा सुद्धा प्रसिद्ध क्षेत्र. तंजावर प्रांतावर तामिळ चोळराजे, आंध्र नायक राजे व छत्रपति शिवरायांचे सावत्रबंधू व्यंकोजीराजे यानी राज्य केले. व्यंकोजी राजे नंतर त्यांचा पुत्र शहाजी, शरफोजी व तुक्कोजी, तुक्कोजीचे पुत्र एकोजी व प्रतापसिंह त्यांचा पुत्र तुळजेंद्र नंतर दत्तक पुत्र शरफोजी, त्यांचा पुत्र शिवाजी हे भोसले कुलराजे. या घराण्याने इ. स. 1676 ते 1855 राज्य केले. त्यावेळी महाराष्ट्रातून  अनेक संत, महंत, स्वामी, मठाधीश, पंडित, कवी, शास्त्रज्ञ, शिपाई, कलावंत असा जनसमूह तंजावरात येऊन स्थायिक झाला.

श्री समर्थ रामदास आणि रामदासी पंथीयांची साहित्य सेवा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विनंतीवरून समर्थ रामदास तंजावरला आले. तेव्हा व्यंकोजी राजांनी त्यांचा सत्कार  करून अनुग्रह करण्यास विनविले, तसेच मठ स्थापन करण्यास विनविले, तेव्हा श्री समर्थानी अनुग्रह करून आपल्या मुख्य शिष्यांपैकी तिघास तंजावर प्रातांत पाठवून दिले.

  • तंजावरमठ मठपती शहापूरकर भीमस्वामी
  • तामिळनाडूतील मन्नारगुडी मठपती अनंत मौनी स्वामी
  • तामिळनाडूतील कोनूर मठपति श्री राघवस्वामी

समर्थांचे असेच मठ आंध्र प्रदेश येथे, एकेहळ्ळी (जहिराबाद  येथे) कर्नाटकात आपचंदचे मठ आहेत. या सर्व मठपतीनी तसेच त्यांच्या  शेकडो शिष्यांनी ग्रंथ, काव्य, चरित्र असे नानाविध साहित्य निर्माण केले. त्या शिष्यांनी पण पुढे तामिळनाडूत आपले मठ स्थापिले. तंजावरचे भोसले राजे जितके शूर, पराक्रमी तितकेच गुणग्राहक होते. त्यांनी स्वतः अनेक ग्रंथ रचले. विद्वानांना आश्रय दिला. संगीत, नृत्य, नाटय़ इत्यादी कलांना प्रोत्साहन दिले आणि स्वतः अनेक नाटके लिहून रंगभूमीवर प्रयोग घडवून आणले. भोसले राजांनी तेलगु, तामिळ, संस्कृत, मराठी हिंदी भाषांत ग्रंथ रचले आहेत.

तंजावरचे सरस्वती महाल ग्रंथालय

अद्भुत अवर्णनीय असेच हे ग्रंथालय म्हणावे लागेल. या सरस्वती महाल ग्रंथालयात चार हजारहून अधिक मराठी हस्तलिखीत ग्रंथ आणि आठशे मोडी दप्तरे उपलब्ध आहेत. तसेच संस्कृत, तामिळ व तेलगू भाषेतील हजारो हस्तलिखिते संग्रहित करण्यात आली आहेत. त्या त्या भाषेतील हस्तलिखितांचे संशोधन संपादन आणि प्रकाशन यासाठी पंडित नेमण्यात आले आहेत. सरस्वती महालातील मोडी दप्तरे हा एक मौल्यवान ऐतिहासिक दस्तऐवज आहे. त्यातून मराठय़ांच्या राज्य पद्धतीचा अव्वल दर्जाचा पुरावा मिळतो. तंजावरच्या तामिळ विद्यापीठाने अशा काही मोडी कागदपत्रांचे खंड प्रसिद्ध केले आहेत. मराठी भाषिक जे केरळमध्ये गेले त्यांनी पण ग्रंथरचना केली आहे. केरळ विद्यापीठाच्या ओरीएंटल रिसर्च इन्स्टिटय़ूटमधील मराठी हस्तलिखितांची वर्णनात्मक सुची ग्रंथालयाने तयार करून घेतली आहे.

