Tarun Bharat

मारुती गल्ली येथे खासगी डॉक्टरांना धक्काबुक्की

Advertisements

डॉक्टरांविरुद्ध दलित संघटनांचा आरोप : डॉक्टरांनीही घेतली पोलीस आयुक्तांची भेट

प्रतिनिधी / बेळगाव

एका तरुणावरील शस्त्रक्रियेच्या मुद्दय़ावरून दुर्लक्षपणाचा आरोप करीत रुग्णाचे नातेवाईक व संतप्त नागरिकांनी डॉक्टरांना धक्काबुक्की केल्याची घटना सोमवारी दुपारी मारुती गल्ली येथे घडली आहे. उपचारात डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप दलित संघटनांनी केला असून डॉक्टरांनीही पोलीस आयुक्तांची भेट घेत संरक्षणाची मागणी केली आहे.

या घटनेने सोमवारी दुपारी काही काळ तणाव निर्माण झाला होता. रात्री उशिरापर्यंत या संबंधी पोलिसांत फिर्याद दाखल झाली नसली तरी दलित संघटनांच्या नेत्यांनी खडेबाजार पोलीस स्थानकात खासगी डॉक्टरांविरुद्ध लेखी तक्रार केली आहे. काही डॉक्टरांनी पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांची भेट घेऊन हल्ल्याची माहिती देत संरक्षणाची मागणी केली आहे.

वडगाव येथील परशराम मल्लाप्पा लोकरे (वय 26) या तरुणाचे पोट फुगल्याने उपचारासाठी 20 फेब्रुवारी रोजी मारुती गल्ली येथील डॉ. रोहित जोशी यांच्या दवाखान्यात दाखल केले होते. दुसऱया दिवशी त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली. मात्र, तो कॅन्सरने ग्रस्त असल्याचे शस्त्रक्रियेनंतर आढळून आले. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यावरून त्या तरुणाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

सोमवारी त्याचे नातेवाईक व दलित संघर्ष समितीचे नेते, कार्यकर्ते यांनी शस्त्रक्रिया करणाऱया डॉक्टरांची भेट घेऊन त्या तरुणाच्या सद्यस्थितीबद्दल चर्चा करताना वादावादीचा प्रकार घडला. त्याची अवस्था काय आहे? तुम्हीच पहा चला, असे सांगत डॉक्टरांना सिव्हिल हॉस्पिटलकडे नेताना वाटेत मारुती गल्ली परिसरात त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी डॉक्टरांवर आरोप करीत धरणे धरले. पोलीस निरीक्षक धीरज शिंदे व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. 

रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी केले सर्वतोपरी प्रयत्न : डॉ. रोहित जोशी

सदर रुग्ण 20 तारखेला हॉस्पिटलमध्ये दाखल झाला. 21 तारखेला त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याचे पोट फुगून शौचाची वाट बंद झाली होती. अशा स्थितीत रुग्णाचा जीव वाचवणे महत्त्वाचे असल्यामुळे शौचासाठी त्याला अन्य पर्यायी मार्ग करून देण्यात आला. मात्र, सदर रुग्णाला कर्करोग झाला असून तो संपूर्ण शरीरभर पसरला आहे हे लक्षात घेऊन रुग्णाच्या नातेवाईकांना कल्पना देण्यात आली. पुढील उपचारासाठी त्याला कर्करोग हॉस्पिटलमध्ये दाखल करणे आवश्यक आहे, असे सांगण्यात आले. रुग्णाची परिस्थिती फारशी उत्तम नसल्याने आम्ही त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो, असेही रुग्णाच्या नातेवाईकांनी सांगितले. तेथील डॉक्टरांनीही योग्य तेच उपचार केले. आता रुग्णाला कॅन्सर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. परंतु आठवडय़ानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये येऊन साहित्याची नासधूस करून उद्धट वर्तन केले. यामागची मानसिकता अद्याप आपल्याला समजलेली नाही. परंतु रुग्णाचा जीव वाचविणे महत्त्वाचे आहे, एवढेच लक्षात घेऊन आपण सर्वतोपरी प्रयत्न केले.

Related Stories

कापड-पादत्राणांवरील जीएसटी कमी करा

Amit Kulkarni

खो खो : बेळगाव जिल्हा मुलींचा संघ उपजेता

Amit Kulkarni

कोरोनावरील लसीचा प्रयोग निश्चितच यशस्वी होईल!

Patil_p

हेस्कॉमचा गलथान कारभार कर्मचाऱयांच्या जीवावर

Amit Kulkarni

मण्णुरातील महिलेची नदीत उडी घेऊन आत्महत्या

Patil_p

लम्पीने दगावलेल्या जनावरांची भरपाई द्या

Amit Kulkarni
error: Content is protected !!