Tarun Bharat

मालमत्तेच्या उताऱयावर आता घर व घरमालकाचे छायाचित्र

प्रतिनिधी / बेळगाव :

शहरातील मालमत्ता धारकांची घरपट्टी ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या पाठोपाठ आता ऑनलाईन उतारे देखील उपलब्ध करून देण्यात येत आहे. या उताऱयावर विविध तपशीलासोबत घराचे आणि घर मालकाचे छायाचित्र देखील असणार आहे. त्या करिता इमारत धारकांना घराचे व स्वत:च्या छायाचित्रासोबत विविध कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे.

‘ई-अस्ती’ या प्रणालीद्वारे मालमत्तांची नोंद ऑनलाईनद्वारे करण्यात येत आहे. त्यामुळे उतारे देखील ऑनलाईनद्वारा मिळणार आहेत. सर्व मालमत्तांची नोंद ई-अस्ती या प्रणालिवर करण्याची सूचना महापालिकेला नगरविकास खात्याने केली आहे. याची अंमलबजावणी डिसेंबर पासून करण्यात येत आहे. मात्र या प्रणालिमध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने ई-अस्तीवर मालमत्तांची नोंद करण्याचे काम रखडले होते. तसेच कोरोना विषाणुचा प्रसार झाल्याने मनपाच्या महसूल विभागातील कर्मचाऱयांवर विविध जबाबदाऱया सोपविण्यात आल्या होत्या. त्यामुळे ई-अस्तीच्या नोंदी झाल्या नाहीत. मात्र यापुढे प्रत्येक मालमत्तेची नोंद ई-अस्तीवर करण्याची नोटीस महापालिकेच्या महसूल उपायुक्तांनी बजावली आहे. त्यामुळे सर्व महसूल निरीक्षक या कामात आता व्यस्त झाले आहेत. क्वारंटाईन केलेल्या नागरिकांवर नजर ठेवण्याबरोबरच ई-अस्तीवर मालमत्तांची माहिती नोंदविणे आवश्यक आहे. या ई-अस्ती प्रणालिवर मालमत्तांची नोंद करण्यासाठी सीटीएस उतारा, आधार कार्ड, घरमालकाचा फोटो, तसेच घराचे छायाचित्र, घरपट्टी भरलेली जुनी पावती आदी कागदपत्रे मालमत्ताधारकांना द्यावे लागणार आहेत. तसेच नविन बांधलेल्या इमारतीची ई-अस्तीवर नोंद करण्यासाठी वरील कागदपत्रांसह इमारत बांधकाम परवाना, इमारत बांधकाम पूर्णत्वाचा दाखला आणि आराखडय़ाची प्रत जोडणे बंधनकारक आहे.

ई-अस्ती प्रणालीद्वारे इमारतधारकांना ऑनलाईन उतारे मिळणार आहेत. उताऱयावर इमारतीच्या तपशीलासोबत घराचे व घरमालकाचे छायाचित्र असणार आहे. त्यामुळे इमारतीबाबत होणाऱया गैर प्रकारांना आळा बसणार आहे.  बोगस व्यवहार होत असल्याचे अनेकवेळा उघडकीस आले आहेत. मात्र यापुढे असे प्रकार टाळण्यासाठी प्रशासनाने ही नवी प्रणाली लागू केली आहे. त्यामुळे ई-अस्ती प्रणालीवर मालमत्तेची नोंद करण्यासाठी  इमारत धारकांनी आवश्यक कागदपत्रे महापालिकेच्या संबंधीत महसूल विभागिय कार्यालयात जमा करावीत असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

उंदरासाठी लावलेल्या सापळय़ात अडकले घुबड

Patil_p

निपाणीत आज ‘नागरिकत्व’ विरोधात धरणे आंदोलन

Patil_p

कॅन्टोन्मेंटवासीय संभ्रमावस्थेत

Amit Kulkarni

जीएसटीमुळे करप्रणाली झाली ग्राहकाभिमुख

Amit Kulkarni

ता. पं.मधील सकिंग मशिन ‘असून अडचण नसून खोळंबा’

Amit Kulkarni

काटामारी थांबविण्यासाठी भातकेंद्रे सुरू करा

Amit Kulkarni