वारकरी संप्रदाय

भागवत वारकरी संप्रदायाची चेन्नईच्या परिसरात विठ्ठल रखुमाईची तीन मंदिरे असून तेथे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, नामदेव महाराज अशा मराठी संताच्या तसबिरी असून नित्य सांप्रदायिक भजन चालते. ‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम’ हा घोष दुमदुमतो.  अनेक मूळचे तामिळ पण प्रयत्नाने ही मराठी भजने सुस्वर गातात. वर्षातून एकदा पंढरपूरला वारीत हजर असतात.

पार कर्नाटक, आंध्र, तामिळनाडू,केरळपर्यंत जाऊन पोचलेला मराठी समाज व्यावहारिक कानडी,तेलगू, तामिळ, मल्याळी बोलत असला तरी त्याने आपली मराठी भाषा, संस्कृती, सणवार, उत्सव, हळदीकुंकू आदी परंपरा जपून ठेवल्या आहेत. विशेष करून वडीलधारी, घरातील स्त्रिया हे कार्य पार पाडीत आहेत. तीर्थश्राद्ध करविणारे फाटक, दशपुत्रे आदी  मराठी भाषिक तेथे पूर्वीपासून आहेत. हे सर्व मराठी भाषिक शिवकालीन मराठीभाषा बोलतात हे एक वैशिष्टय़. त्रिवेंद्रम, त्रिचनापल्ली, तंजावर, चेन्नई, तिरुअनंतपुरम, कुंभकोणम, सेलम, कोईमत्तूर, आदी परिसरात मराठी माणसांनी दक्षिण मराठी समाज शहाण्णव कुळी मंडळ, नामदेव समाज, छत्रपती शिवाजी एज्युकेशन फंड, महाराष्ट्र मंडळ, मराठा असोसिएशन, आदी संस्था स्थापन केल्या आहेत. रामदासी मठाच्या, वैष्णव मठाच्या, अन्य सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व मराठी माणसे एकत्रित होत असतात.

हे पहा मराठी भाषिकांचे कर्तृत्व

इ. स. 1676मध्ये व्यंकोजी राजे भोसले गादीवर बसले. भोसले घराण्याने 180 वर्षे राज्य केले. त्या अवधीत 10 राजे होऊन गेले. तंजावरमधील प्रसिद्ध बृहदेश्वर मंदिरातील भिंतीवर पहिला मराठी शिलालेख कोरलेला आहे. पहिला छापखाना तंजावर येथे सुरू झाला. कवी परमानंदनाच्या शिवचरित्र या मूळ ग्रंथाची प्रत तंजावर येथील सरस्वती महालात आहे. पहिली मुलींची शाळा सरफोजी राजेनी तंजावर येथे सुरू केली. भोसले राजेंनी भरतनाटय़म नृत्याला राजाश्रय दिला व नृत्य शिक्षणाची शाळा सुरू केली. आज एकटय़ा तंजावर इथे 5 लाख मराठी भाषिक असून ते अजून शिवकालीन मराठी भाषेचा वापर करतात. एकूण फक्त तंजावरच नव्हे. तंजावरचा भोवतालचा भाग आंध्र प्रदेश, कर्नाटक, सर्वत्र मराठी भाषिक आहेत ही संख्या मोठी आहे. मराठी भाषेचे अभिमानी, इतिहास संशोधक, साहित्यिक, कवी, या साऱयांनाच ही अभिमानाची बाब असून, साऱयांनी या सरस्वती महाल ग्रंथालयाला भेट द्यावी. आज या ग्रंथालयाला आर्थिक अडचण भासत आहे. मराठी माणसांनी मदत करणे गरजेचे आहे.

Related Stories

पुण्यातील 51 गणेश मंडळांचा ‘विघ्नहर्ता रक्तदान महायज्ञ’

Rohan_P

शिवजयंतीला यंदा ८५ स्वराज्यरथांची मानवंदना

tarunbharat

मराठा शौर्य दिनी लालमहालात रंगावली, मर्दानी खेळ, शस्त्रपूजन

Rohan_P

झेप प्रतिष्ठानतर्फे आदिवासी पाड्यांवर शैक्षणिक किटचे वाटप

Rohan_P

मेट्रो-रेल्वे प्रगतीपथावर…

Patil_p

आदिवासी वस्त्यांवरील शाळांमध्ये सायकली व खेळणी

prashant_c
error: Content is protected !!