Tarun Bharat

मालमत्ता खरेदीची पंचसूत्री

कोणत्याही प्रकारच्या मालमत्ता खरेदीचा निर्णय हा किचकट आणि कठिण असू शकतो. सर्व निकषाची पडताळणी करुनच मालमत्ता खरेदीचा निर्णय घेतला जातो. मालमत्ता खरेदी म्हणजे भाजी विकत घेण्याएवढे सोपे नाही. टप्प्याटप्प्याने खरेदीची प्रक्रिया पार पाडावी लागते. त्याची पंचसूत्री इथे सांगता येईल.

पहिला नियम: आपल्याला जी मालमत्ता खरेदी करायची आहे, त्यावर लक्ष केंद्रीत करावे. ज्या ठिकाणी घर खरेदी करायचे आहे, ते ठिकाण निश्चित करावे लागेल. मालमत्ता खरेदीचे अनेक उद्देश असू शकतात. जसे की स्वत:साठी घर खरेदी करणे, आपल्या कुटुंबाला सुरक्षित जागा देणे किंवा मालमत्ता भाडय़ाने देऊन उत्पन्नाला हातभार लावणे आदी. जर आपण गुंतवणूक म्हणून मालमत्ता खरेदीचा विचार करत असाल आणि जेव्हा आपण त्याची विक्री करण्याचा निर्णय घ्याल तेव्हा त्यापासून अनेकपट लाभ मिळणे अपेक्षित आहे. एक हुशार गुंतवणूकदार कोणत्याही मालमत्तेत गुंतवणूक करण्यापूर्वी आपला उद्देश निश्चित करत असतो. या उद्देशांवर आधारित निर्णय विचारांती घेतो. जसे की, मालमत्तेचा प्रकार, आकार, स्थिती, कोणाच्या नावाने खरेदी वगैरे.

दुसरा नियम: मालमत्तेत गुंतवणूक करण्यापूर्वी आपले बजेट निश्चित करावे. आपल्याकडे गरजेनुसार पैसे असू शकतात किंवा कर्ज घेण्याचीही गरज भासू शकते. जर आपल्याला पैशात वाढ करायची असेल तर आणखी स्त्रोतांचा शोध घ्यायला हवा. या आधारावर गुंतवणूकीसाठी पैशाची जमवाजमव करता येईल. म्हणूनच गुंतवणुकीची रक्कम निश्चित करायला हवी. बजेट आणि सध्याची बाजाराची स्थिती याचा ताळमेळ बसवायला हवा.

तिसरा नियम: तिसरा नियम पाळण्यासाठी कालावधी निश्चित करणे गरजेचे आहे. आजकाल बहुतांश बँका मालमत्तेच्या 80 टक्के कर्ज देत आहेत. त्यामुळे मालमत्तेच्या 80 ते 90 टक्क्मयांपर्यंत कर्ज घेऊन गुंतवणूक करणे सोयीचे झाले आहे. कर्जफेडीसंदर्भात उपलब्ध होणाऱया स्रोतांची माहिती आपल्याला बँकेला द्यावी लागेल आणि त्याचे निकष पाळावे लागतील. कर्जास पात्र ठरण्यासाठी बँकेच्या सर्व अटींची पूर्तता करावी लागेल. आर्थिक क्षमतेच्या आधारावर कर्जाचा कालावधी निश्चित करावा. अधिक कालावधी ठेवल्यास व्याजाच्या रुपाने अधिक पैसे जावू शकतात.

चौथा नियम : आपण जेव्हा मालमत्ता खरेदीचा निर्णय घेतो, तेव्हा त्याचा शोध सुरू करावा. ज्या ठिकाणी मालमत्ता खरेदी करायची आहे ते स्थान निश्चित करावे. एकदा ठिकाण ठरले की, ते शोधून काढणे फारसे कठिण नाही. संबंधित ठिकाणच्या दलालांकडून/एजंटकडून बाजाराचे मूल्य जाणून घेऊ शकता. एखाद्या दलालाने दाखवलेली मालमत्ता आपल्या बजेटबाहेर असली तर अन्य एजंटशी चर्चा करुन वास्तविक किंमत जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. साधारणपणे एजंटना दीड ते दोन टक्के दलाली दिली जाते. जमीन किंवा मालमत्तेच्या व्यवहारात दलाल असणे चुकीचे नाही. कारण तो दोन्ही बाजूंची पडताळणी करुनच व्यवहार पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करत असतो. दोघांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी तो मदत करत असतो. त्याच्या आधारे संबंधित मालमत्तेची माहिती काढणे सोयीचे जाते. स्थानांच्या आधारावरच मालमत्तेच्या किंमतीवरची वाढ अवलंबून असते.

पाचवा नियम: मालमत्तेची निवड केल्यानंतर त्या मालमत्तेवर मालकी हक्क प्रस्थापित करणे महत्त्वाचे आहे. यासाठी व्यवहारात सजगता बाळगणे गरजेचे आहे. मालमत्तेच्या अधिकारात त्रुटी राहणार नाहीत, याबाबत काळजी घ्यायला हवी. या आधारावर जागेचे व्यवहार वादग्रस्त होणार नाहीत आणि मालकी हक्काचे स्थानांतर कायदेशीररित्या पूर्ण होऊ शकेल. जर आपण एखाद्या विकासकाच्या गृहप्रकल्पात गुंतवणूक करत असाल परंतु त्यास खुल्या बाजारात अन्य व्यक्तीकडून खरेदी करत असाल तर अशावेळी व्यवहाराला अंतिम रुप देण्यापूर्वी विकासकाच्या कार्यालयात जावून संबंधित मालमत्तेची चौकशी करणे हिताचे ठरेल. खरेदीपूर्वी मालमत्तेच्या कागदपत्राची पडताळणी करावी. यासाठी वकिलाची मदत घेणे श्रेयस्कर ठरेल. कायदेशीर पातळीवर कागदपत्रात त्रुटी नसेल तर व्यवहारात अडचण येत नाही.

– सचिन जामुनकर

Related Stories

प्रत्यक्ष टी-20 विश्वचषकापूर्वी…

Patil_p

मल्लू

Patil_p

घर भाडय़ाने देताना…

Patil_p

नवे तंत्र देईल का गती…

Patil_p

होम ऑफिसची वाढणार क्रेझ

Patil_p

सौंदर्य खुलवणारा झगमगाट

Patil_p